मुंबई, दि. 18 :
राज्यातील
नागरिकांना आपल्या तक्रारी भ्रमणध्वनीच्या (मोबाईल) माध्यमातून पोलिसांत नोंदविता
याव्यात म्हणून बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या वॉट्सअॅप सुविधेला
राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेमुळे पोलिसांशी तत्काळसंपर्क साधून तक्रार
दाखल करणे शक्य झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यासोबतच कायदा
आणि सुव्यवस्था राखण्यासही मदत होत आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून तिच्या
माध्यमातून आजअखेर जवळपास तीन हजार तक्रारींची नोंद पोलिसांत झाली आहे.
नागरिकांना तत्काळ आणि निर्भयपणे आपल्या तक्रारी
पोलिसांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी राज्यातील
रेल्वे परिक्षेत्रासह 45शहर व जिल्हा पोलीस स्थानकांनी विशिष्ट भ्रमणध्वनीवर वॉट्सॲप
सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. राज्यातील दोन जिल्हे वगळता सर्व पोलीस परिक्षेत्रे
तसेच रेल्वे परिक्षेत्रातही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. प्रारंभी ही सुविधा
मुंबई रेल्वे परिक्षेत्रात उपलब्ध झाल्यानंतर गेल्या जुलैपासून अनेक ठिकाणी ती
टप्प्याटप्प्याने कार्यरत झाली. ही वॉट्सॲप सुविधा असलेल्या भ्रमणध्वनींच्या
क्रमांकांची यादी पोलीस विभागाच्या संकेतस्थळावर (www.mahapolice.gov.in)
प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नागरीक स्वत:च्या
तक्रारींसह आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांची माहिती
पुराव्यासह देऊ शकतात. वेळेच्या अभावी तसेच इतर काही कारणांमुळे पोलीस ठाण्यात
तातडीने जाता येत नाही म्हणून अनेकदा आसपास घडलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यास
नागरीक टाळाटाळ करतात. यामुळे पोलिसांना गुन्ह्यांची माहिती तत्काळ मिळून त्यावर
वेगाने कार्यवाही करणे शक्य होत नाही. ही समस्या आता दूर झाली आहे.
नागरीकही या सुविधेचा वापर आता मोठ्या प्रमाणावर करु लागले
असून आतापर्यंत औरंगाबाद, पुणे, सोलापूर या शहर पोलीस स्थानकांसह पालघर,
कोल्हापूर, जालना, नांदेड, अकोला, लातूर, सांगली या
जिल्ह्यांतील पोलीस स्थानकांमध्येही तक्रारी नोंद होऊ लागल्या आहेत. औरंगाबाद
शहरासाठी उपलब्ध करुन दिलेल्या वॉट्सॲप क्रमांकावर 20 जुलैपासून 3 नोव्हेंबर 2015
पर्यंत तब्बल 1600 तक्रारींची नोंद झाली आहे. त्याखालोखाल सोलापूर शहर आणि
कोल्हापूर पोलिसांत तक्रारींची लक्षणीय प्रमाणात नोंद झाली आहे.
-----०००-----