मुंबई दि. ३० : राज्यात अनिगमित बिगर कृषी उपक्रम पाहणी (बांधकाम वगळून) (UNINCORPORATED NON AGRICULTURAL ENTERPRISES (Excluding Construction)) जुलै २०१५ ते जून २०१६ या कालावधी दरम्यान घेण्यात येणार आहे. या पाहणीतून संकलित होणारी माहिती ही राज्याच्या विकासाचे अचूक नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय नमूना पाहणीच्या ७३ व्या फेरीच्या प्रशिक्षण शिबिराचे महत्व अनन्यसाधारण आहे असे मत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संचालक श्रीमती अ.रा. देव यांनी व्यक्त केले.
आज श्रीमती देव यांच्या हस्ते या पाहणीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळभ् केंद्रीय राष्ट्रीय नमूना पाहणी कार्यालयाचे उपमहानिदेशक एम.एल. रक्षित, संचालनालयाच्या अपर संचालक श्रीमती सु.र. मेहता यांच्यासह अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे राज्यभरातून आलेले अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही पाहणी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून यात असंघटित उद्योगांची यादी तयार करून त्यात उद्योग प्रमुखाचे नाव, उद्योगाचे वर्णन, मालकी संकेतांक, उद्योगाची नोंदणी व उद्योगात असणाऱ्या कामगारांची संख्या (उद्योजकासह) याची माहिती गोळा केली जाणार आहे. याशिवाय उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, त्यापासून मिळणारे उत्पन्न, उद्योगाची एकूण मूल्यवृद्धी, उद्योगासाठी घेतलेले कर्ज, स्थावर मालमत्ता, व उद्योग विस्तार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा वापर याची माहिती ही या पाहणीदरम्यान संकलित केली जाईल असे श्रीमती देव यांनी यावेळी सांगितले. स्थुल राज्य उत्पन्न निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले आधार वर्ष यावर्षी बदलले आहे त्यामुळे पुढील वर्षाचे स्थुल राज्य उत्पन्न निश्चित करतांनाही या पाहणीतून आलेल्या अचूक निष्कर्षाचा निश्चित उपयोग होईल असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील विविध धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी पाहणीतून संकलित होणारी आधारभूत माहिती ही अत्यंत उपयुक्त असते. ती अचूक आणि परिपूर्ण असण्यालाही तेवढेच महत्व आहे. त्यामुळे पाहणीदरम्यान संकलित करण्यात येणारी माहिती ही अचूक राहील याची दक्षता प्रगणकांनी घेणे आवश्यक असल्याचे अपर संचालक श्रीमती मेहता यांनी सांगितले.
ज्ञान ही एक शक्ती आहे. राज्य आणि राष्ट्राच्या अचूक परिस्थितीचे ज्ञान देणारी माहिती या संकलनातून मिळणार असल्याने या शक्तीचे सामर्थ्य हे प्रगणकाच्या यशस्वी कामात दडली आहे असे मत केंद्रीय राष्ट्रीय नमूना पाहणीचे उपमहानिदेशक श्री. रक्षित यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात यापूर्वी याच विषयाच्या झालेल्या ६७ व्या फेरीतील निष्कर्षाचा राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील आढावाही थोडक्यात नमूद केला तसेच या पाहणी दरम्यान सर्वांनी योग्य आणि पूर्ण माहिती देऊन प्रगणकांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा