सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण विद्यार्थी परिषदेतून होते-मुख्यमंत्री

नागपूर, दि.२२-राष्ट्रीय भावनेशी प्रेरीत होऊन विद्यार्थी परिषदेत येतात. ख-याअर्थाने राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण या ठिकाणी होते,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 विद्यार्थी परिषदेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही कालावधीनंतर नेतृत्वगुण निर्माण होतो.जेव्हा जेव्हा देशावर संकट येतो,त्यावेळी युवाशक्ती सर्वात पुढे असते. राष्ट्रीय भावनेचे बिजारोपन करणाऱ्या या नूतन इमारतीचा उपयोग चांगल्याप्रकारे करावा. या इमारतीच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवावे,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पीठाधीश श्री. देवनाथ मठ,अंजनगाव,आचार्य जितेंद्रनाथ महाराज, खासदार अजय संचेती, प्रमिलाताई मेंढे, शांताआक्का ,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, राष्ट्रीय संघटक मंत्रीसुनिल अंबेकर, राष्ट्रीय महामंत्री   श्रीहरी बोरीकर,  प्रांत अध्यक्ष, डॉ. केदार, ठोसर,  सचिन रणदिवे  यांची प्रमुख उप स्थिती होती.
सशक्त राष्ट्रनिर्माण करणे आणि ध्येयाने प्रेरित असलेले युवक निर्माण करणे गरजेचे आहे हे महत्वाचे कार्य विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केले जाते. राष्ट्र निर्माण आणि विकासासाठी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रकार्य, संघटन, ज्ञान आणि ज्ञानासोबत चारित्र्य एकत्रित असणे महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून नवीन पिढी एकत्रित येण्याची महत्वपूर्ण प्रक्रिया घडत असून देशात युवकांची लक्षणीय संख्या आहे.या युवकांमध्येच प्रचंड ऊर्जा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या युवाशक्तीच्या ज्ञानाला योग्य दिशा मिळाल्यावर जगात देशाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. वैयक्तिक ध्येयाचा पाठपुरावा करत असतांना समाजाच्या हितासाठीही युवकांनी वेळ देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रशिक्षण रुजविण्याची गरज व्यक्त करुन ते म्हणाले राष्ट्रकार्याच्या यज्ञाचे प्रतिक म्हणून हे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी   सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्या हस्ते छात्रसेना मासिकाचे विमोचन करण्यात आले.
तत्पूर्वी  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच खासदार अजय संचेती यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी राष्ट्रीय संघटक मंत्रीसुनिल अंबेकर, , राष्ट्रीय महामंत्री   श्रीहरी बोरीकर,  प्रांत अध्यक्ष, डॉ. केदार, ठोसर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रफुल्ल आकांत यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी नक्षिणे यांनी केले.
                                                            *****


विकास कामावर आधारित माहिती विभागाने तयार केलेल्या चित्ररथाला मुख्यमंत्र्यांनी दाखविली झेंडी




नागपूर, दि.22 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त विकास कामावर आधारित तयार केलेल्या चित्ररथाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखविली.
कालिदास समारोहाच्या पार्श्वभूमीवर देशपांडे सभागृहाच्या परिसरात भव्य चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्हयातील पर्यटन, ऐतिहासिक वास्तू विविध  कलाकुसरावर आधारित हे प्रदर्शन  असून त्याचे आज उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. या प्रदर्शनाला जोडूनच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे यांनी सचित्र माहिती देणारे चित्ररथ तयार केले आहे. या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून आज शुभारंभ करण्यात आले.
एलईडीच्या माध्यमातूनशासनाच्या विविध योजनांची माहिती दाखविली जाणार आहे.  नागपूर जिल्हा  व नागपूर विभागातील सर्व जिल्हयांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात  येत आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार  अनिल सोले, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माहिती संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, वर्धेचे जिल्हा माहिती अधिकारी  अनिल गडेकर, भंडाऱ्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आदी उपस्थित होते.

0 0 0 0

कालिदास समारोहाला आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे स्वरुप - देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.22 :कालिदास महोत्सव पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला असून आता हा महोत्सव खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. विदर्भातील कला, पर्यटन, ऐतिहासिक स्थळे तसेच वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा यांची ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात कालिदास समारोहाच्या आयेाजनासोबतच  पूर्व विदर्भातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची माहिती असलेल्या आकर्षक अशा पर्यटन प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी  मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.  
चीनचे काऊंसलेट जनरल श्री.चाँग आणि श्रीमती ली,  तसेच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रा. अनिल सोले, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.
पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर विविध दालनांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालिदास महोत्सवाला पुन्हा सुरुवात होत असून या महोत्सवास चीनचे शिष्टमंडळ उपस्थित असल्यामुळे हा महोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव झाला आहे. पर्यटन प्रर्दशनीला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील पर्यटनाला अधोरेखीत होत असलेल्या या प्रदर्शनीच्या माध्यमातून विदर्भातील समृद्ध वनसंपदा, वन्य जीव, पुरातत्व व ऐतिहासिक महत्वाची स्थळे  यांच्या माध्यमातून विदर्भाची समृद्ध संस्कृती पहायला मिळत आहे.
विदर्भातील पर्यटनाला चालना देणाऱ्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करतांनाच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वन्यजीव पर्यटन ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनाकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करु शकेल असा वारसा असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर प्रेस फोटोग्राफर तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांची ओळख असलेली प्रदर्शनी हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनीत लावण्यात आलेल्या छायाचित्रांची पाहणी केली. पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चीनचे भारतातील काऊंसलेट जनरल श्री. चाँग यांनी उद्घाटन फलकावर स्वाक्षरी केली.
कालिदास महोत्सव आयेाजन समिती समारोह आयोजन समिती  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आला असून 23 नोव्हेंबर पर्यंत या महोत्सवात देशातील विख्यात कलावंताचे संगीत कार्यक्रम आयोजि‍त करण्यात आले आहे. कवीश्रेष्ठ कालिदासांच्या स्मृतींच्या जागर करणारा हा महोत्सव म्हणजे संगीत सोहळा असून कालिदासांचे संस्कृत मधील नाटके, खंड काव्य व महाकाव्यांची  ओळख या महोत्‍सवाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश आहे.
चीनी विद्यार्थ्यांचे संगीत अविष्कार
चीनच्या शिष्टमंडळाने कालिदास महोत्सवाला हजेरी लावून भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख  करुन घेतली. हिंदी भाषा शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी पर्यटन प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभानंतर डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात चीनी भाषेतील बाल वयातील गीत तसेच हिंदीमधील कल हो ना हो हे गीत सादर केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीन या देशाचे काऊंसलेट जनरल श्री. चाँग व श्रीमती ली तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उमा वैद्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
34 दालनाच्या माध्यमातून समृद्ध परंपरेचा वारसा
कालिदास महोत्सवाचा एक भाग असलेल्या पूर्व विदर्भातील पर्यटन प्रदर्शनीमध्ये विदर्भातील ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या स्थळांच्या समृद्ध परंपरेचे दर्शन पर्यटकांना एकत्र पहायला मिळत आहे.
पर्यटन प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण विकास संस्था, अल्प बचत गटाचे उत्पादन असलेले वर्धा वर्धेनी पर्यटन जैव व विविधतेचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन, भंडाऱ्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सिल्क कापडाचे प्रदर्शन, गोंदियाच्या निर्सग संपदेचा वारसा जतन करणाऱ्या विविध स्थळांची माहिती सारस पक्ष्यांचे संवर्धन तसेच चंद्रपूर जिल्हयातील भद्रावती येथील चीनी माती वस्तूंचे प्रदर्शन, चंद्रपूर जिल्हयातील वन्यजीव प्रदर्शन जैव व विविधता मंडळ, हातमाग मंडळ, पुरातत्व व प्राचीन इतिहासाची दालने तसेच पर्यटना संदर्भात विविध खाजगी संस्थाची दालने हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र  असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक दालनाला भेट देऊन माहिती घेतली.
प्रारंभी विभागीय आयुक्त अनूप कुमार व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्वागत केले. व  पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनी बद्दल माहिती दिली. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी पर्यटक मोठया संख्येने उपस्थित होते.

******

राज्याला दुष्काळाच्या संकटापासून मुक्त कर महसूल मंत्री खडसे यांचे विठ्ठलाला साकडे

पंढरपूरदि.22: राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटापासून मुक्त कर, राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे असे विठ्ठल चरणी साकडे घातले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी  केले.
                कार्तिकी एकादशी निमित्त ‍श्री.विठ्ठल-रु‍क्मिणीची शासकीय महापुजा त्यांनी सपत्नीक केली. या पुजेनंतर तुकाराम भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार  सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, श्री. उल्हास पवार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे  उपस्थित होते.
                महसूल मंत्री खडसे म्हणाले, पंढरपूर येथे दरवर्षी लाखो वारकरी भाविक येतात. शेकडो वर्षाची ही वारकरी परंपरा आहे. या शहरात येणाऱ्या भाविकांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शहरावर सर्व प्रकारच्या नागरी सेवांचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
यासाठी 65 एकरात वारकऱ्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तेथे पंढरपूरचे उपनगर उभे राहिले पाहिजे. त्या ठिकाणी गटारी, रस्ते, पाणी पुरवठा, शौचालय आदि  कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच वारकऱ्यांना भजन कीर्तनासाठी प्रति वाळवंट तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. संतांच्या विचाराचा ठेवा व संस्कार पुढील पिढी पर्यंत गेले पाहिजेत यासाठी संत विद्यापीठाची आवश्यकता आहे. यासाठी जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न  करण्यात येत असल्याचे सांगितले.
                प्रारंभी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. त्यानंतर प्रास्ताविकात पंढरपूर येथे येणाऱ्या भक्तांसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याद्वारे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा शासनाचा, प्रशासनाचा व मंदिर समितीचा प्रयत्न आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सुख सुविधा देण्यासाठी कटीबध्द आहोत. याला शासनाचे पाठबळ आहे. येणाऱ्या आषाढीवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे  सांगितले.
यावेळी महसूल मंत्री खडसे यांच्या समवेत शासकीय महापुजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातीलपो. मु जादुवाडी ता. मालेगाव (कॅम्प) येथील वारकरी दामोदर रतन सोमासे (वय 85 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दामोदर सोमासे (वय 78 वर्षे) यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला. श्री. सोमासे हे मजुरी व शेती व्यवसाय करीत असून गेली पाच वर्षे ते वारी करीत आहेत. महापुजेचा मान मिळाला हा आमच्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मंदिर समितीच्यावतीने या मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार महसूलमंत्री श्री. खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वर्षभर मोफत प्रवास करण्याबाबत एस.टी.चा पास त्यांच्या हस्ते  देण्यात आला.
या प्रसंगी  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, प्रांताधिकारी संजय तेली, तहसिलदार गजानन गुरव आदि उपस्थित होते.

                                                         0000

धुळे जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची केंद्रीय समिती पथकाकडून पाहणी



धुळे, दि. 21 :- धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज  आलेल्या केंद्रीय समितीच्या पथकाने धुळे तालुक्यातील अजंग, जुनवणे, विंचूर आणि तरवाडे या गावांना भेटी देऊन  पीक परिस्थितीची पाहणी केली.  केंद्रीय समिती पथकात ग्रामीण विकास संचालनालयाचे सहाय्यक आयुक्त जगदीश कुमार,  नवीदिल्ली वित्त मंत्रालयाचे उपसंचालक (पी.एफ.1) ए. के. दिवाण, नवीदिल्ली पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे कक्ष सचिव  के. नारायणा रेड्डी यांचा समावेश होता.  केंद्रीय समिती पथकासोबत  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे उपसचिव अशोक अत्राम, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे,  जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, उपविभागीय कृषि अधिकारी पी. एम. सोनवणे, मंडळ कृषि अधिकारी रमेश पोतदार (धुळे), पी. व्ही. निकम (पिंप्री), पी. ए. पाटील (सोनगीर) आदी उपस्थित होते.
प्रारंभी केंद्रीय समिती पथकाने धुळे जिल्ह्याच्या सीमेवर अजंग या गावाच्या शेतकऱ्यांच्या  पीक परिस्थितीची पाहणी केली.  त्यात विमलबाई सुरेश माळी, मदिना मर्द खाटीक यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापूस आणि बाजरी पिकाची पाहणी केली आणि गेल्या दोन वर्षांचे उत्पन्न आणि यावर्षीच्या उत्पन्नाच्या तफावतीबाबत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.  शेतकऱ्यांनी समिती पथकाच्या सदस्यांकडे आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या.
            केंद्रीय समिती पथकाने जिल्ह्यातील सर्व संबंधित खाते प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती जाणून घेतली.  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यात झालेल्या अनियमित  पावसाची धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्याची  आकडेवारी, खरीप पिकांची जिल्ह्यातील परिस्थिती, प्रत्यक्ष पीक काढणी करून काढण्यात आलेली पैसेवारी, पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा इ. सविस्तर माहिती  पॉवर पॉईन्ट प्रेझेन्टेशनद्वारे सादर केली.  बैठकीस खाते प्रमुखांसोबत अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, शिरपूरचे उप विभागीय अधिकारी राहूल पाटील, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

            दुपारच्या सत्रात केंद्रीय समिती पथकाने धुळे तालुक्यातील जुनवणे, विंचूर आणि तरवाडे या गावांच्या परिसरातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.  त्यात जुनवणे येथील तुकाराम देवसिंग पाटील,  विंचूर येथील शिवाजी विक्रम देसले, तरवाडे येथील सुरेखा दगडू मोरे, अर्जुन मालजी माळी, अर्जुन शेनपडू पवार यांच्या शेतातील कापूस, बाजरी आणि मका आदी पिकांचा समावेश होता.                00000