नाशिक, दि.25 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत
अभियान(नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ची अंमलबजावणी
सुरु झाली असून या अभियानाचाच एक भाग म्हणून नाशिक विभागातील सर्व महानगरपालिकांचे
महापौर, आयुक्त आणि नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा
व ‘नाशिक विभागाचा, संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन 27 जून रोजी सकाळी 9.30 ते 4.30 या दरम्यान डॉ. मुंजे इन्स्टिट्युट भोसला
मिलिटरी स्कूल नाशिक येथे करण्यात आले
आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यशाळेला उपस्थित
महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त आणि मुख्याधिकारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वच्छतेचा
संकल्प देणार आहेत. कार्यक्रमास
पालकमंत्री गिरीष महाजन, नगरविकास
राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, नगरविकास विभागाच्या सचिव व अभियानाच्या नोडल सचिव
मनिषा म्हैसकर, संचालक तथा आयुक्त नगरपालिका प्रशासन मीता राजीव लोचन, विभागीय
आयुक्त एकनाथ डवले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन
क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मान्यवर घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध शास्त्रोक्त पद्धतींविषयी मार्गदर्शन
करणार आहेत.
शहरे स्वच्छ व्हावीत यासाठी कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण
आणि विल्हेवाट, शौचालयाचा 100 टक्के वापर , कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने
प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रकिया, स्वच्छ
व हरित महाराष्ट्र, स्वच्छता उपक्रमातील
लोकसहभाग आणि उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार यावर आधारित स्वच्छ
महाराष्ट्र अभियानाच्या ‘सप्तपदी स्वच्छतेची’ ही संकल्पना पुढे आली आहे.
राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांमधून साधारण 20 हजार
मेट्रीक टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा शास्त्रोक्त
पद्धतीने होणे आवश्यक आहे, या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा