गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

पालघर येथील विविध विभागांची कार्यालये महिन्याभरात कार्यान्वित करावी - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,दि.18 : पालघर जिल्ह्यासाठी असलेली विविध विभागांची कार्यालये महिन्याभरात कार्यान्वित करण्यात यावीत. पालघरमध्ये स्मार्ट सिटीच्या धर्तीवर टाऊनशीप विकसीत करतानाच पुढील तीन वर्षात जिल्हा मुख्यालय उभारणीचे काम पूर्ण करावे, ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती पालघर येथे करण्यात आली आहे त्यांनी तातडीने रुजू व्हावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयामध्ये नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या विविध विषयांचा आढावा घेणारी बैठक घेण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार चिंतामण वगना, कपिल पाटील, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, विलास तरे, निरंजन डावखरे, रामनाथ मोते, आदींसह ठाणे व पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, पालघर जिल्हा निर्मिती होऊन वर्ष झाले आहे. याठिकाणी जिल्हा मुख्यालयाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. मुख्यालयाचे काम त्वरीत सुरू करून पुढील तीन वर्षात ते पूर्ण करण्यात यावे. याठिकाणी स्मार्ट सिटीच्या धर्तीवर टाऊनशीप तयार करण्यात येणार आहे. ती शासनाच्या कुठल्या यंत्रणेमार्फत करायची याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. अद्याप पालघर येथे 47 विभागांची कार्यालये सुरू झालेली नाही ही गंभीर बाब आहे. याभागातील जनतेला शासनाच्या विविध सोयी-योजनांचा लाभ होण्यासाठी तातडीने ही कार्यालये सुरू करावीत. येत्या महिन्याभरात महत्वाची कार्यालये सुरू झाली पाहिजेत त्याचबरोबर ज्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांची नियुक्ती पालघरला करण्यात आली त्यांनी तातडीने हजर होणे आवश्यक आहे. जे अधिकारी कर्मचारी रूजू होणार नाहीत त्यांच्यावर कारावाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला यावेळी दिले.
विविध विभागांनी रिक्त पदांबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा कोकण विभागीय आयुक्तांनी त्याबाबत समन्वय करून तातडीने रिक्त पदांबाबतचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या भागातील नागरीकांना प्रशासकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस सावर्जनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधाकिरणाचे आयुक्त युपीएस मदान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, आदींसह विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. पालघरचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सादरीकरण केले. यावेळी पालघर जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा