मंगळवार, ६ मार्च, २०१२

मंत्रालयातील नूतनीकृत पत्रकार कक्षास सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळ यांची भेट


                मुंबई, दि. 5 : सार्वजनिक बांधकाम पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सायंकाळी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या नूतनीकृत पत्रकार कक्षास भेट देऊन पाहणी केली. मंत्रालयातील वृत्तपत्र प्रतिनिधींना अत्याधुनिक संगणकीकृत सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होईल, असे मत श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.
या कक्षाचे नूतनीकरण लवकरात लवकर होण्याच्या कामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी
श्री. भुजबळ यांना सांगितले. उर्वरित किरकोळ कामेही तातडीने पूर्ण करण्याची सूचना
श्री. भुजबळ यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
श्री. भुजबळ यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत पत्रकारांशी मनमोकळेपणाने अनौपचारिक संवाद सांधला. त्यानंतर त्यांनी क्षाची पाहणी केली. कक्षाच्या अभिनव सजावटीचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
--00--

व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करून होळी व धुलिवंदन सण साजरा करावा - व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे



          मुंबई, दि. 5 : होळी व धुलिवंदन सणाच्या दिवशी  कुठलेही  व्यसन न करता या दिवशी कायमस्वरुपी व्यसनमुक्त राहण्याची प्रत्येकांनी प्रतिज्ञा करावी, असे आवाहन व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे यांनी होळी व धुलीवंदन सणानिमित्त नागरिकांना दिलेल्या शुभसंदेशात केले आहे.      
          श्री. मोघे यांनी शुभसंदेशात म्हटले आहे की, पर्यावरणाची  जपणूक करीत व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करून धुलीवंदनाचा आनंद लुटावा. आजच्या काळातील तरुणाईकडून व्यसनांचा वापर करून धुलिवंदन सण साजरा करण्याची प्रथाच पडली आहे. व्यसनांच्या दुष्परीणामामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. होळीचा सण दुष्प्रवृत्तींचे दहन (त्याग) करण्याचा दिवस असतो. अशा दिवशी प्रत्येकाने `मी, होळी व धुलिवंदन सण नैसर्गिक रंगाचा वापर करून व व्यसनमुक्त राहून सणाचा आनंद द्विगणीत करेन` अशी प्रतिज्ञा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करावा असे आवाहनही श्री. मोघे यांनी शुभसंदेशात केले आहे.
0 0 0 0 0

मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते नैसर्गिक रंगाच्या स्टॉलचे उदघाटन


मुंबई, दि. 5 : पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ   पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक रंगाच्या स्टॉलचे  उद्घाटन पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते  आज  मंत्रालयात करण्यात आले.
या स्टॉलला  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री सचिन अहिर, पर्यावरण सचिव, वल्सा नायर सिंहपर्यावरण विभागाचे संचालक,
डॉ. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे  जनसंपर्क  अधिकारी  संजय भुस्कुटे आदि मान्यवर उपस्थितीत होते.
पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यासाठी नैसर्गिक रंगाची गरज लक्षात घेऊन, मंत्रालयात नैसर्गिक रंगांच्या विक्रीचा स्टॉल  उभारण्यात आलाआहे. या स्टॉलवरच्या रंगाची विक्री  इको क्लबचे  विद्यार्थी करत आहेतहे  नैसर्गिक रंग इको एक्झिट, पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने बनविण्यात आले आहेत.
0 0 0 0 0 0

विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई, दि. 5 : बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या जागतिक महिला कबड्डी स्पर्धेतील विश्वविजेत्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विश्वचषकविजेत्या संघातील महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के आणि दिपिका जोसेफ या तीन खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये, तर संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडगिरी यांना 25 लाख रुपये देऊन राज्य शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात यावा, अशा आशयाचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावल्यामुळेच देशाला विश्वविजेतेपद मिळू शकले याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा अध्यक्ष आणि एक कबड्डीप्रेमी म्हणून आपल्याला राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. यापूर्वी, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंना शासनाने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा पुरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या या तिन्ही कबड्डीरत्नांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा, तर प्रशिक्षकांना 25 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करुन राज्य शासनाच्यावतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात यावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी पत्रात मांडली आहे.
देशी खेळांना, विशेषत: मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंच्या आणि प्रशिक्षकांच्या सत्काराने खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार असल्यामुळे यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी  उपमुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.       
0000000