त्र्यंबकेश्वर, दि. 14- भारतीय संस्कृती जगातील सर्व प्राणीमात्रांना
जोडणारी सर्वोत्कृष्ट संस्कृती असून या संस्कृतीला प्रतिबिंबीत करणारे कुंभमेळ्यासारखे
सोहळे धार्मिक किंवा अध्यात्मिक केंद्रच नाही
तर ते एक मोठे सांस्कृतिक केंद्र आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
यांनी केले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा महापर्वाच्या
प्रारंभानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री पंचदशनाम
जुना आखाडा पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर 1008 श्रीश्री स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज
होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे,
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्षा
अनघा देशपांडे, षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज,
अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरीजी महाराज, महामंत्री
श्री महंत हरिगिरीजी महाराज, उपाध्यक्ष श्री महंत राजेंद्रसिंहजी महाराज, प्रवक्ता
श्री महंत डॉ. बिंदूजी महाराज आदी उपस्थित होते.
श्री. राजनाथसिंह म्हणाले, भारतात राहणाऱ्या लोकांनी बरोबरीने मोठ्या
मनाने एकत्र काम केल्यामुळे भिन्न धर्म, पंथीय लोक एकत्र, गुण्यागोविंदाने इथे राहत
आहेत. जगाच्या कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही तो 'वसुधैव कुटुंम्बकम्' आणि 'सारे
विश्वची माझे घर' चा संदेश केवळ भारतात राहणाऱ्या ऋषि मुनी, संत महात्म्यांनी दिला. विश्वकल्याणाचा संदेश याच भूमीतून दिला गेला,
असे सांगून त्यांनी सिंहस्थ कुंभमेळा शुभारंभानिमित्त उपस्थित साधू-महंतांना अभिवादन
करुन जनतेला शुभेच्छा दिल्या.
स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हे एक
कल्याणकारी पर्व आहे. संस्कृती, संस्कार आणि संवेदना, सभ्यतेचा स्पर्श झालेला व्यक्ती
देशाला गृहमंत्री म्हणून लाभला असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा ध्वजारोहण सोहळा
होत आहे. पाश्चिमात्य संस्कृती संपूर्ण संसाराला बाजार मानणारी आहे, तर भारतीय संस्कृती
संसाराला संपूर्ण परिवार मानणारी आहे. कुणालाही व्यथित न करणारी आणि दुसऱ्यांच्या हिताचे
रक्षण करणारी आपली संस्कृती असल्याचेही स्वामी अवधेशानंदगिरीजी यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन अतिशय उत्कृष्ट
आणि दर्जेदार केले असून यामुळे साधू-महंत,
भाविकांच्या दृष्टीने हा कुंभमेळा विनाव्यत्यय साजरा होणार आहे. कुंभमेळ्यानिमित्त
जिल्ह्याला जे अधिकारी-कर्मचारी प्राप्त झाले आहेत त्यांच्या कामामुळे समाधानी
असून प्रशासनापासून संत महात्म्यांपर्यंत असेच समाधानी राहिले, तर हा सोहळा निश्चितच यशस्वी होणार असल्याचेही स्वामी अवधेशानंदगिरीजी
महाराज म्हणाले. भाविकांनी या सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी
केले.
श्रीमती पंकजा मुंडे यांनी मानवतेच्या रक्षणासाठी सगळ्यांचे योगदान
लाभेल असे सांगून मानवतेच्या सेवेसाठी कुंभपर्वातून
उर्जा प्राप्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी
केले. 12 वर्षांनी येणारा कुंभमेळ्याचा हा अविस्मरणीय क्षण असून 50 हजारापेक्षा जास्त
मनुष्यबळ, 20 हजार पोलीस, सीसीटीव्ही, शौचालये, साधुग्राम, वाहनतळ अशा विविध सुविधांची
उभारणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जुना आखाडाचे श्री महंत प्रेमगिरीजी महाराज, निरंजनी
आखाडाचे श्री महंत आशिषगिरीजी महाराज, महानिर्वाणी आखाडाचे श्री महंत रमेशगिरीजी महाराज,
आवाहन आखाड्याचे श्री महंत भारद्वाजगिरी महाराज, आनंद आखाड्याचे श्री महंत शंकरानंद
सरस्वती महाराज, अटल आखाड्याचे श्री महंत उदयगिरीजी, श्री महंत सतिशगिरीजी, अग्नि आखाड्याचे
श्री महंत दुर्गानंद ब्रम्हचारी महाराज, नया उदासीन आखाड्याचे श्री महंत विचारदासजी
महाराज आदी महंत तसेच पुरोहित संघाचे जयंत शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुशावर्त तीर्थ येथे ध्वजारोहणाने कुंभमेळ्यास
प्रारंभ
प्रारंभी
सकाळी केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री त्र्यंबकेश्वरांच्या प्रतिमेचे
विधीवत पूजन, अभिषेक आणि तांब्यापासून बनविलेल्या धर्मध्वजाची प्राणप्रतिष्ठा करुन
ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, नगराध्यक्षा श्रीमती अनघा देशपांडे, सर्व प्रमुख आखाड्यांचे महंत, पुरोहित
संघाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून
ध्वजारोहण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा