मंगळवार, १४ जुलै, २०१५

कुंभमेळा अध्यात्मिकता आणि सहिष्णुतेचे सांस्कृतिक केंद्र - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह



त्र्यंबकेश्वर, दि. 14- भारतीय संस्कृती जगातील सर्व प्राणीमात्रांना जोडणारी सर्वोत्कृष्ट संस्कृती असून या संस्कृतीला प्रतिबिंबीत करणारे कुंभमेळ्यासारखे सोहळे  धार्मिक किंवा अध्यात्मिक केंद्रच नाही तर ते एक मोठे सांस्कृतिक केंद्र आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा महापर्वाच्या प्रारंभानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते  बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री पंचदशनाम जुना आखाडा पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर 1008 श्रीश्री स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्षा अनघा देशपांडे, षड्‍दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज, अखिल भारतीय षड्‍दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरीजी महाराज, महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज, उपाध्यक्ष श्री महंत राजेंद्रसिंहजी महाराज, प्रवक्ता श्री महंत डॉ. बिंदूजी महाराज आदी उपस्थित होते.
श्री. राजनाथसिंह म्हणाले, भारतात राहणाऱ्या लोकांनी बरोबरीने मोठ्या मनाने एकत्र काम केल्यामुळे भिन्न धर्म, पंथीय लोक एकत्र, गुण्यागोविंदाने इथे राहत आहेत. जगाच्या कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही तो 'वसुधैव कुटुंम्बकम्' आणि 'सारे विश्वची माझे घर' चा संदेश केवळ भारतात राहणाऱ्या ऋषि मुनी, संत महात्म्यांनी  दिला. विश्वकल्याणाचा संदेश याच भूमीतून दिला गेला, असे सांगून त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा शुभारंभानिमित्त उपस्थित साधू-महंतांना अभिवादन करुन जनतेला शुभेच्छा दिल्या.
स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हे एक कल्याणकारी पर्व आहे. संस्कृती, संस्कार आणि संवेदना, सभ्यतेचा स्पर्श झालेला व्यक्ती देशाला गृहमंत्री म्हणून लाभला असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा ध्वजारोहण सोहळा होत आहे. पाश्चिमात्य संस्कृती संपूर्ण संसाराला बाजार मानणारी आहे, तर भारतीय संस्कृती संसाराला संपूर्ण परिवार मानणारी आहे. कुणालाही व्यथित न करणारी आणि दुसऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारी आपली संस्कृती असल्याचेही स्वामी अवधेशानंदगिरीजी यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार  केले असून यामुळे साधू-महंत, भाविकांच्या दृष्टीने हा कुंभमेळा विनाव्यत्यय साजरा होणार आहे. कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्याला जे अधिकारी-कर्मचारी प्राप्त झाले आहेत त्यांच्या कामामुळे  समाधानी  असून प्रशासनापासून संत महात्म्यांपर्यंत असेच समाधानी राहिले, तर हा सोहळा  निश्चितच यशस्वी होणार असल्याचेही स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज म्हणाले. भाविकांनी या सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती पंकजा मुंडे यांनी मानवतेच्या रक्षणासाठी सगळ्यांचे योगदान लाभेल असे सांगून  मानवतेच्या सेवेसाठी कुंभपर्वातून उर्जा प्राप्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी केले. 12 वर्षांनी येणारा कुंभमेळ्याचा हा अविस्मरणीय क्षण असून 50 हजारापेक्षा जास्त मनुष्यबळ, 20 हजार पोलीस, सीसीटीव्ही, शौचालये, साधुग्राम, वाहनतळ अशा विविध सुविधांची उभारणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जुना आखाडाचे श्री महंत प्रेमगिरीजी महाराज, निरंजनी आखाडाचे श्री महंत आशिषगिरीजी महाराज, महानिर्वाणी आखाडाचे श्री महंत रमेशगिरीजी महाराज, आवाहन आखाड्याचे श्री महंत भारद्वाजगिरी महाराज, आनंद आखाड्याचे श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अटल आखाड्याचे श्री महंत उदयगिरीजी, श्री महंत सतिशगिरीजी, अग्नि आखाड्याचे श्री महंत दुर्गानंद ब्रम्हचारी महाराज, नया उदासीन आखाड्याचे श्री महंत विचारदासजी महाराज आदी महंत तसेच पुरोहित संघाचे जयंत शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहणाने कुंभमेळ्यास प्रारंभ

प्रारंभी सकाळी केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथसिंह यांच्या  प्रमुख उपस्थितीत श्री त्र्यंबकेश्वरांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन, अभिषेक आणि तांब्यापासून बनविलेल्या धर्मध्वजाची प्राणप्रतिष्ठा करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगराध्यक्षा श्रीमती अनघा देशपांडे, सर्व प्रमुख आखाड्यांचे महंत, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून ध्वजारोहण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.                0000

विश्वकल्याणाच्या भावनेने कुंभमेळा साजरा करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नाशिक, दि. 14 - सिंहस्थ कुंभमेळा ही आपली संस्कृती आहे. विश्व शांती व विश्व कल्याणासाठी साधु महंताच्या मार्गदर्शनाखाली हा महा कुंभमेळा साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
          नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण प्रसंगी श्री. देवेंद्र फडणवीस बोलत होते. सकाळी 6.16 वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जगद्गुरु हंसदेवाचार्यजी महाराज, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, महंत ग्यानदास महाराज आदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर कुंभपर्वास सुरूवात झाली.
 ध्वजारोहण कार्यक्रमानंतर झालेल्या सन्‍मान सोहळ्याच्या वेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वित्त व नियोजन सुधीर मुनगंटीवार, कुंभमेळा मंत्री व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत  गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब  सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, महंत ग्यानदासजी  महाराज, जगदगुरु हंसदेवाचार्यजी महाराज, जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज, दिगंबर आखाडा प्रमुख रामकृष्णजी महाराज व रामकिशोर दास महाराज, निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धरमदासजी महाराज, निर्मोही  आखाड्याचे प्रमुख राजेंद्रदासजी महाराज, वल्लभपीठाचे आचार्य  वल्लभाचार्य महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, महंत भक्ति चरणदासजी महाराज, पुरोहित महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते .
          यावेळी  मुख्यमंत्री  फडणवीस  यांच्या हस्ते  पुरोहित  संघाच्या संकेतस्थळाचे व जैन सोशल ग्रुपच्या ' सिंहस्थ सोहळा गीत' ध्वनीमुद्रिकेचे लोकार्पण करण्यात आले.
श्री. फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा हजारो वर्षापासून सुरू असलेला उत्सव आहे. त्यामुळे या कुंभमेळ्यातील साधुग्राम व इतर कामासाठी आवश्यक असणारी जमीन योग्य मोबदला देऊन शासन अधिग्रहीत करणार आहे. त्यामुळे भविष्यातील कुंभासाठी कोणतीही अडचण येणार नाही. कुंभ हा साधु महंताचा असून पुढील तीन महिने साजरा होणारा कुंभमेळा सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी राज्य शासन साधु महंतांच्या सेवेसाठी तत्पर राहिल. त्यासाठी कोणतीही कमी भासू देणार नाही. या कुंभासाठी पालकमंत्री श्री. महाजन व प्रशासनाने सहा महिने अविरत मेहनत घेतली आहे. साधुग्रामची उत्तम व्यवस्था केली आहे. 10 नवीन घाट बांधले आहेत. गोदावरी स्वच्छ केली आहे. साधु महंत व प्रशासनाच्या समन्वयाने कुंभ पार पडावा, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.  
          या कुंभाचे नाव सिंहस्थ कुंभ असले तरी तो ‘हरितकुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठी शासनाबरोबरच सर्वांनी सहकार्य करावे. धर्म नेहमी निसर्गाशी साधर्म्य साधतो. त्यामुळे हा कुंभ आम्ही निसर्गाला समर्पित करणार आहोत. या सोहळ्याचे भावीक व नागरिकांनी पावित्र्य राखावे, कचरा करणार नाही, गोदावरी स्वच्छ ठेवू हा निश्चय प्रत्येकाने करावा. जनतेने स्वच्छता राखून हा कुंभ जनतेचा कुंभ म्हणून साजरा करावा, जनतेचा कुंभ म्हणून या पर्वाला ओळखले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा
          ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गंगा गोदावरीचे दर्शन घेतले. त्याचा संदर्भ देत श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आज आकाशाकडे नजरा लावून बसला आहे. पुढील काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, हा आशिर्वाद द्यावा, अशी गंगा गोदावरी मातेच्या चरणी प्रार्थना आहे. तसेच हा कुंभमेळा निर्विध्नपणे पार पाडावा, अशीही प्रार्थना गंगा गोदावरी माता व साधु महंताना केल्याचे त्यांनी सांगितले.  
          उच्च परंपरा असलेला कुंभ हा विश्वाच्या कल्याणासाठी भरत असतो. आपली परंपरा ही व्यक्ति केंद्रीत नसून विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारी परंपरा आहे. धर्मचा विजय हो, अधर्माचा विनाश हो, प्राण्यात सद्भावना निर्माण होऊ दे आणि विश्वाचे कल्याण होऊ दे , असे आपली परंपरा शिकवते, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्री. नाईक म्हणाले की,  विश्व सुखी व्हावे म्हणून साधुमहंतांनी कुंभमेळ्याच्या माध्यमातून कार्य केले आहे. या माध्यमातून देशाला अध्यात्मिक ताकद मिळते. या ताकदीचा वापर समाजासाठी करावा व समाजजीवन व राष्ट्र जीवन समृद्ध करण्याचा आशिर्वाद मिळावा. 
मानवतेचा संदेश जगापर्यंत पोचवा - पालकमंत्री
यावेळी  पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, जगातला सर्वात मोठा उत्सव हा कुंभमेळा आहे. कुंभमेळा चांगला व्हावा, यासाठी  अगदी  शासन, प्रशासन पासून साधू-महंतापर्यंत सगळ्यांचा आग्रह आहे. कुंभमेळ्याच्या  माध्यमातून हा मानवतेचा महामेळा असल्याचा चांगला संदेश जगापर्यंत जावा असा उद्देश आहे.
          मंत्रीमहोदय म्हणाले की, लोक सहभागातून  होणाऱ्या या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी विद्यार्थी, महिला, आबाल-वृध्दांसह असंख्य नागरिकांचा सहभाग आहे. सगळ्यांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवतांना शहरातून चारशे टन कचरा काढण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिम राबवली आहे. असंख्य सुविधा निर्माण करताना शासनाने 175 कोटी  रुपयांचे सुंदर घाट आणि 700 कोटी  रुपयांचे सुंदर रस्ते निर्माण केले. नाशिकला सुंदर स्वरुप देताना येथूनच नव्हे तर परदेशातूनही येणाऱ्या भाविकांचे आपण आनंदाने स्वागत करु या.  त्याचबरोबरच सुरक्षेसाठी  शासन, पोलीस, यांच्या बरोबरीने सगळे जागरुक राहून चांगला आनंदी व सुरक्षित कुंभमेळा संपन्न करुया, असे आवाहन  पालकमंत्री श्री. महाजन यांनी केले.
कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही - अर्थमंत्री
अर्थमंत्री श्री. मुनगुंटीवार म्हणाले की,  प्रत्येकाच्या जीवनातील आनंद असाच ओसंडून वाहू दे ही गोदावरीच्या चरणी प्रार्थना आहे. बारा वर्षांनी होणारा हा कुंभमेळा मानवतेच्या धर्माचे नुतनीकरण करणारा सोहळा आहे. अशा या कुंभमेळ्यासाठी राज्यशासनाकडून पाहिजे तेवढा निधी देण्यात येईल. नाशिककरांनीही जगभरातून या सोहळ्यासाठी आलेल्या साधुमहंतांचे आतिथ्य करून आपले आतिथ्य धर्म पाळावा.
प्रशासनाची उत्तम व्यवस्था - महंत ग्यानदास महाराज
यावेळी महंत ग्यानदास महाराज म्हणाले की, महाकुंभाच्या आयोजनासाठी व सोयीसुविधांसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. साधु महंतांच्या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्री श्री. महाजन व त्यांच्या प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रातील हा कुंभमेळा सर्वात वेगळा होणार आहे.
सिंहस्थ ध्वज पूजनाने सोहळ्यास सुरुवात
सकाळी सहा वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजाचे आणि गंगा गोदावरीचे विधीवत पूजन करण्यात आले. तत्पूर्वी जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सपत्नीक गणेश व कलश पूजन केले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्री. नाईक, खासदार श्री. गोडसे, महापौर श्री. मुर्तडक हेही यावेळी सहभागी झाले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्री. नाईक पालकमंत्री                    श्री. महाजन, अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासह आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टमधून ध्वजावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
ध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी रामकुंडावर भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घाटावर सर्वच बाजूने जमलेल्या भाविकांनी अद्भुत सोहळ्याचा आनंद लुटला.

------

धुळे जिल्ह्यात कलम 37 (1) (3 ) चे मनाई आदेश जारी

धुळे, दि. 3 :- मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरु असून दि.18 जुलै,15 रोजी रमजान ईद सण साजरा करण्यात येणार आहे.तसेच दि.14 जुलै,2015 रोजी मुस्लीम बांधवातर्फे शब-ए-कद्र हा सण साजरा होणार आहे. या सणा निमित्त मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात संपुर्ण रात्रभर मस्जीद,दर्गा,कब्रस्थान या ठिकाणी नमाजपठण करतात. रात्रभर जागे राहतात. तसेच धुळे जिल्हयात एकूण 223 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि.01 जुलै,2015 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
तसेच दि.13 जुलै,15 ते दि.21 जुलै,2015 रोजीपर्यत नामनिर्देशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया होणार असून आगामी सण उत्सव व ग्रामपंचायत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत व्हावी म्हणून दि.13 जुलै,2015 चे 00.01 वाजेपासून ते दि.27 जुलै,2015 चे 24-00 वाजेपावेतो संपुर्ण धुळे जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्रभारी जिल्हादंडाधिकारी ओमप्रकाश देशमुख प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

0000

जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त बैठकीचे आयोजन

धुळे, दि. 14:- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशभरात राबविण्यासाठी दि.15 जुलै,2015 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधुन कौशल्य विकास व उद्योजकता 2015 हे नवे राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्यानिमित्त कौशल्य विकास कार्यालयाचे महत्व,धोरण व प्रत्यक्ष अनुभव जिल्हास्तरीय कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांना या योजनेची माहिती व्हावी. या करिता दि.15 जुलै,2015 रोजी जिल्हाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे दुपारी 3-00 ते 6-00 वाजता जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच बैठकीच्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एम.इ.एस अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या 5 उमेदवारांना रोजगार देणा-या उद्योजकांकडून नियुक्तीपत्रे वाटपाचा तसेच उद्योजक व कौशल्य प्रशिक्षण देणा-या संस्था यांचा सत्कार कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या बैठकीस जिल्हयातील नामांकित उद्योजक,शिक्षण व प्रशिक्षण देणारे संस्था प्रमुख, कौशल्य विकासामध्ये कार्यरत असणा-या स्वंयसेवी संस्था व खाजगी संस्था तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती अनिसा एल तडवी,सहायक संचालक,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजक विभाग यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

000000

दूरचित्रवाणी वाहिन्यांना कुंभमेळ्याचे लाईव्ह फीड देणार

नाशिक, दि. 13 : जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाने दूरदर्शनच्या सहकार्याने 14 जुलै रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमाचे लाईव्ह क्लीन फिड दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी रामकुंड (नाशिक) आणि कुशावर्त (त्र्यंबकेश्वर) येथे प्रत्येकी 5 कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
          हा फिड खालीलप्रमाणे असेल :
     INSAT-3A, 3771 MHz, poIV, sym rate 8, 6msps, FEC3/4, MCPC mode Service : Mumbai feed for Trymbak
Service : News feed for Nashik

०००००००

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक -मुख्यमंत्री

मुंबई दि. 13 : पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक असून,याबाबत  पत्रकारांशी चर्चा करुन प्रयत्न केले जातीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंत्रालयातील नवीन पत्रकार कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांनी संयुक्तरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरतर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक उपस्थित होते.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीपत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे. चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला संरक्षण मिळाले पाहिजे परंतु पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार घडू नयेतयाचीही दक्षता घेतली पाहिजे. या दृष्टीने कायदा करण्याबाबत  पत्रकारांशी चर्चा करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचं स्थान महत्त्वाचे आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पत्रकारिता अधिक समृद्ध आहे. समृद्धतेची  ही परंपरा कायम ठेवत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनासोबत पत्रकारांनीही आपली जबाबदारी पार पाडावी असेही श्री. फडणवीस म्हणाले.
पत्रकारांना निवृत्तीवेतन तसेच घरे देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने अधिक गतीने कार्यवाही केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पेन्शनघरांच्या प्रश्नांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा व्हावा अशी अपेक्षा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
आजच्या काळात बातमीचे मूल्य बदलत आहे. पत्रकारितेतून शेती आणि समाजाचे प्रश्न ठळकपणे मांडले जावेत अशी अपेक्षा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
मंत्रालयाला लागलेल्या आगीत पत्रकारकक्षाचे नुकसान झाले होते. आज नवीन पत्रकार कक्षाचे उद्घाटन होत असताना आनंद होत आहे असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी व सदस्य पत्रकारमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००