मुंबई, दि. 14 : जनतेच्या
तक्रारी, गाऱ्हाणी व सूचना ऑनलाईन पद्धतीने थेट शासनासमोर मांडण्यासाठी सुरू
करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचा
प्रारंभ उद्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
जनतेला ऑनलाईन सेवा देण्याच्या
दृष्टीने मंत्रालयस्तरावर आपले सरकार हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले होते. आता ही सेवा जिल्हास्तरावर विस्तारण्यात येणार आहे. पथदर्शी तत्त्वावर राबविण्यात
येणारा हा उपक्रम सुरुवातीला सहा जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून
त्यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश
आहे. पोर्टलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, नगरपालिका, पोलीस विभाग आणि जिल्हा
परिषदांसंदर्भातील अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प 30
जिल्ह्यांत सुरू करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्पात येणाऱ्या अडचणींचे निराकरण
करुन अंतिमत: परिपूर्ण पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल.
या उपक्रमाचा पहिला टप्पा 26 जानेवारी
2015 रोजी जनतेसाठी सुरू करण्यात आला होता. नागरिकांकडून मंत्रालय स्तरावरील 9
हजार 200 तक्रारी आजपर्यंत प्राप्त झाल्या असून त्यापैकी 78 टक्के तक्रारींचा
निपटारा झाला आहे. पोर्टलवर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार नागरिकांच्या तक्रारींचे
समाधानकारक निपटाऱ्याचे प्रमाण 84.5 टक्के इतके लक्षणीय आहे. निपटारा न झालेल्या
आणि गुंतागुंतीच्या तक्रारी मासिक ई-लोकशाही बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री
स्वत: सोडविणार आहेत.
नागरिकांना
घरबसल्या शासनाच्या सेवा मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून देण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोर्टलच्या
माध्यमातून आपल्या तक्रारी शासनाकडे
मांडण्यासाठी किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबधी जनतेला सूचना-अभिप्राय देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या तक्रारींचे 21 दिवसात निराकरण केले जाते. सुशासनासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून
जनतेला घरपोच सेवा देण्यात येत आहेत. या पोर्टलवर तक्रारी, अर्ज, माहिती
अधिकार आणि प्रतिसाद या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र
हे देशातील पहिले राज्य आहे.
-----०००-----