गुरुवार, १ डिसेंबर, २०११

सन 2010 चा प्रथम, व्दितीय जिल्हा पुरस्कार जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्योजकांना वितरीत


धुळे औद्योगिक विकास क्षेत्रात लघु उद्योजकांना अतिक्रमण, पाणी पुरवठा, वीज, वाहतुकीचा अडथळा यासारख्या भेडसावणा-या समस्यांना तोंड द्यावे लागते.  त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी सांगितले.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र (झुम) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी उद्योजक नितीन बंग, मदनलाल सुराणा, नितीन देवरे, राजेंद्र सिसोदिया, सतिष संगवी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी ए.बी. आनंदकर, कार्यकारी अभियंता वाय. जे. बोडरे, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता दिलीप घुगल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापत सतिष भामरे, अग्रणी बँकेचे आर.पी. भदाणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, अशोक भानुशाळा, देवेंद्र राजपूत उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात.  ही चांगली बाब असून या योजनेचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा.  यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन व उपस्थितांच्या हस्ते सन 2010 चा प्रथम जिल्हा पुरस्कार रोख रुपये 15 हजार रोख, श्रीफळ व मानचिन्ह, मे.एसीपी एंटर प्रायजेसचे व्यवस्थापक राजेश बाबुराव काटे यांना तर व्दितीय पुरस्कार रुपये 10 हजार रोख, शाल, श्रीफळ, मानचिन्ह महेंद्र देविचंद परमार यांना देण्यात आला.
     जिल्हाधिकारी प्रकाश महाजन मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एमआयडीसी मध्ये अतिक्रमण होता कामा नये.  अतिक्रमण झाले तर ज्या कंपनीच्या समोर अतिक्रमण होईल त्या कंपनीच्या व्यवस्थापकास जबाबदार धरण्यात येईल.  याची दखल कंपन्यांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
      यावेळी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की, राज्य शासन जिल्हयात 300 हेक्टर क्षेत्राचा वनविभाग व स्वयंसेवी संस्था व औद्योगिक क्षेत्रातील एन.जी.ओ. यांच्या माध्यमातून पर्यावरण सांभाळण्यासाठी कोटयावधी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प असून यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  ते पुढे म्हणाले की, शासनाच्या धोरणानुसार देशात व राज्यात किमान 33 टक्के क्षेत्र वनाखाली असले पाहिजे.  यासाठी जिल्हयातील उद्योजकांनी वृक्ष लागवड योजनेत सहभागी व्हावे  व आपले योगदान द्यावे.
      यावेळी उद्योजक नितीन बंग व इतर उद्योजकांना एमआयडीसीच्या उद्योजकांना वेळेवर लाईट बिल वेळेवर उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना विनाकारण दंड भरावा लागतो यासाठी विद्युत विभागाने वेळेवर वीज बिल उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.  जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी अधिक्षक अभियंता दिलीप घुगल यांना सूचना दिल्या.  तसेच ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्यांची कामे वेळेवर करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा