मुंबई दि. 3 : पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या दुसऱ्या वर्षीच्या निकषांना 6,835 ग्रामपंचायती पात्र ठरल्या असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आज विधानसभेत यासंबंधीचे निवेदन केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास सचिव सुधीर ठाकरे उपस्थित होते.
राज्यात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या अंमलबजावणीतून गावांचा पर्यावरण पोषक शाश्वत विकास करण्यात येत असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, पहिल्या वर्षी 27,920 ग्रामपंचायतींपैकी 12,193 ग्रामपंचायतींनी पहिल्या वर्षीचे निकष पूर्ण केले. त्यांना लोकसंख्येच्या निकषानुसार 353.76 कोटी रुपयांचे विशेष अनुदान वितरित करण्यात आले. यापैकी 6,835
ग्रामपंचायतींनी योजनेचे दुसऱ्या वर्षीचे निकष पूर्ण केले आहेत. त्यांना सुमारे 275 कोटी रुपयांचा विकास निधी विविध विकास कामांसाठी दिला जाणार आहे.
दुसऱ्या वर्षीच्या निकषांमध्ये पहिल्यावर्षी लावलेल्या झाडांपैकी किमान 25 टक्के झाडे जगली पाहिजेत, लोकसंख्येच्या प्रमाणात दुसऱ्यावर्षी किमान 75 टक्के झाडे लावली पाहिजेत, 75 टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबाकडे शौचालये असली पाहिजेत व ती वापरात पाहिजेत, ग्रामपंचायतींची करवसुली 80 टक्के इतकी झाली पाहिजे, संत गाडगेबाबा तसेच यशवंत पंचायतराज अभियानात प्रत्येकी 50 टक्के गुण मिळाले पाहिजेत, सार्वजनिक ठिकाणी सीएलएफ आणि एलईडी बल्ब चा किमान 50 टक्के वापर असला पाहिजे, गावातील 100 टक्के कचरा संकलन आणि त्यातील 50 टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे, 50 टक्के सांडपाण्याचे नियोजन झाले पाहिजे आणि गावात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिक वापराला बंदी असली पाहिजे यासारख्या निकषांचा समावेश होता.
या यशस्वी गावांपैकी 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांचा पर्यावरण विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याकरिता स्वतंत्र योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची योजनाही सुरु करण्यात आल्याचे तसेच दुसऱ्या वर्षी योजनेतील
पहिल्या वर्षीचे निकष पूर्ण करण्याऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 2226 इतकी
असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
000