बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

महाराष्ट्र व ब्रिटनमध्ये आरोग्यविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार संपन्न मोटर बाइक ॲम्ब्युलन्स सेवा मुंबईत प्रायोगिक तत्वावर सुरु करणार -आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई, दि.9: अपघात व आपत्तीतील जखमींवर प्लॅटीनिअम टेन मिनिट वेळेत उपचार मिळावेत यासाठी मुंबई येथे पुढील वर्षापासून मोटर बाइक ॲम्ब्युलन्स सेवा ब्रिटनच्या आरोग्य सेवा यंत्रणेमार्फत प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येईल.राज्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार होण्यासाठी रुग्णालयांचे अद्ययावतीकरण, परिचारिका, डॉक्टरांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम ब्रिटनसरकारच्या सहकार्याने राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात आज महाराष्ट्र शासन आणि ब्रिटनच्या आरोग्य सेवा यंत्रणेमध्ये आरोग्य विषयक सामंजस्य करार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत आणि इंग्लडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी आरोग्य मंत्री बोलत होते. इंग्लडच्या व्यापार आणि गुंतवणूक विभागाचे महासंचालक कुमार अय्यर, उपसंचालक जेन ग्रेडी तसेच राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या आयुक्त आय. ए. कुंदन, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयुष सिंग व आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार उपस्थितीत होते.
आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, ब्रिटन आणि भारत या दोन देशांमध्ये व्यापाराबरोबरच भावनिक संबंध देखील आहेत. आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा विस्तारण्यात मदत होणार आहे. परिचारीका, पॅरामेडिकल, डॉक्टर यांच्या प्रशिक्षणाबरोबरच राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील जी शासकीय रुग्णालये आहेत त्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी इंग्लडमधील आरोग्य यंत्रणेचे सहकार्य मिळणार आहे. राज्यात 108 क्रमांकाद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सेवे अंतर्गत रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येते. मात्र मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये गर्दीच्या ठिकाणी एखादा अपघात अथवा दुर्घटना घडली तर याठिकाणी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनेतील जखमींवर गोल्डन अवर पेक्षा प्लॅटिनअम टेन मिनिटवेळेत उपचार झाले तर जखमींना हमखास जीवदान मिळू शकते हे लक्षात घेऊन इंग्लडच्या सहकार्याने सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेली मोटर बाइक रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई मध्ये 10 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु करण्यात येईल. मोटर बाइक रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना तातडीने जवळचे रुग्णालय अथवा आपत्कालिन वैद्यकीय सुविधेच्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविता येणे शक्य होईल. ही सेवा मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी फायदेशीर ठरेल असा विश्वास डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
या सामंजस्‍य करारामुळे भारत आणि इंग्लडमध्ये औद्योगिक तसेच आरोग्य विषयक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सेवेला इंग्लंडच्या तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा होईल, असे इंग्लडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड फ्रान्सिस मॉड यांनी यावेळी सांगितले.
·         सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्राला गुणवत्तपूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याकामी इंग्लडच्या आरोग्य यंत्रणेमार्फत सहकार्य करण्यात येणार.
·        रुग्णांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणार.
·        डॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण देणार.
·        ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा