बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जगात नावलौकिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नाशिक दि. 19:- सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जगभरात नावलौकिक असून या महापर्वाचे उत्तम आयोजन करण्याचे प्रयत्न शासनामार्फत करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
साधूग्राम येथील प.पू. सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मूर्तडक, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री आम. छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, योगेश घोलप, जयंत जाधव, डॉ. सुधीर तांबे, प्रा. अपूर्व हिरे आदी उपस्थित होते.
          श्री.फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्यासाठी जगभरातील भाविक, साधू-महंत एकत्र येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविक आणि साधू-महंतांना त्रास होऊ नये यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या . त्यानुसार शासनाने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यात त्रुटी असल्यास साधू-महंतांच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्यात येतील. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येत असून त्याचे श्रेय साधू-महंतांना आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रशासनाने केलेल्या तयारीचीही त्यांनी प्रशंसा केली.  स्थानिक जनतेने आयोजनात चांगले सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देताना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री. शहा म्हणाले, की कुंभमेळा म्हणजे अत्युकृष्‍ट व्यवस्थापनाचे आगळे- वेगळे उदाहरण आहे. व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही संशोधनाची मोठी संधी आहे.  शासनाच्या मदतीने विविध आखाडे येणाऱ्या  साधू- संत, महंत आणि भाविकांची उत्तम व्यवस्था करतात. या सोहळ्याचे धार्मिक महत्वदेखील आहे. कुठलेही निमंत्रण नसताना मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात आणि कुंभपर्व यशस्वी करतात. जागतिक स्तरावरदेखील देशातील चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याचा विशेष लौकीक आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. भुसे म्हणाले, की कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाने चांगल्याप्रकारे आर्थिक मदत केली आहे. नाशिककर जनतेच्या सहकार्याने कुंभमेळा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अण्णासाहेब मोरे यांनी कुंभमेळ्यादरम्यान देशाच्या सौख्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल, असे सांगितले. ग्यानदास महाराज यांनी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू- महंतांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे कुंभमेळा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे, असे ते म्हणाले.  
श्री. भुजबळ म्हणाले, की कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा नाशिककरांना लाभ होईल. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करीत त्यांना ‘अतिथी देवो भव’ चा अनुभव मिळवून द्या, असे  आवाहन त्यांनी केले. महापौर मूर्तडक यांनी प्रास्ताविक केले.
 कार्यक्रमाला स्वामी समर्थ पीठाचे अण्णासाहेब मोरे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज, नरेंद्राचार्य महाराज, वल्लभाचार्य महाराज, रामानंदाचार्य महाराज, हंसानंदाचार्य महाराज, माधवाचार्य महाराज, धर्मदास महाराज, राजेंद्रदास महाराज, संजयदास महाराज, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह साधू- महंत, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पंडित उपेंद्र भट, मीना परुळेकर यांनी अभंगवाणी सादर केली, तर नाशिकच्या ढोल पथकाने प्रात्यक्षिके दाखविली.        मान्यवरांच्या हस्ते दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा आणि निर्वाणी आखाड्यांचे ध्वजारोहण करण्यात आले.
          ***************