मंगळवार, १४ जुलै, २०१५

विश्वकल्याणाच्या भावनेने कुंभमेळा साजरा करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नाशिक, दि. 14 - सिंहस्थ कुंभमेळा ही आपली संस्कृती आहे. विश्व शांती व विश्व कल्याणासाठी साधु महंताच्या मार्गदर्शनाखाली हा महा कुंभमेळा साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
          नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण प्रसंगी श्री. देवेंद्र फडणवीस बोलत होते. सकाळी 6.16 वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जगद्गुरु हंसदेवाचार्यजी महाराज, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, महंत ग्यानदास महाराज आदींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर कुंभपर्वास सुरूवात झाली.
 ध्वजारोहण कार्यक्रमानंतर झालेल्या सन्‍मान सोहळ्याच्या वेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वित्त व नियोजन सुधीर मुनगंटीवार, कुंभमेळा मंत्री व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत  गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब  सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, महंत ग्यानदासजी  महाराज, जगदगुरु हंसदेवाचार्यजी महाराज, जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज, दिगंबर आखाडा प्रमुख रामकृष्णजी महाराज व रामकिशोर दास महाराज, निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धरमदासजी महाराज, निर्मोही  आखाड्याचे प्रमुख राजेंद्रदासजी महाराज, वल्लभपीठाचे आचार्य  वल्लभाचार्य महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, महंत भक्ति चरणदासजी महाराज, पुरोहित महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते .
          यावेळी  मुख्यमंत्री  फडणवीस  यांच्या हस्ते  पुरोहित  संघाच्या संकेतस्थळाचे व जैन सोशल ग्रुपच्या ' सिंहस्थ सोहळा गीत' ध्वनीमुद्रिकेचे लोकार्पण करण्यात आले.
श्री. फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा हजारो वर्षापासून सुरू असलेला उत्सव आहे. त्यामुळे या कुंभमेळ्यातील साधुग्राम व इतर कामासाठी आवश्यक असणारी जमीन योग्य मोबदला देऊन शासन अधिग्रहीत करणार आहे. त्यामुळे भविष्यातील कुंभासाठी कोणतीही अडचण येणार नाही. कुंभ हा साधु महंताचा असून पुढील तीन महिने साजरा होणारा कुंभमेळा सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी राज्य शासन साधु महंतांच्या सेवेसाठी तत्पर राहिल. त्यासाठी कोणतीही कमी भासू देणार नाही. या कुंभासाठी पालकमंत्री श्री. महाजन व प्रशासनाने सहा महिने अविरत मेहनत घेतली आहे. साधुग्रामची उत्तम व्यवस्था केली आहे. 10 नवीन घाट बांधले आहेत. गोदावरी स्वच्छ केली आहे. साधु महंत व प्रशासनाच्या समन्वयाने कुंभ पार पडावा, असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.  
          या कुंभाचे नाव सिंहस्थ कुंभ असले तरी तो ‘हरितकुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठी शासनाबरोबरच सर्वांनी सहकार्य करावे. धर्म नेहमी निसर्गाशी साधर्म्य साधतो. त्यामुळे हा कुंभ आम्ही निसर्गाला समर्पित करणार आहोत. या सोहळ्याचे भावीक व नागरिकांनी पावित्र्य राखावे, कचरा करणार नाही, गोदावरी स्वच्छ ठेवू हा निश्चय प्रत्येकाने करावा. जनतेने स्वच्छता राखून हा कुंभ जनतेचा कुंभ म्हणून साजरा करावा, जनतेचा कुंभ म्हणून या पर्वाला ओळखले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा
          ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गंगा गोदावरीचे दर्शन घेतले. त्याचा संदर्भ देत श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आज आकाशाकडे नजरा लावून बसला आहे. पुढील काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, हा आशिर्वाद द्यावा, अशी गंगा गोदावरी मातेच्या चरणी प्रार्थना आहे. तसेच हा कुंभमेळा निर्विध्नपणे पार पाडावा, अशीही प्रार्थना गंगा गोदावरी माता व साधु महंताना केल्याचे त्यांनी सांगितले.  
          उच्च परंपरा असलेला कुंभ हा विश्वाच्या कल्याणासाठी भरत असतो. आपली परंपरा ही व्यक्ति केंद्रीत नसून विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारी परंपरा आहे. धर्मचा विजय हो, अधर्माचा विनाश हो, प्राण्यात सद्भावना निर्माण होऊ दे आणि विश्वाचे कल्याण होऊ दे , असे आपली परंपरा शिकवते, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री श्री. नाईक म्हणाले की,  विश्व सुखी व्हावे म्हणून साधुमहंतांनी कुंभमेळ्याच्या माध्यमातून कार्य केले आहे. या माध्यमातून देशाला अध्यात्मिक ताकद मिळते. या ताकदीचा वापर समाजासाठी करावा व समाजजीवन व राष्ट्र जीवन समृद्ध करण्याचा आशिर्वाद मिळावा. 
मानवतेचा संदेश जगापर्यंत पोचवा - पालकमंत्री
यावेळी  पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले, जगातला सर्वात मोठा उत्सव हा कुंभमेळा आहे. कुंभमेळा चांगला व्हावा, यासाठी  अगदी  शासन, प्रशासन पासून साधू-महंतापर्यंत सगळ्यांचा आग्रह आहे. कुंभमेळ्याच्या  माध्यमातून हा मानवतेचा महामेळा असल्याचा चांगला संदेश जगापर्यंत जावा असा उद्देश आहे.
          मंत्रीमहोदय म्हणाले की, लोक सहभागातून  होणाऱ्या या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी विद्यार्थी, महिला, आबाल-वृध्दांसह असंख्य नागरिकांचा सहभाग आहे. सगळ्यांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबवतांना शहरातून चारशे टन कचरा काढण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिम राबवली आहे. असंख्य सुविधा निर्माण करताना शासनाने 175 कोटी  रुपयांचे सुंदर घाट आणि 700 कोटी  रुपयांचे सुंदर रस्ते निर्माण केले. नाशिकला सुंदर स्वरुप देताना येथूनच नव्हे तर परदेशातूनही येणाऱ्या भाविकांचे आपण आनंदाने स्वागत करु या.  त्याचबरोबरच सुरक्षेसाठी  शासन, पोलीस, यांच्या बरोबरीने सगळे जागरुक राहून चांगला आनंदी व सुरक्षित कुंभमेळा संपन्न करुया, असे आवाहन  पालकमंत्री श्री. महाजन यांनी केले.
कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही - अर्थमंत्री
अर्थमंत्री श्री. मुनगुंटीवार म्हणाले की,  प्रत्येकाच्या जीवनातील आनंद असाच ओसंडून वाहू दे ही गोदावरीच्या चरणी प्रार्थना आहे. बारा वर्षांनी होणारा हा कुंभमेळा मानवतेच्या धर्माचे नुतनीकरण करणारा सोहळा आहे. अशा या कुंभमेळ्यासाठी राज्यशासनाकडून पाहिजे तेवढा निधी देण्यात येईल. नाशिककरांनीही जगभरातून या सोहळ्यासाठी आलेल्या साधुमहंतांचे आतिथ्य करून आपले आतिथ्य धर्म पाळावा.
प्रशासनाची उत्तम व्यवस्था - महंत ग्यानदास महाराज
यावेळी महंत ग्यानदास महाराज म्हणाले की, महाकुंभाच्या आयोजनासाठी व सोयीसुविधांसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. साधु महंतांच्या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्री श्री. महाजन व त्यांच्या प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रातील हा कुंभमेळा सर्वात वेगळा होणार आहे.
सिंहस्थ ध्वज पूजनाने सोहळ्यास सुरुवात
सकाळी सहा वाजता मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजाचे आणि गंगा गोदावरीचे विधीवत पूजन करण्यात आले. तत्पूर्वी जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सपत्नीक गणेश व कलश पूजन केले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्री. नाईक, खासदार श्री. गोडसे, महापौर श्री. मुर्तडक हेही यावेळी सहभागी झाले होते.
त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्री. नाईक पालकमंत्री                    श्री. महाजन, अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासह आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टमधून ध्वजावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
ध्वजारोहण सोहळा पाहण्यासाठी रामकुंडावर भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घाटावर सर्वच बाजूने जमलेल्या भाविकांनी अद्भुत सोहळ्याचा आनंद लुटला.

------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा