शुक्रवार, २६ जून, २०१५

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिले नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण

नवी दिल्ली, दि. 25 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळ्याचे निमंत्रण दिले.
 पंतप्रधानांचे निवासस्थान 7, रेसकोर्स रोड येथे मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांना सिंहस्थ मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले.
          या निमंत्रणात म्हटले आहे, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी जुलै महिन्यापासून सिंहस्थ मेळा सुरु होत आहे. या सिंहस्थ मेळ्याला आंतरराष्ट्रीयख्याती प्राप्त असून भारतीय अध्यात्माशी नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचे घट्ट नाते आहे. साधू महात्मे, श्रध्दाळू, भक्त यांच्यासह आध्यात्मिक  संशोधक आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने या सिंहस्थ मेळ्यात सहभागी होणार आहेत.

          विकासात आघाडीवर असणा-या नाशिक शहरात हा सिंहस्थ कुंभमेळा होत असून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी प्रकल्पात समावेश होण्याची क्षमता या  शहरात आहे. पंतप्रधानांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उपस्थितीने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थालाही एक वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे निमंत्रणात म्हटले आहे.          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा