सोमवार, ४ जून, २०१२

परिवहन संवर्गातील काही वाहनांना मानक एआयएस :018 शी अनुरुप

मुंबई, दि. 2 : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 118 च्या उपनियम -1 नुसार राज्यातील परिवहन संवर्गातील काही प्रकारच्या वाहनांना मानक एआयएस :018 शी अनुरुप वेग मर्यादा नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) बसविणे सक्तीचे करणारी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
वाहन चालकांनी हे वेग मर्यादा नियंत्रक साधन अशा प्रकारे बसवावे की, ते राज्य परिवहन प्राधिकरण किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अधिकृत मोहोरेसह मोहोरबंद करता येईल आणि मोहोर (सील) तोडल्याशिवाय ते काढून टाकता येणार नाही किंवा त्यात अनधिकृत फिरवाफिरव करता येणार नाही.
            वेग नियंत्रक बसविणे सक्तीचे असलेल्या वाहनांचे प्रवर्ग आणि नियंत्रक बसविण्यासाठी नेमून दिलेल्या तारखा अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत.
            नवीन नोंदणी होणाऱ्या शालेय बसेस- 1 मे 2012 पासून नोंदणीच्या वेळी ; 30 एप्रिल 2012 पूर्वी नोंदणी केलेल्या शालेय बसेस -  1 मे 2012 नंतर आणि 1 सप्टेंबर 2012 पूर्वी योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस) नूतनीकरणाच्या वेळी ; नव्याने नोंदणी होणारे टँकर्स व डंपर्स - 1 जुलै 2012 पासून नोंदणीच्या वेळी ;30 जून 2012 पूर्वी नोंदणी केलेले टँकर्स व डंपर्स - 1 जुलै 2012 नंतर किंवा 1 जुलै 2013 पूर्वी यापैकी जे अगोदर येईल त्या दिनांकास योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळी;  नव्याने नोंदणी होणारी करारावरील वाहने आणि खासगी सेवा वाहने (ऑटोरिक्षा, मीटर कॅब, दुचाकी टॅक्सी वगळून)- 1 सप्टेंबर 2012 पासून नोंदणीच्या वेळी ; 31 ऑगस्ट 2012 पूर्वी नोंदणी केलेली करारावरील वाहने (ऑटोरिक्षा, मीटर कॅब, दुचाकी टॅक्सी वगळून) आणि खासगी सेवा वाहने- 1 सप्टेंबर 2012 नंतर किंवा 1 सप्टेंबर 2013 पूर्वी यापैकी जे अगोदर येईल त्या दिनांकास योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस) नूतनीकरणाच्या वेळी ; राष्ट्रीय परवान्यावर नव्याने नोंदणी होणारी माल वाहतूक वाहने- 1 नोव्हेंबर 2012 पासून नोंदणीच्या वेळी ; 31 ऑक्टोबर 2012 पूर्वी नोंदणी केलेली राष्ट्रीय परवान्यावरील मालवाहतूक वाहने - 1 डिसेंबर 2012 नंतर किंवा 1 नोव्हेंबर 2013 पूर्वी (यापैकी जे अगोदर येईल त्या दिनांकास) योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस) नूतनीकरणाच्या वेळी.
             ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग 4-अ मध्ये  दिनांक 25 मे 2012 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 0 0 0
मुंबई दि. 2: भारतीय प्रशासन सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आज हे आदेश निर्गमित करण्यात आले.
यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती प्रकल्प, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धीरज कुमार यांची बदली जिल्हाधिकारी नांदेड (पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून) येथे करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन मुद्गल यांची बदली जिल्हाधिकारी यवतमाळ म्हणून तर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निरूपमा डांगे यांची बदली सह विक्रीकर आयुक्त, औरंगाबाद (पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून) या पदावर करण्यात आली आहे.
चंद्रपूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी शितल उगले यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव (पद कनिष्ठ समय श्रेणीत अवनत करून) येथे करण्यात आली आहे.
. . .

'दिलखुलास' कार्यक्रमात

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसारित होणाऱ्या 'दिलखुलास' कार्यक्रमात राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी हे 'युवक धोरणाचे स्वरुप आणि महत्त्व' तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती देणार आहेत.
राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरुन ही मुलाखत दि.4,5,6 आणि 7 जून 2012 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. श्रीमती ज्योती अंबेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
---------

माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने

मुंबई, दि. 2 : माहिती व तंत्रज्ञान  सुविधांचा वापर वाढावा, त्यातून शासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता यावी यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आय.टी. प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. दैनंदिन कामकाजात मायक्रोसॉफ्ट ॲप्लीकेशनच्या वापराबरोबर माहिती तंत्रज्ञान सुविधांचा वापर वाढण्याच्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने मंत्रालय स्तरावर आय.टी लॅब सुरु करावी  आणि येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सुविधांच्या वापराबाबतचे प्रशिक्षण द्यावे, असे प्रतिपादन मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनी केले.
महा ऑनलाईन, मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन आणि माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या टेक सॅटर्डे या उप्रकमामध्ये आज मुख्य सचिवांच्या हस्ते मायक्रोसॉफ्ट लिंकचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या विविध विभागांमध्ये आणि त्यांच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे असे सांगून मुख्य सचिव म्हणाले की, यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होईल. शासकीय विभागातील कोणत्या विषयांच्या फाईल्सचे रुपांतर ई-फाईल्समध्ये करता  येईल याचा देखील  माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने अभ्यास करावा असे सांगून ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी नियमित स्वरूपात असे प्रशिक्षण वर्ग घेणे गरजेचे आहे. शासकीय कामकाजाचे नियोजन, बैठकांमधील सुसूत्रता आणि माहितीच्या आदान प्रदानातील अचूकता आणि अद्ययावतता यासाठी देखील माहिती तंत्रज्ञान सुविधांचा अचूक वापर करून घेता आला पाहिजे.
माणूस म्हणून आपण प्रत्येक क्षणाला नवनवीन काही तरी शिकत असतो. त्यातून आपली क्षमता वृद्धी होत असते. आपल्यातील कौशल्यवृद्धी करतांना माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपल्या कामात दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी आणि माहिती व तंत्रज्ञान सुविधांचा वापर वाढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान संचालनालयातर्फे टेक सॅटर्डेसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे माहिती व तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
शासनात दैनंदिन काम करतांना मायक्रोसॉफ्ट ऑफीस या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. यामध्ये अत्यंत उपयुक्त असलेल्या परंतू माहीत नसलेल्या किंवा वापरत नसलेल्या आज्ञावलींची माहिती यावेळी करून देण्यात आली. यामध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल, आऊटलूक एक्सप्रेस, मायक्रोसॉ‌फ्ट पॉवर पॉईंट, यासारख्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमधील  विविध ॲप्लीकेशन्सचा उपयोग करून काम अधिक अचूकतेने कसे करता येते, त्यात गती कशी आणता येते हे डॉ. नितीन परांजपे यांनी यावेळी सोदाहरण समाजावून सांगितले.
. . .

दूध भुकटीवरील निर्यात बंदी उठविण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई, दि. 2 : दूध भुकटीवरील निर्यात बंदी उठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत केले आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेतला. इतर काही कृषी उत्पादनांप्रमाणे दूध भुकटीच्या निर्यातीला सबसिडी देण्याचा विचार करण्याचे या बैठकीत ठरले त्याचेही मुख्यमंत्री यांनी स्वागत केले. या बैठकीस केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते.
          स्थानिक दुधाच्या किमती नियंत्रणात राहाव्यात म्हणून केंद्र सरकारने फेब्रुवारी 2011 पासून निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता.  दूध भुकटीच्या अतिरिक्त साठ्यामुळे भुकटी उत्पादक आणि पर्यायाने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. राज्यामध्ये निर्माण झालेला 24 हजार मेट्रिक टन दूध भुकटीचा साठा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने खरेदी करावा त्याचप्रमाणे निर्यात बंदी उठवावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील होते. त्यांनी  दुध उत्पादकांच्या भावना कृषी मंत्रालयाच्या कानी घातल्या होत्या. राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याने या संदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही केला होता.
या संदर्भात 30 मार्च 2012 रोजी मुख्यमंत्र्यांनी बैठकही घेतली होती. या बैठकीत ठरल्यानुसार निर्यात बंदी उठविण्यासाठी केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री याना विनंती करण्यात आली होती. 15 मे 2012 रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधीबरोबर बैठक घेऊन केंद्राला तातडीने निर्यात बंदी उठविण्याबाबत विनंती केली.
          राज्यात दुधाचे संघटित क्षेत्रात प्रतिदिन 113 लाख लिटर दूध संकलित होते. यापैकी 36 लाख लिटर सहकारी तर उर्वरित खाजगी व शासनातर्फे दूध संकलित होते. दुधाची प्रत्यक्षात प्रतिदिन 75 लाख लिटर विक्री होते. 10 लाख लिटर दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात, तर 28 लाख लिटर दुधाचे रुपांतर दूध भुकटी आणि लोण्यामध्ये केले जाते. तसेच आजपर्यंत 24 हजार मेट्रिक टन दूध भुकटीसाठा पडून आहे. यामुळे दूध भुकटी उत्पादकांसमोर खेळते भांडवल आणि साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
00 0 0

उत्कृष्ट स्काऊट-गाईड शिक्षकांना

 दरवर्षी शिक्षक दिनी आयोजित करण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका स्काऊटर आणि गाईडरला राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेतर्फे दादर येथील शिवाजी पार्क स्काऊटस् गाईड पॅव्हेलियनमध्ये आज राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर गाईडर पुरस्कार आणि प्रा.बापूसाहेब टी.पी.महाले स्काऊट गाईड जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
          आज संपूर्ण भारतात सुमारे 47 लाख स्काऊट गाईड असून त्यापैकी सुमारे 15 लाख स्काऊट गाईड एकट्या महाराष्ट्रात आहेत.  या चळवळीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र राज्य देशामध्ये संख्यात्मकदृष्टीने प्रथम क्रमाकांवर असून गुणात्मक वाढीतही अग्रेसर आहे. या यशाचे खरे मानकरी कार्यक्षम स्काऊटर आणि गाईडर आहेत.
        विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण जोपासण्यासाठी ही चळवळ अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने स्काऊट गाईड चळवळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करील. पंतप्रधान ढाल स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, सेवा प्रकल्प, जागतिक साक्षरता दिन, पल्स पोलिओ मोहीम, व्यसनमुक्त जीवन, कुष्ठरोग निवारण, लोकसंख्या विस्फोट दिन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
        राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी महाराष्ट्रात आयोजित केल्यास राज्य शासन त्यासाठी सहकार्य करेल असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने नुकतेच आपले क्रीडा व युवा धोरण जाहीर केले आहे.  या धोरणाच्या उद्दिष्टाला स्काऊट गाईडच्या कार्याचा हातभार लागत असल्याने यापुढे स्काऊट गाईड संस्थेला अधिक ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब धाबेकर आणि संस्थेचे राज्य आयुक्त भा.ई.नगराळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. 
        यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 27 स्काऊटर आणि गाईडर तसेच औरंगाबाद येथील निर्मल ठाकूर ग्यानानी यांचा प्राध्यापक बापूसाहेब टी.पी.महाले जीवन गौरव पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि क्रीडा व युवककल्याण मंत्री पद्माकर वळवी यांचीही भाषणे झाले. आपल्या भाषणात त्यांनी स्काऊट गाईड चळवळीचे महत्व विषद करून या चळवळीच्या विकासासाठी विभागामार्फत सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. 
        या कार्यक्रमास स्काऊटचे राज्य आयुक्त डॉ.वसंत काळे, गाईडच्या राज्य आयुक्त श्रीमती विजया देवरे, राज्य कोषाध्यक्ष बी.सी.हंगे, राज्य चिटणीस शोभना जाधव तसेच स्काऊटर, गाईडर मोठ्या संख्येने उपस्थित होते.