बुधवार, ४ एप्रिल, २०१२

गणपतराव देशमुखांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक - शिवाजीराव देशमुख


मुंबई, दि. 3 : विधानमंडळाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासारखा ध्येयवादी नेता आज सतत 50 वर्षे कष्टकरी व श्रमजीवी लोकांचे नेतृत्व करीत आहे. तरुण पिढीसाठी गणपतराव देशमुख हे व्यक्तिमत्व दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे, असे गौरवद्‌गार विधानपरिषदेचे सभापती  शिवाजीराव देशमुख यांनी आज येथे काढले.
विधिमंडळातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या विधानमंडळातील कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने विधिमंडळ पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सभापती श्री.देशमुख बोलत होते.
गणपतराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने विधिमंडळात नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे उपस्थित केले, असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्याने सतत 50 वर्षे गणपतराव देशमुखांना विधानसभेत प्रतिनिधीत्व दिले. यातच त्यांचे स्थान किती उजवे आहे हे दिसून येते, असे उद्‌गार ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी काढले.
कष्टकरी, श्रमजीवी जनतेवर अन्याय होणार नाही, हे तत्व देशमुखांनी सुरुवातीपासून स्वीकारले आणि आजही ते या तत्वापासून तसूभरही ढळले नाहीत. राजकारणात विचारसरणीला फार महत्व आहे, याची सुरुवात गणपतरावांनी केली, या शब्दात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी त्यांचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देतांना सत्कारमूर्ती गणपतराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील 13 तालुके आजही दुष्काळी आहेत. तेथे भरपूर पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यातील पाणी आणण्याचा प्रयत्न मला करायचा आहे आणि मी निरंतर यासाठी प्रयत्न करणार आहे.
-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा