गुरुवार, २ जुलै, २०१५

राज्यासाठी उपयुक्त सेवांबाबत मुख्यमंत्र्यांची ‘गुगल’शी चर्चा अधिक सुरक्षित आणि स्मार्ट नागपूरसाठी ‘सिस्को’सोबत महाराष्ट्राचा करार

मुंबई,दि.2 :देशभरात डिजिटल इंडियासप्ताहास प्रारंभ झाला असतानाच महाराष्ट्र अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आज राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले. या प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी राज्य सरकारने सिस्को या नेटवर्किंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीशीसॅन फ्रान्सिस्को येथे सामंजस्य करार केला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी उपयुक्त ठरु शकणाऱ्या विविध सेवांबाबतगुगल कंपनीशीही सकारात्मक चर्चा केली.                  
सिस्को ही नेटवर्किंग संदर्भातील साधनांची निर्मिती, संशोधन आणि विक्री करणारी अमेरिकेतीलआघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी सीसीटीव्ही, इंटरनेट, दळणवळणाच्या प्रगत साधनांसह अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचावापर करुन सुरक्षिततेविषयक उपाययोजना करते.नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकारआणि सिस्को यांच्यात एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नागपूर महापालिकेशी समन्वय व सहकार्याने सिस्को विविध उपाययोजना करणार आहे. त्यात अतिप्रगत दळणवळण यंत्रणा, एकात्मिक नियंत्रण, पर्यावरण विषयक तपासणी, सुधारित आरोग्य सुविधा आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री यावेळीम्हणाले, केवळ नागपूरच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्र एक स्मार्ट राज्य व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. स्मार्ट झाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणिकार्यक्षमता वाढल्यावर योग्यवेळी आणि योग्य किंमतीत चांगल्या सेवा प्रदानकरता येतात. त्यात वेगळा हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही. लोकांनासरकारकडून हेच अपेक्षित आहे. त्यामुळे असे स्मार्ट नेटवर्किंग उभारणे हे सरकार, संस्था आणि समाजाच्या फायद्याचे आहे. संपूर्ण महाराष्ट्र स्मार्ट करण्यासाठी आम्ही अधिक सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया सप्ताहाचाप्रारंभ केल्यानंतर पहिल्याच दिवशी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.हा एक अनोखा सुवर्णयोगआहे.सिस्कोचे कार्यकारी उपाध्यक्षपंकज पटेल आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे यावेळीउपस्थित होते.
सॅनफ्रॅन्सिस्को येथे झालेल्या महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्यात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, डेमोग्राफिक डिव्हिडंडचा परिणाम म्हणून तरुणांची मोठी संख्या आणि मानवी संसाधनांमुळे औद्योगिक क्षेत्रात अग्रदूत म्हणून भूमिका बजावण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. महाराष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मोबाईलधारकांची मोठी संख्या, स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे अनेक उपाययोजना करणे सुलभ होत आहे. तसेचराज्याच्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या धोरणामुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होणार असून नवी कार्यसंस्कृती असलेले एकात्मिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तयार होण्यास मदत होईल. सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांशी याबाबत सहकार्य करुन राज्यात एक अनुकूल माध्यम निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी उत्सुक असणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्र हे अतिशय योग्य असे डेस्टिनेशन आहे. यादृष्टीने महाराष्ट्रात होऊ शकणाऱ्या गुंतवणुकीसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्टकेले.
सॅनफ्रान्सिस्को शहरात मुख्यमंत्र्यांनी अनेकमहत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. त्यात इनक्युबेटरप्रमोटर्ससोबत (व्यवसाय व्यवस्थापन प्रवर्तक) झालेल्या बैठकीत त्यांनी स्टॉर्म व्हेन्चर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक संजयसुभेदार, गुंतवणूकदार प्रकाश भालेराव आणि बुलपेन कॅपिटलचे डंकनडेव्हीडसन यांच्याशी चर्चा केली. मोठ्या संख्येने असलेले इनक्युबेटर्स ही सॅनफ्रान्सिस्कोशहराची ओळख आहे. याइनक्युबेटरप्रमोटर्सकडून संबंधित संस्थेसाठी प्रारंभीची उभारणी आणि अनुषंगिक बाबींची पूर्तता (स्टार्टअप) करण्यात मोठी भूमिका बजावण्यात येते. भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात इनक्युबेटरप्रमोटर्सचीभूमिका महत्त्वाची ठरू शकेल. गेल्या वर्षभरातच देशात तंत्रज्ञानाविषयक 800 नवीन उद्योजकांनी आपल्या कार्यास सुरुवात केली असूनगुणवत्तापूर्ण शिक्षण, रोजगार निर्मिती, गुंतवणूक आकर्षितकरणे, नवीन संशोधन आणि ज्ञानवृद्धी यादृष्टीनेहास्टार्टअपमहत्त्वाचा तसेच उपयुक्त ठरू शकेल.
मुख्यमंत्र्यांनी गुगल या प्रसिद्ध कंपनीच्यामुख्यालयास भेट देऊन कंपनीच्या ज्येष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा केली. स्ट्रीट व्ह्यू,अ‍ॅक्सेस आणि शिक्षण या क्षेत्रात रचनात्मकभागिदारी करण्यासंदर्भात ही चर्चा झाली.यावेळी गुगलच्या विविध सेवांबाबत व आगामी तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करण्यात आले.  राज्यासाठी उपयुक्त व पथदर्शी ठरू शकणाऱ्या ठरणाऱ्या तंत्रज्ञानाची निश्चिती करण्यासाठी गुगलचे एक पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पाठविण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.उद्योगमंत्री सुभाष देसाईयावेळीउपस्थित होते.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीसिक्युरिटी सेंटर ऑफ एक्सलंसस्थापनकरण्यासंदर्भात सिमॅन्टेकच्यापदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
-----०-----

स्व. वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

धुळे, दि. 1 :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी  तुकाराम हुलवळे  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात  स्व. वसंतराव नाईक   यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
             यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, श्रीमती हेमांगी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे,  चिटणीस (महसूल) सुरेश थोरात, नायब तहसिलदार (सामान्य) गिरीश कुळकर्णी, प्रशांत कुलकर्णी,  अधिकारी, कर्मचारी  आदी उपस्थित होते.
00000


डिजीटल इंडिया सप्ताहात 4 जुलै रोजी आयोजित ई-दुनिया कार्यक्रमाचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन

धुळे, दि. 1 :-  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. 1 जुलै पासून डिजीटल इंडिया सप्ताह जाहीर केला आहे.  या सप्ताहामध्ये दि. 4 जुलै, 2015 रोजी भारतीय डाक विभागामार्फत ई-दुनिया दिवस साजरा करण्यात येणार आहे. ई-दुनिया कार्यक्रमा अंतर्गत ग्राहकांची सर्व प्रकारची बचत खाती, बचत पत्रे व टपाल जीवन विमा हे त्यांच्या आधारकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार आहे.  ग्राहकांनी आपला आधार कार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक आपल्या खात्याशी, टपाल जीवन विमाशी संलग्न करण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत संबंधित डाक कार्यालयात जमा करावी, असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

डिजीटल इंडिया सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ

धुळे, दि. 1 :- केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी असलेल्या डिजीटल इंडिया सप्ताहाचा शुभारंभ नवीदिल्ली येथे  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाला. डिजीटल इंडिया एक व्यापक कार्यक्रम आहे.   दि. 1 ते 7 जुलै पर्यंत डिजीटल इंडिया सप्ताहात विविध सेवांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. 
            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने वेबकास्ट मार्फत दूरदर्शनवरून थेट प्रसारित करण्यात आलेल्या डिजीटल इंडिया सप्ताह शुभारंभ कार्यक्रमाचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी श्रीमती हेमांगी पाटील, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, नरेंद्र भामरे, आशिष वांडरे, प्रकाश बसवा, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000