मुंबई, दि.5 : मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींबाबत सविस्तर आराखडा
तयार करावा आणि त्यासाठी गुगल अर्थ व मॅप्स् सारख्या साधनांचा वापर
करावा, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिले.
मुंबईतील उपकरप्राप्त इमारती तसेच गिरणी कामगारांची घरे यासंदर्भात
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या आढावा
बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री
सचिन अहिर, प्रधान सचिव गौतम चॅटर्जी व अन्य वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
प्रत्येक वार्डातील प्रत्येक उपकर प्राप्त इमारत, तिचा मालक, उपकर
क्र., क्षेत्र, इमारतीतील एकूण सदनिका, सदनिकांमधील गाळेधारकांची संख्या अशी
माहिती असलेला सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश आज
मुख्यमंत्र्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ही माहिती गुगलवर उपलब्ध
झाल्यास विकासक मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माणासाठी पुढे येतील तसेच
आराखडा तयार करताना गुगल अर्थ, गुगल मॅप्स् या सुविधांचा वापर केल्यास तो अधिक
अचुक होईल असेही ते म्हणाले.
या माहितीमुळे मुंबईतील एकूण उपकरप्राप्त इमारती, त्यांच्या
चतु:सीमा व त्यातील गाळेधारकांची संख्या उपलब्ध झाल्याने या इमारतींच्या
विकासासाठी लागणारा चटई क्षेत्र निर्देशांक याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ होईल व विकासकांकडून त्यासाठी निविदा मागविता
येतील, असेही ते यावेळी म्हणाले.
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात ज्या गिरणी
कामगारांच्या वारसांचे अर्ज बाकी होते, ते अर्ज ॲक्सिस
बँकेमार्फत एकत्रित करण्यात आले असून त्यांच्या वारसांची माहिती उपलब्ध झाल्यामुळे
एकूण गिरणी कामगार, त्यांचे वारस यांची संख्या, त्यासाठी किती घरे उपलब्ध करुन
देता येतील याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
-----00-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा