सोमवार, ४ जून, २०१२

परिवहन संवर्गातील काही वाहनांना मानक एआयएस :018 शी अनुरुप

मुंबई, दि. 2 : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 118 च्या उपनियम -1 नुसार राज्यातील परिवहन संवर्गातील काही प्रकारच्या वाहनांना मानक एआयएस :018 शी अनुरुप वेग मर्यादा नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) बसविणे सक्तीचे करणारी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
वाहन चालकांनी हे वेग मर्यादा नियंत्रक साधन अशा प्रकारे बसवावे की, ते राज्य परिवहन प्राधिकरण किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अधिकृत मोहोरेसह मोहोरबंद करता येईल आणि मोहोर (सील) तोडल्याशिवाय ते काढून टाकता येणार नाही किंवा त्यात अनधिकृत फिरवाफिरव करता येणार नाही.
            वेग नियंत्रक बसविणे सक्तीचे असलेल्या वाहनांचे प्रवर्ग आणि नियंत्रक बसविण्यासाठी नेमून दिलेल्या तारखा अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत.
            नवीन नोंदणी होणाऱ्या शालेय बसेस- 1 मे 2012 पासून नोंदणीच्या वेळी ; 30 एप्रिल 2012 पूर्वी नोंदणी केलेल्या शालेय बसेस -  1 मे 2012 नंतर आणि 1 सप्टेंबर 2012 पूर्वी योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस) नूतनीकरणाच्या वेळी ; नव्याने नोंदणी होणारे टँकर्स व डंपर्स - 1 जुलै 2012 पासून नोंदणीच्या वेळी ;30 जून 2012 पूर्वी नोंदणी केलेले टँकर्स व डंपर्स - 1 जुलै 2012 नंतर किंवा 1 जुलै 2013 पूर्वी यापैकी जे अगोदर येईल त्या दिनांकास योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळी;  नव्याने नोंदणी होणारी करारावरील वाहने आणि खासगी सेवा वाहने (ऑटोरिक्षा, मीटर कॅब, दुचाकी टॅक्सी वगळून)- 1 सप्टेंबर 2012 पासून नोंदणीच्या वेळी ; 31 ऑगस्ट 2012 पूर्वी नोंदणी केलेली करारावरील वाहने (ऑटोरिक्षा, मीटर कॅब, दुचाकी टॅक्सी वगळून) आणि खासगी सेवा वाहने- 1 सप्टेंबर 2012 नंतर किंवा 1 सप्टेंबर 2013 पूर्वी यापैकी जे अगोदर येईल त्या दिनांकास योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस) नूतनीकरणाच्या वेळी ; राष्ट्रीय परवान्यावर नव्याने नोंदणी होणारी माल वाहतूक वाहने- 1 नोव्हेंबर 2012 पासून नोंदणीच्या वेळी ; 31 ऑक्टोबर 2012 पूर्वी नोंदणी केलेली राष्ट्रीय परवान्यावरील मालवाहतूक वाहने - 1 डिसेंबर 2012 नंतर किंवा 1 नोव्हेंबर 2013 पूर्वी (यापैकी जे अगोदर येईल त्या दिनांकास) योग्यता प्रमाणपत्राच्या (फिटनेस) नूतनीकरणाच्या वेळी.
             ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग 4-अ मध्ये  दिनांक 25 मे 2012 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा