गुरुवार, १ डिसेंबर, २०११

एच.आय.व्ही. एड्स सारख्या आजाराला हद्दपार करण्यासाठी तरुणांनी समाजात जागृती निर्माण करावी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन


धुळे,:- तरुण मुलंमुली ही राष्ट्राची संपत्ती असून ती निरोगी व निकोप रहावी यासाठी तारुण्यात होणा-या स्वैराचारासारख्या गंभीर चुका टाळून एचआयव्ही, एड्स सारख्या गंभीर आजाराला आमंत्रण न देता त्याला हद्दपार करण्यासाठी तरुणांनी सामाजात मोठया प्रमाणात जागृती निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज केले.
       जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. लाडीकर, डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. संजय शिंदे , डॉ. अन्सारी, उपशिक्षणाधिकारी राहुल चौधरी, वैशाली पाटील, प्रा. गायकवाड, फुलपगारे  उपस्थित होते.
       यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन उपस्थितींतांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एड्स, एचआयव्ही हा रोग अनैतिक संबंधातून किंवा एचआयव्ही पॉझिटीव्ह रक्ताच्या  माध्यमातून रुग्णाला होत असून हा महाभयंकर रोग होवूच नये यासाठी प्रत्येक तरुण तरुणींनी आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी विपश्यना सारख्या साधना शिबीरात सहभागी होवून समाजाला वेगळा संदेश द्यावा. त्याच बरोबर समाजाची मानसिकता बदलण्यासाठी एचआयव्ही, एड्स बाधितांचा तिरस्कार न करता त्यांना जगण्यासाठी आधार दिला पाहिजे भावी पिढीला आपल्या आयुष्याचे ध्येय गाठायचे असेल तर प्रत्येकाने जनरल नॉलेजच्या पुस्तकांचे वाचन करुन आपली बुध्दिमत्ता वाढवावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
       अधिष्ठाता डॉ. एस.एस. गुप्ता यावेळी म्हणाले की, जीवनात नकळत एखादी चुक होते. त्याचे परिणाम किती भयंकर होतात याचे एचआयव्ही, एड्स उदाहरण असून अशा चुका तरुणांकडून होवूच नये यासाठी आमच्या तरुणांनी निकोप, निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा.
       प्रस्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एम.लाडीकर म्हणाले की, एड्स एचआयव्ही हा महाभयंकर रोग असून यावर उपचारच नाही. परंतू तरुण पिढी या रोगाला टाळू शकते. त्याला हद्दपार करु शकतात. यासाठी सर्व सामाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असून याचे वाईट परिणामांचीही जनतेमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगुन तेच काम आजच्या तरुण पिढीला करायचे असल्याचे सांगितले.
       यावेळी शाहीर सुभाष कुळकर्णी यांनीही एड्स, एचआयव्ही जनजागृतीबाबत पोवाडा सादर केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले यांनी उपस्थितांना एड्स दिनाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.संजय शिंदे यांनी केले.    

मोहरम सणानिमित्त धुळे जिल्हयात कलम 37 (1) (3) लागू

      धुळे जिल्हयात 27 नोव्हेंबर, ते 7 डिसेंबर, 2011 या कालावधीत मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा होणार आहे. धुळे जिल्हा हा जातीयदृष्टया संवेदनशिल जिल्हा असल्याने या काळात एखाद्या क्षुल्लक कारणावरुन देखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत  नाही. त्यादृष्टीने धुळे जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी प्रकाश महाजन यांनी दिनांक 23 नोव्हेंबर, 2011 ते 7 डिसेंबर, 2011 पर्यंत संपुर्ण धुळे जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. 

शिरपुर वरवाडे व दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या क्षेत्रात 8 डिसेंबर 2011 रोजी स्थानिक सुटी जाहिर

 मा. राज्य निवडणूक आयोग यांनी डिसेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 या कालावधीत मुदत संपणा-या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. धुळे जिल्हयात शिरपूर वरवाडे व दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदांची निवडणूक दि. 8 डिसेंबर, 2011 गुरुवार रोजी होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा याकरिता  जिल्हाधिकारी, धुळे यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी, धुळे यांनी शिरपुर वरवाडे आणि दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदांच्या क्षेत्रापुरती दिनांक 8 डिसेंबर, 2011 रोजी स्थानिक सुटी एका आदेशान्वये जाहिर केली आहे. 

शहरात जिल्हास्तरीय हातमाग कापड प्रदर्शनाचे आयोजन


विकास आयुक्त (हातमाग) वस्त्र मंत्रालय, भारत सरकार, नवीदिल्ली यांचे विक्री विकास योजने अंतर्गत संचालक, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, नागपूर द्वारा आयोजित धुळे शहरात क्युमाईन क्लब क्रिडा हॉल, जेल रोड, गरुड वाचनालयासमोर येथे दि. 3 डिसेंबर, 2011 ते 17 डिसेंबर, 2011 या कालावधीत जिल्हास्तरीय हातमाग कापडाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजित करण्यात येणार आहे.
       विणकरांनी तयार केलेल्या हातमाग कापडाला योग्य बाजारपेठ मिळावी आणि त्यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या तसेच हातमाग ग्राहकांना अस्सल हातमागाचे कापड उपलब्ध व्हावे या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात राज्यातील पारितोषिक प्राप्त हातमाग विणकर सहकारी संस्थांचा सहभाग राहणार आहे.  त्याचा ग्रामीण विणकरांनी आपल्या कलाकौशल्याने तयार केलेले कापड विक्रीस ठेवण्यात येणार आहे.  प्रदर्शनात विविध संस्थाचे तीस दालन राहणार आहे.  प्रामुख्याने नागपुरी जाड चादी, टॉवेल, खादी पंचे, सतरंजी लहान व मोठया टसर सिल्क साडया व ड्रेस मटेरियल, रेडिमेड कॉटन शर्ट, गालिचे आदि वस्तु विक्रीस ठेवण्यात येणार आहे.  प्रदर्शनात विकल्या जाणा-या कापडावर 20 टक्के विशेष सूट सहभागी संस्थांकडून देण्यात येणार आहे.
       या प्रदर्शनाचा लाभ शहरातील तथा परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग विभाग, औरंगाबाद प्रदर्शन प्रमुख वासुदेव मेश्राम व एन.व्ही. बाभुळकर यांनी केले आहे.  प्रदर्शनाची व्यवस्था परिपूर्ण करण्यासाठी आयुष टेन्ट अण्ड डेकोरेटर्स संचालक अजय अग्रवाल परिश्रम घेत आहे. 

विशेष शाळेतील बाल कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संबंधितांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन


राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील 9 ते 14 वयोगटातील विशेष शाळेतील बाल कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्राथमिक व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी संबंधितांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी दिल्या.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची सभा राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर, सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी एम.टी. पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आखाडे,  वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विलास करडक, नायब तहसिलदार सुचेता चव्हाण, स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.
      खाजगी उद्योग, व्यवसायातील बाल कामगारांच्या तपासणीसाठी परिणामकारक अचानक धाडसत्र राबविण्यात येणार असल्याचे सांगून  जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे आवश्यक असून विशेष शाळेत दाखल केलेल्या विद्यार्थ्यांत बोगस विद्यार्थी असल्यास त्यांचेविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील. 
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील रिक्त असलेल्या मानधनावरील प्रकल्प संचालक तसेच दोन डॉक्टरांची पदे त्वरीत भरण्यासाठी सरकारी कामगार अधिका-यांनी कार्यवाही करावी.  तसेच पोषण आहार तसेच विद्यावेतन मुलांना वेळेवर मिळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे.
      सरकारी कामगार अधिकारी एम.टी.पाटील यांनी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हयात मंजूर 40 पैकी 33 विशेष शाळेत 356 विद्यार्थी मुख्य प्रवाहात दाखल केल्याबाबतची माहिती दिली. तसेच विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांच्या नियुक्ती, विद्यावेतन न भरणा-या संस्था चालकांवर कार्यवाही आदिंची तपशिलवार माहिती यावेळी दिली.
      यावेळी स्वयंसेवी संस्थाचालकांनी विविध अडचणी मांडल्या. यावेळी शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील चिराई देवी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे मनोहर पाटील, कापडणे इंदिरा महिला व बालकल्याण संस्थेचे चंद्रकांत पाटील, कापडणे जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे शिवाजी पाटील, गायत्री एज्यु. ट्रस्टचे विजय वाघ, साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे येथील जय बजरंग बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे धर्मराज सोनवणे, अमोल शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सौ.अनिता रघुवंशी, साक्री येथील नालंदा बालविकास मागासवर्गीय महिला विकास मंडळाचे शरद मोरे, मास्टर ट्रेनर व्ही.ए. देशमुख, फिल्ड ऑफिसर डी. यु. बडगुजर सौ. निता काळोखे, लिपीक भास्कर बोरसे श्रीमती जयश्री निकम आदि उपस्थित होते. 

सन 2010 चा प्रथम, व्दितीय जिल्हा पुरस्कार जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्योजकांना वितरीत


धुळे औद्योगिक विकास क्षेत्रात लघु उद्योजकांना अतिक्रमण, पाणी पुरवठा, वीज, वाहतुकीचा अडथळा यासारख्या भेडसावणा-या समस्यांना तोंड द्यावे लागते.  त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र (झुम) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उद्योजक नितीन बंग, मदनलाल सुराणा, नितीन देवरे, राजेंद्र सिसोदिया, सतिष संगवी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी ए.बी. आनंदकर, कार्यकारी अभियंता वाय. जे. बोडरे, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता दिलीप घुगल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापत सतिष भामरे, अग्रणी बँकेचे आर.पी. भदाणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, अशोक भानुशाळा, देवेंद्र राजपूत उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात.  ही चांगली बाब असून या योजनेचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा.  यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन व उपस्थितांच्या हस्ते सन 2010 चा प्रथम जिल्हा पुरस्कार रोख रुपये 15 हजार रोख, श्रीफळ व मानचिन्ह, मे.एसीपी एंटर प्रायजेसचे व्यवस्थापक राजेश बाबुराव काटे यांना तर व्दितीय पुरस्कार रुपये 10 हजार रोख, शाल, श्रीफळ, मानचिन्ह महेंद्र देविचंद परमार यांना देण्यात आला.
     जिल्हाधिकारी प्रकाश महाजन मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एमआयडीसी मध्ये अतिक्रमण होता कामा नये.  अतिक्रमण झाले तर ज्या कंपनीच्या समोर अतिक्रमण होईल त्या कंपनीच्या व्यवस्थापकास जबाबदार धरण्यात येईल.  याची दखल कंपन्यांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
      यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, राज्य शासन जिल्हयात 300 हेक्टर क्षेत्राचा वनविभाग व स्वयंसेवी संस्था व औद्योगिक क्षेत्रातील एन.जी.ओ. यांच्या माध्यमातून पर्यावरण सांभाळण्यासाठी कोटयावधी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प असून यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  ते पुढे म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार देशात व राज्यात किमान 33 टक्के क्षेत्र वनाखाली असले पाहिजे.  यासाठी जिल्हयातील उद्योजकांनी वृक्ष लागवड योजनेत सहभागी व्हावे  व आपले योगदान द्यावे.
      यावेळी उद्योजक नितीन बंग व इतर उद्योजकांना एमआयडीसीच्या उद्योजकांना वेळेवर लाईट बिल वेळेवर उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना विनाकारण दंड भरावा लागतो यासाठी विद्युत विभागाने वेळेवर वीज बिल उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.  जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी अधिक्षक अभियंता दिलीप घुगल यांना सूचना दिल्या.  तसेच ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्यांची कामे वेळेवर करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.