मंगळवार, ३० जून, २०१५

लातूर जिल्ह्यातील गुमास्ता कामगारांसाठी घरकुल योजना राबविणार - प्रकाश महेता

मुंबई, दि. 29 : कामगारांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे. लातूर येथील हमाल,गुमास्ता कामगारांसाठीघरकुल योजना लवकरच राबविण्यात येईल,असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज सांगितले.
            लातूर औद्योगिक वसाहतीत 15 हेक्टर क्षेत्राच्या भूखंडावर म्हाडा मार्फत गुमास्ता कामगारांसाठी घरकुले बांधण्यासाठी भूखंड उपलब्ध करुन दिला आहे. मात्र घरकुलांसाठीचा भूखंड औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी असून आसपास कारखाने असल्याने या भूखंडावर घरकुलांची  उभारणी करण्याऐवजी नव्याने विकसित होणार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराजवळ घरकुलांसाठी भूखंड उपलब्ध झाल्यास कामगारांना कामाच्या सोयीच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरणार आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीतच ही जागा असावी अशी मागणी लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केली, त्यावेळी श्री. महेता यांनी ही माहिती दिली.
            गुमास्ता कामगारांच्या घरबांधणीसाठी मंजूर असलेला भूखंड औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी असल्याने घरकुल वसाहतीस ही जागा योग्य नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. सर्व कामगारांना घरे मिळतील, वाढीव कामगारांचा योजनेत समावेश होईल, घरांसाठी कर्ज उपलब्ध करुन देणे, यासर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशश्री. महेता यांनी यावेळी दिले. या योजनेच्या भूमीपूजनास आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन
श्री. महेता यांनी आमदार देशमुख यांना दिले.
            लातूर महापालिकेच्या हद्दीत भाडेकरु मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना स्वत:ची घरकुले उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने विशेष योजना राबवावी अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली. यामागणी बाबतही अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी असे श्री. महेता यांनी यावेळी सांगितले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग, औद्योगिक विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा