बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

नागरिकांना सेवा देतांना कालमर्यादा पाळणे आवश्यक -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


  धुळे, दि. 7 :- पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित सेवा मिळणे आवश्यक आहे.  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा देतांना कालमर्यादा पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात यशदा, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसेवा हमी हक्कउदबोधन कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी  श्री. मिसाळ यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  यशदाच्या सहाय्यक प्राध्यापक श्रीमती अनिता महिरास, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या श्रीमती विद्या पाटील  आदी उपस्थित होते. 
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले, या अधिनियमांची माहिती होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  लोकाभिमुख, पारदर्शक सेवा मिळण्यासाठी लोकसेवा हमी हक्क अधिनियम 2015 मध्ये 46 प्रकारच्या सेवा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विहीत  कालावधीत सेवा दिली नाही तर संबंधितास दंड करण्याची तरतूद आहे.  जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे पालन करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळा, प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी श्री. मिसाळ पुढे म्हणाले, नवीन अधिनियमानुसार नागरिकांना चांगल्या प्रतीची, वेळेत सेवा देण्याची शासनाने हमी घेतलेली आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला चांगली सेवा देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी बांधिल आहेत.  या अधिनियमात दंडाची तरतूद असली तरी दंडाची वेळ कोणावर येणार नाही  यासाठी  कालमर्यादेत सेवा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
            सहाय्यक प्राध्यापक श्रीमती अनिता महिरास यांनी सांगितले की, लोकसेवा हमी हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना उदबोधन प्रशिक्षण देण्यात येत असून जिल्ह्यात 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर, 2015 पर्यंत  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत 720 व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा.  या अधिनियमात चांगल्या काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असेही सांगितले.
            डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हमी हक्क अधिनियम-2015 ची तपशिलवार माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन  जे. ओ. भटकर यांनी केले.  या कार्यशाळेत शिरपूरचे उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शेखर रौंदळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. एन. बोर्डे, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000000