मुंबई दि.29 :सिंधुदुर्ग जिल्ह्यात
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा विकसित करण्याबरोबरच अधिकाधिक रोजगार
निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून सहकार्य केले जाईल, असे
आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. केरळ राज्याच्या धर्तीवर
सिंधुदुर्गातही मेडिकल टुरिझम निर्माण करण्यासाठी प्रयत्न
करण्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत काल ‘इन्व्हेस्टर्स
मिट –
2015’चे सहयाद्री अतिथीगृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी
ते बोलत होते. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय
शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विजय सावंत, कृषी व पणन विभागाचे
अपर मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल, अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, ग्रामविकास
व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, उद्योग
विभागाचे
प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, पर्यटन
विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाचे पराग जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंतवणूक
करण्यास उत्सुक असलेले अनेक उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री.
प्रभू म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास, बंदराचा विकास, महामार्ग चौपदीकरण, प्रस्तावित चिपी विमानतळ, सागरी महामार्ग, सी वर्ल्ड व स्कूबा डायव्हींग या माध्यमातून पर्यटन हा
परिपूर्ण विकासाचा केंद्रबिंदू ठरवून जिल्हयाच्या विकास करण्यासाठी केंद्र शासन कटीबध्द
आहे.गोवा आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता आगामी
काळात गोवा आणि कोकण असे संयुक्त पर्यटन सर्किट तयार करण्यावर भर देण्यासाठी
प्रयत्न करण्यात यावा अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यासाठी केंद्र शासन सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य विकासात अग्रेसर राज्य आहे. सिंधुदुर्ग
जिल्ह्यानेही प्रत्येक कामात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या जिल्ह्यास पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय पहिला साक्षर
जिल्हा,
पहिला ई प्रशासन करणारा जिल्हा म्हणूनही या जिल्हयाचे नाव
घेतले जाते. लहान जिल्हा असूनही या जिल्हयात उद्योग आणि पर्यटनाच्या अनेक संधी
उपलब्ध आहेत. कोकणातील उत्पादनांना अधिक बाजारपेठ मिळावी यासाठीही प्रयत्न करण्यात
येईल.
सहयाद्री अतिथी गृह येथे उपस्थित असलेल्या गुंतवणुकदारांच्या
संख्येवरुन लक्षात येते की, सिंधुदुर्गात गुंतवणूक
करण्यासाठी अनेक उदयोजक उत्साही आहेत. म्हणूनच आगामी काळात सिंधुदुर्ग सर्वच
क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा वाटत असल्याचे श्री. प्रभू आपल्या भाषणात
म्हणाले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हयातील औद्योगिक प्रगती पुढे चालू राहण्याकरिता या जिल्हयातील रिकामे भूखंड लवकरच ताब्यात
घेतले जातील. याशिवाय उद्योजकांना नवीन उद्योग सुरू
करण्यासाठी भांडवली अंशदान योजना सुरू करण्यात आली असून यामुळे लघु उद्योजक मोठया प्रमाणात उदयोग करण्यास सुरुवात करतील, अशी
अपेक्षा आहे. लघु विकास उद्योग संस्थेच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी निधीही देण्यात येईल, असे
त्यांनी यावेळी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे “मेक इन
महाराष्ट्र “असे म्हणत महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योग
यावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. आज या इनव्हेस्टर मिटच्या निमित्ताने मी उद्योजकांना आवाहन करतो की, त्यांनी मेक इन सिंधुदुर्ग असे
म्हणत सिंधुदुर्गात गुंतवणूक करावी. राज्य शासनामार्फत यासाठी आवश्यक असणारे सर्व
सहकार्य या उद्योजकांना करण्यात येईल.
वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचा विकास प्राधान्याने करण्याला गती देण्यात
येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक वाढवून कौशल्य विकासाला प्राधान्य देवून जास्तीत
जास्त रोजगार निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी
सांगितले. कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या
पर्यटन सुविधा निर्माण करून जास्तीत जास्त पर्यटन वाढावे हा दृष्टीकोन ठेवून
आगामी काळात या जिल्ह्याचा विकास केला जाईल. पर्यटनाचा विकास आणि त्या माध्यमातून
स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
यावेळी सिंधुदुर्गचे माजी जिल्हाधिकारी इ. रवींद्रन यांनी
सिंधुदुर्गचा विकास याबाबत संगणकीकृत सादरीकरण केले.
000000