शुक्रवार, २६ जून, २०१५

युवकांनी सामाजिक समतेचा संदेश समाजात रूजवावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


  धुळे, ‍िद. 26 :-  भारत जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश आहे.  सृमृध्द देश निर्माण करावयाचा असेल तर युवकांनी पुढे येऊन सामाजिक समतेचा संदेश समाजात रूजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
             26 जून हा दिवस राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समता दिंडी व संदेश यात्रेचे आयोजन केले होते. या समता दिंडीचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुळवले यांनी  दीप प्रज्ज्वलन व हिरवी झेंडी दाखवून  शुभारंभ केलायाप्रसंगी माजी आमदार धरमचंद चोरडिया, जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील,  उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त           श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व्ही. . पाटील, विभागीय जात पडताळणी समिती क्र. 2 उपायुक्त पी. बी. नाईक, संशोधन अधिकारी राकेश पाटील, विशेष अधिकारी समाज कल्याण श्रीमती हर्षदा बडगुजर,  विलास करडक  उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, भारतात विविध जाती धर्माचे लोक आहेत.  त्यांच्यात
समानतेचा बंधुभाव रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.  भारत हा जगातील सर्वात जास्त तरूणांचा देश आहे.  त्यात 65 टक्के तरूण आहेत, असेही त्यांनी सांगितले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समतेचा संदेश आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा स्वातंत्र्यपूर्व काळात समता प्रस्थापित करण्यासाठी मौलिक कार्य केले आहे. 
            तरूणांनी कुठल्याही व्यसनांना बळी पडू नये.  व्यसन नव्या पिढीला लागू नये याचा आज आपण संकल्प करू या असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी समता दिंडी व संदेश यात्रा  शहरातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. या समता दिंडीमध्ये शहरातील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल, न्यू सिटी हायस्कूल, अग्रसेन महाराज हायस्कूल, नूतन पाडवी माध्यमिक विद्यालय, कमलाबाई कन्या हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल या विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यसनमुक्ती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. शाहीर सुभाष कुळकर्णी यांनीही व्यसनमुक्तीपर संदेश दिला. तर साक्री रोडवरील कल्याण भवन, शिवतीर्थ येथे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते मादक पदार्थ प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. समारोपप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी  उपस्थितांना स्वच्छ भारत व व्यसनमुक्तीची शपथ दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदाम राठोड यांनी केले.

                                    00000

नाशिक विभागाचा, संकल्प स्वच्छतेचा शनिवारी मनपा व नगरपालिकांची एक दिवसीय कार्यशाळा

नाशिक, दि.25 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान(नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची अंमलबजावणी सुरु झाली असून या अभियानाचाच एक भाग म्हणून नाशिक विभागातील सर्व महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त आणि नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा व ‘नाशिक विभागाचा, संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन 27 जून रोजी सकाळी 9.30 ते 4.30  या दरम्यान डॉ. मुंजे इन्स्टिट्युट भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे  करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यशाळेला  उपस्थित महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वच्छतेचा संकल्प देणार आहेत.  कार्यक्रमास पालकमंत्री गिरीष महाजन,  नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, नगरविकास विभागाच्या सचिव व अभियानाच्या नोडल सचिव मनिषा म्हैसकर, संचालक तथा आयुक्त नगरपालिका प्रशासन मीता राजीव लोचन, विभागीय आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मान्यवर घनकचरा व्यवस्थापनाच्या  विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
शहरे स्वच्छ व्हावीत यासाठी कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट, शौचालयाचा 100 टक्के वापर , कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया,  सांडपाण्यावर प्रकिया, स्वच्छ व हरित महाराष्ट्र, स्वच्छता उपक्रमातील  लोकसहभाग आणि उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार यावर आधारित स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या ‘सप्तपदी स्वच्छतेची’ ही संकल्पना पुढे आली आहे.
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमधून साधारण 20 हजार मेट्रीक टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने होणे आवश्यक आहे, या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

*****

मेघालयचे राज्यपाल श्री.व्ही शन्मुगनाथन यांचा दौरा कार्यक्रम

नाशिक दि. 25 :- मेघालय राज्यपाल श्री.व्ही शन्मुगनाथन दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 30 जून 2015 रोजी सकाळी 10.00 वा.  राजभवन येथून वाहनाने इगतपुरीकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. इगतपुरी सर्कीट हाऊस येथे आगमन व राखीव.दु.2.00 वाजता इगतपुरीहून शिर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे प्रयाण. दु.4.30 वाजता शिर्डी  व्हिआयपी विश्रामगृह येथे आगमन.
बुधवार 1 जुलै 2015 रोजी दु.3.00 वाजता  शिर्डी विश्रामगृह येथून मोटारीने इगतपुरी सर्कीट हाऊसकडे प्रयाण. संध्याकाळी 5.30 वाजता इगतपुरी सर्कीट हाऊस येथे आगमन व राखीव व सायंकाळी 6.00 वाजता . इगतपुरी सर्कीट हाऊस येथून राजभवन मुंबईकडे प्रयाण.

***********

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत पुरस्कारासाठी पत्रकारांनी 30 जून पर्यंत प्रस्ताव पाठवावेत

          नाशिक, दि. 25 :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी यशस्वीरीत्या राबविण्यामध्ये पुरक प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तपत्राच्या पत्रकारांना जिल्हास्तरावर तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.
          पत्रकारांना जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार रुपये 25 हजार, द्वितीय पुरस्कार 15 हजार आणि तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये आहे. यासाठी पत्रकारांनी आपले प्रस्ताव तीन  प्रतीत 30 जून 2015 पर्यंत सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सारडा संकुल, तिसरा मजला, एम.जी.रोड, नाशिक या पत्त्यावर पाठवावे.

          या प्रस्तावामध्ये उमेदवारांनी आपले पुर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, शिक्षण, पत्रकारितेतील अनुभव, विकास विषयक पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा तपशिल, आणि  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रचार प्रभावी यशस्वी राबविण्यामध्ये पुरक प्रबोधनात्मक बातम्याच्या माध्यमातुन  2 मे 2014 ते 1 मे  2015  या कालावधीत दिलेल्या वस्तुनिष्ठ प्रसिद्धी साहित्याचा तपशील आदिंचा समावेश  असणे आवश्यक आहे. तरी पत्रकार बांधवांनी आपले प्रस्ताव तीन प्रतीत 30 जून 2015  पर्यत जिल्हा माहिती कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाशिक दि. 25 :- शासनाच्यावतीने देण्यात येणारे 2015 चा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार,   विशेष नेपुण्य पुरस्कार  तसेच 2014 व 2015 या वर्षातील राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव  मागविण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,नाशिक यांनी कळविले आहे.

या पुरस्काराची  नियमावली  व निकष केंद्र शासनाचे वेबसाईटवर www.ewd.nic.in उपलब्ध आहे.  प्रस्ताव 1 जुलै 2015 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक पत्ता नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक येथे पाठविण्यात यावे. विहित कालावधीनंतर प्राप्त झालेले अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी 0253-2236368 या क्रमांकावर संपर्क साधावा 

सर्व शिक्षा अभियान ::जिंगल्स ::


रस्ता सुरक्षा :: जिंगल्स ::



मुख्यमंत्री फडणवीस यांची फ्रान्सच्या राजदूतांनी घेतली भेट


नवी दिल्ली, 26 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फ्रान्सचे राजदूत श्री. फ्रान्कॉईस रिचिअर यांनी महाराष्ट्र सदनात आज सकाळी भेट घेतली.
यावेळी फ्रान्सचे आर्थिक व्यवहार मंत्री काऊन्सीलर श्री. जी. रेने कोगार्ड आणि उपसंचालक फ्रेंच एजंसी फॉर डेव्हलपमेंट, श्रीमती कॅमेले सेवेरॅक उपस्थित होते.

राज्यातील  स्मार्ट सिटी प्रकल्पाला सहकार्य देण्याकरिता फ्रान्सने राज्य शासनाला पाठींबा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासन दिले.

इयत्ता 4 थी आणि 7 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता 5 वी आणि 8 वी मध्ये होणार - श्री.विनोद तावडे

मुंबई दि.25 : - शिक्षण हक्क कायद्यातील (RTE) तरतुदी विचारात घेऊन पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी इयत्ता 5 वी मध्ये व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7 वी ऐवजी इयत्ता 8 वी मध्ये घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी आज घेतला आहे. 
 आरटीई नुसार आता प्राथमिक इ. 1ली ते 5 वी, उच्च प्राथमिक इ.6 वी ते 8 वी आणि  माध्यमिक इयत्ता 9 वी ते 10 वी असे तीन विभाग करण्यात आले आहेत. त्यानुसार शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी मध्ये होणे अपेक्षित आहे.  शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये जर ही परीक्षा घेतली तर या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी इ.4 थी आणि इ. 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा यापूर्वीच दिली आहे.त्यामुळे त्यांना पुन्हा यंदा परीक्षा द्यावी लागेल, म्हणून शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य होईल, असे श्री.तावडे यांनी सांगितले.
 यापुढे पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना ही आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने ओळखली जाणार आहे.  तसेच या परीक्षा पध्दतीत व अभ्यासक्रमात काही बदल होणे गरजेचे आहे, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.  त्यासाठी एक शिक्षण समिती नेमण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार परीक्षाविषयक मार्गदर्शन डिसेंबर 2015 पर्यंत करण्यात येईल, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.

0000

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिले नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण

नवी दिल्ली, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळ्याचे निमंत्रण दिले.
 पंतप्रधानांचे निवासस्थान 7, रेसकोर्स रोड येथे मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांना सिंहस्थ मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले.
          या निमंत्रणात म्हटले आहे, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी जुलै महिन्यापासून सिंहस्थ मेळा सुरु होत आहे. या सिंहस्थ मेळ्याला आंतरराष्ट्रीयख्याती प्राप्त असून भारतीय अध्यात्माशी नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचे घट्ट नाते आहे. साधू महात्मे, श्रध्दाळू, भक्त यांच्यासह आध्यात्मिक  संशोधक आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने या सिंहस्थ मेळ्यात सहभागी होणार आहेत.

          विकासात आघाडीवर असणा-या नाशिक शहरात हा सिंहस्थ कुंभमेळा होत असून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी प्रकल्पात समावेश होण्याची क्षमता या  शहरात आहे. पंतप्रधानांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उपस्थितीने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थालाही एक वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे निमंत्रणात म्हटले आहे.          

आधुनिक भारताच्या निर्माणासाठी वैज्ञानिकदृष्टीने पुढे जाऊ : नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते तीन महत्वांकांक्षी नागरी योजनांचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नवी दिल्ली, दि. २५: आधुनिक भारताच्या निर्माणासाठी वैज्ञानिकदृष्टीकोन स्वीकारत  शहरात   राहणा-या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांना आज केले.
           नागरी विकास, गृहनिर्माण आणि गरीबी उन्मुलन मंत्रालयाच्या वतीने  विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते स्‍मार्ट सिटी’,‘अटल शहरी पुर्ननिर्माण व परिवर्तन’ (अमृत) आणिसर्वांसाठी घरे’(हाऊसिंग फॉर ऑल) या नागरी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी विकास, गृहनिर्माण आणि गरीबी उन्मुलन मंत्री एम. व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह, कॅबीनेट सचिव पी.के.सिन्हा, नागरी विकास गृहनिर्माण आणि गरीबी उन्मुलन विभागाचे सचिव नंदिता चटर्जी, मधुसूदन प्रसाद उपस्थित होते.
       राज्याच्यावतीने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण राज्यमंत्री रणजीत पाटील, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, नागरी विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यावेळी उपस्थित होते.
          यावेळी पंतप्रधान म्हणाले, नागरी भागातील गरीबांना घर देऊन त्यांच्या मनात जीवनाचे स्वप्न पूर्णत्वास आणण्याचा विश्चास सर्वांसाठी घरेया योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. नागरी भागाच्या विकासाकरिता जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास केंद्र सरकार वचनबध्द आहे. आज सुरु झालेल्या तीनही महत्वाकांक्षी योजनांमुळे नागरी भागांच्या समतोल विकासासाठी आणि नगरांच्या भविष्यातील नियोजनासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. गृहनिर्माण आणि गरीबी उन्मुलन मंत्री एम. व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो आणि सचिव मधुसूदन प्रसाद यांचीही भाषणे यावेळी झाली.     
       राज्यातील २४ महापौर, २६ नगराध्यक्ष, २५ महानगरपालिकांचे आयुक्त तसेच देशातील विविध राज्‍य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे नगर विकास व गृहनिर्माणमंत्री,  एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणा-या ५००शहरांचे महापौर आणि नगराध्यक्ष या कार्यक्रमास उपस्थित होते.

0000

लीलाधर हेगडे व डॉ. वीरा राठोड यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 25: साहित्य क्षेत्रात योगदान देणा-या लेखकांसाठी बुधवारी साहित्य अकादमीतर्फे वर्ष 2015 चा युवा साहित्य पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार आणि साहित्य अकादमी भाषा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील शाहीर लीलाधर हेगडे आणि डॉ. वीरा राठोड यांचा समावेश आहे.
          शाहीर लीलाधर हेगडे यांनीपाचूचे बेट,अंधारातून प्रकाशाकडे, हणमू आणि इतर गोष्टी’‘मनी हरवली मनी सापडलीया बालसाहित्याची निर्मिती केली. यासह त्यांनी लहान मुलांकरिता अनेक गाणी तयार केली. लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी याचा प्रयत्न त्यांनी साहित्यातून केला. त्यांच्या बाल साहित्यातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. बाल साहित्याकरिता मराठी विभागाच्या परीक्षणाचे काम भारत सासणे, सतीश काळसेकर, यशवंत मनोहर या साहित्यिकांनी केले.  हा पुरस्कार 14 नोव्हेंबर 2015 ला मुंबई येथे एका कार्यक्रमात दिला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये रोख असे आहे.
डॉ. वीरा राठोड यांना 2015 सालचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार त्यांच्या सेन साई वेसया काव्यसंग्रहाकरिता जाहीर झाला आहे. हा काव्यसंग्रह भटक्या बंजारा संस्कृतीवर आहे. या काव्यसंग्रहात 42 कविता आहेत. युवा पुरस्काराच्या परिक्षणाचे काम डॉ. दिलीप धोंगडे, डॉ. आनंद पाटील, प्राध्यापक राजन गवस या ज्येष्ठ साहित्यिकांनी  केले. युवा पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये रोख असे आहे.
कोकणी भाषेकरिता साहित्यिक श्रीनिशा नायक यांना खन्ये गेली आजीया काव्यसंग्रहाकरिता युवा पुरस्कार जाहीर झाला तसेच रामनाथ गावडे यांना त्यांच्या सादु आणि जादुगर मधूया कादंबरीकरिता बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला.
          यावर्षी युवा पुरस्कारासाठी 23 भाषांमधील 13 काव्यसंग्रह, 3 कांदबऱ्या, 6 लघुकथा संग्रह, 1 साहित्य समीक्षा या पुस्तकांची निवड करण्यात आली. बाल साहित्य पुरस्कारांकरिता 24 भाषेतील 5 कांदबऱ्या, 4 कथासंग्रह 3 काव्यसंग्रह 1 एकपात्री प्रयोगाचे पुस्तक, 11 लेखकांची बाल साहित्यातील योगदानाकरिता निवड करण्यात आली.

000

आता सोशल मीडियातील लेखनासाठीही पत्रकारिता पुरस्कार राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2014 साठी 31 जुलैपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन व्यक्ती, संस्था, संघटनेकडून येणा-या शिफारसींचाही विचार होणार

मुंबई,दि.25 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार याबरोबरचआता सोशल मीडियातील लेखनासाठीही पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2014 ते 31 डिसेंबर 2014पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै2015असा आहे.
या स्पर्धेत आता कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा संघटनेला पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तीच्या नावांची शिफारस करता येणार आहे. पत्रकारितेत काम करणा-या व्यक्तीने अर्ज केला नसेल, मात्र तिची शिफारस कुठल्याही व्यक्ती किंवा संस्था, संघटनेने केली असेल तर त्याचा पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो. तथापि, अशी शिफारस करताना प्रवेशिका सादर करण्याबाबतच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
2014या कॅलेंडर वर्षात प्रसिद्ध झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या तसेच सोशल मिडियासंदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे :
राज्यस्तर (मराठी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार41 हजार रुपये, मानचिन्ह वप्रशस्तीपत्र आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व.ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र. 

विभागीय पुरस्कार :
नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत);औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; 
पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; 
कोकण विभाग: शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.

नियम व अटी
          पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/ विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
पत्रकारांच्या, तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असले तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
2014या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा

          इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु. ल. देशपांडे पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.
 पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत.
वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/ संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/ कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/ जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळ मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
सोशल मीडिया पुरस्कार, रु. 41 हजार मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
          ही स्पर्धा संकेतस्थळे व ब्लॅाग या सोशल मीडियातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयक मजकुरासाठी आहे. या स्पर्धेत संकेतस्थळे व ब्लॉग सोशल मीडियाचा वृत्त/ पत्रकारिता विषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगव्दारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले  असावे. त्याचप्रमाणे,      वृत्त/ पत्रकारिताविषयक संकेतस्थळ हे अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडियाचा वापर करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या  विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या  विविध योजनांना पूरक  अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने वा त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाव्दारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट ) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील
छायाचित्रकार पुरस्कार
         
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांकरिता आहे.

-5-
2014च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.
एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

0 0 0 0