शुक्रवार, २ मार्च, २०१२

तंबाखूच्या दुष्परिणामांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार - उपमुख्यमंत्री


मुंबई, दि, 1 : तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल लहानवयातच जनजागृती व्हावी याकरीता इयत्ता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात तंबाखूच्या दुष्परिणामांचा समावेश करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
            तंबाखूविरोधी कार्यप्रणालीबाबत आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अन्न औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, राज्यमंत्री सतेज पाटील, विधी न्याय विभागाचे प्रधान सचिव व्ही.एल. अचलिया, अन्न औषध प्रशासन विभागाचे सचिव इक्बालसिंग चहल, आरोग्य सचिव भूषण गगराणी, सलाम बॉम्बे फाऊंडेशनचे डॉ.पंकज चतुर्वेदी, महाराष्ट्र युनायटेड अगेन्स्ट किलर टोबॅको कॅम्पेनचे डॉ.आर बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तरूणांमधील वाढत्या व्यसनाधिनतेमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. हे टाळण्याकरीता तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे.
            ते पुढे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत मुख्य सचिवांना सादर होणाऱ्या मासिक अहवालात शैक्षणिक संस्थांच्या आवारात गुटखा विक्री करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा उल्लेख करण्याबाबत निर्देश देण्यात येतील.
0 0 0 0 0

राज्य विकासाचे मुलभूत विचार पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी मांडले - मुख्यमंत्री


मुंबई दि. 1 :  समाजकारण, अर्थकारण, राजकारण, सहकार, शिक्षण, कृषी आणि जलसंधारण यासारख्या विविध विषयांमध्ये राज्याचा जो विकास झाला त्याचा मुलभूत विचार मांडण्याचे काम सहकार महर्षी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
श्रीलक्ष्मी महिला सहकारी बँक, सांगली यांनी पाठवलेल्या प्रस्तावास मान्यता देऊन भारतीय टपाल खात्याने डॉ. वसंतदादा पाटील यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकिट आज जारी केले. या टपाल तिकटाचे अनावरण आज वसंतदादांच्या 23 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री मधुकर चव्हाण, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, वसंतदादांच्या पत्नी तथा माजी मंत्री शालिनीताई पाटील, आमदार माणिकराव ठाकरे, मुख्य पोस्ट मास्तर जनरल श्रीमती उमेरा अहमद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी श्रीमती उमेरा अहमद यांच्या हस्ते या टपाल तिकिटाच्या अल्बचे प्रकाशन करण्यात आले तर उपस्थित काही मान्यवरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.
डॉ. वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व, त्यांचा आदर्श नव्या पिढीने आवर्जुन ठेवावा इतके अनन्यसाधारण स्वरूपाचे काम त्यांनी केले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विभागीय असमतोलासारखा गंभीर विषय दादांनी पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर मांडला आणि तो प्रश्न सोडविण्यासाठी  वि. . दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीची स्थापना केली. त्याप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज आणि पाटबंधारे क्षेत्रात पाणी अडवा-पाणी जिरवा सारखे महत्त्वाचे आणि राज्याच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे विषय त्यांनी अतिशय कुशलतेने सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. ऍ़ड. शालिनीताई पाटील यांनी दादांचे हे कार्य पुढे चालू ठेवल्याने त्यांच्या प्रयत्नातून आज  प्रकाशित झालेल्या दादांच्या टपाल तिकिटामुळे दादांचे कार्य देशभर समजण्यास मदत होईल, नवी पिढी त्यातून नक्कीच प्रेरणा घेईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
वसंतदादा म्हणजे प्रत्येकाला आपला वाटावा असा साधा आणि सरळ पण अतिशय दूरदृष्टीचा माणूस अशा शब्दात वसंतदादांच्या कार्याचा गौरव करून वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले की, आर्थिकदृष्टया समृद्ध असणाऱ्या या राज्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा विस्तार हे ही त्यांच्या कार्याचे एक वैशिष्ट्य आहे. लोकशाहीमध्ये नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसंतदादा असून त्यांच्या कार्यकुशलतेचा गौरव म्हणून सांगली मध्ये त्यांचे स्मारक बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
            आपल्या प्रास्ताविकात शालिनीताई पाटील यांनी दादांनी विविध क्षेत्रात केलेल्या लक्षवेधी कामगिरीचा आढावा घेतला.
0 0 0 0 0

100 कोटी झाडं लागवडीचा नियोजनबध्द कार्यक्रम राबविणार - डॉ. पतंगराव कदम


मुंबई, दि. 1 : राज्यात 100 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून या उद्दिष्टपूर्तीसाठी येत्या वर्षात नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करावी तसेच लावलेली रोपे जगविण्याच्या दृष्टीने संबंधितांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश वनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे दिले.
             आज मंत्रालयात आयोजित वन विभागाच्या साप्ताहिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
            राज्यात यावर्षी 100 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून झाडे लावण्यासाठी 97 टक्के रोपांची तयारी झाली आहे तर 25 टक्के खड्डे रोप लागवडीसाठी तयार आहेत. रोप लागवडीसाठी 1 जून 2012 पूर्वी  नियोजनबध्द आराखडा तयार करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
          मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी तयार केलेल्या वनक्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनावर आधारित माहितीपट सीडीचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते यावेळी उदघाटन करण्यात आले.

वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक असून वाघ मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना टाळण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात यावी तसेच राज्यातील अभयारण्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीतून जास्तीत जास्त वनतळी बांधण्यात यावीत, अशा सूचनाही श्री. कदम यांनी यावेळी केल्या.  
            या बैठकीत राज्यातील अभयारण्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्र तयार करणे, वनजमिनीचे दप्तर अद्ययावत करणे, वृक्षतोड बंदी, अभयारण्यातील धोकादायक गावांचे पुनर्वसन, वनविभागाची न्यायालयीन प्रकरणे, वनमजुरांना कायम करणे, वनविभागाच्या प्रसिध्दी विभागाचे सक्षमीकरण इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला.
0 0 0 0 0