मंगळवार, ३० जून, २०१५

1999 नंतर पहिल्यांदाच वीजदर कमी झाले तीन वर्षापूर्वीच्या दरांच्या आधारे जनतेत संभ्रम निर्माण करु नका - ऊर्जामंत्री

मुंबई, दि. 30 : विद्युत नियामक आयोगाने नुकतेच जाहीर केलेले विजेचे दर ही पूर्वीच्या तुलनेत नक्कीच कमी झालेले असून ते 1999 नंतर पहिल्यांदाच कमी झालेले आहे. तीन वर्षापूर्वीच्या दरांचा आधार घेऊन जो विपर्यास करण्यात येत आहे, तो दुर्देवी आहे. तीन वर्षापूर्वीच्या दरात केवळ चलनवाढीचा प्रभाव गृहीत धरला तरी सध्याचे दर कसे कमी झालेले आहेत, हे सहज स्पष्ट होईल. तीन वर्षापूर्वीचा आकड्यांचा घोळ घालून जनतेते वीजदरांबाबत संभ्रम निर्माण करु नये असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे.
          शासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करुन वीजदर कमी करण्यात यश मिळविलेले आहे. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी वीजदर कमी करण्याची अपरिहार्यता स्पष्ट केली होती. यात विद्युत नियामक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल ऋण व्यक्त करुन ग्राहकांना आणखी दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
          वीज दरांबद्दलच्या तीन वर्षापूर्वीच्या स्थितीबद्दल बोलताना श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी किमान 5 ते 6 चलनवाढ होत असते. हे वास्तव लक्षात घेतले तरी उद्योगांच्या ऑगस्ट 2012 च्या प्रति युनिट रु. 7.01 या दरात दरवर्षी 5 प्रमाणे तीन वर्षातील चलनवाढीपोटी प्रतियुनिट 1 रुपया 11 पैशांनी वाढ होऊन तो दर 8 रुपये 12 पैसे होतो. सध्याचा प्रतियुनिट दर 7 रुपये 21 पैसे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. असे स्पष्ट करुन श्री. बावनकुळे यांनी 1 कोटी 14 लाख घरगुती ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात. त्यांचा आयोगाने ठरविलेला सध्याचा दर 3 रुपये 76 पैसे आहे. चलनवाढीपोटी हा दर प्रत्यक्षात 3 रुपये 89 पैसे होतो असे सांगितले.
          याशिवाय मार्च 2014 ते फेब्रुवारी 2015 या काळात उद्योगांसाठी प्रतियुनिट रु. 8.59 आणि 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट रु. 4.16 पैसे असा दर होता. आता उद्योगांचा दर 1 रुपये 38 पैशांनी कमी होऊन 7 रुपये 21 पैसे झालेला आहे. तर घरगुती ग्राहकांचा दर 40 पैशांनी कमी होऊन तो प्रति युनिट 3 रुपये 76 पैसे असा झाला आहे. ही वस्तुस्थिती नाकारणे शक्य नाही, असेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
          आपली भूमिका आणखी पुढे स्पष्ट करताना श्री. बावनकुळे म्हणाले की, विद्युत नियामक आयोगाची स्थापना 1999 मध्ये झाली. तेव्हापासून वीज दर वाढीचे दहा आदेश निघाले. आजपर्यंत कधीही दर कमी करणे सोडा, दर स्थिरही राहीलेले नाहीत. केवळ आमच्या  शासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे हे झालेले आहे. यासाठी शासनाने वीज कंपन्यांना कार्यक्षमता वाढविण्याबाबत दिलेल्या निर्देशामुळे आणि त्यासाठी वीज कंपन्यांना लागणारे पाठबळ उपलब्ध करुन दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. यामुळेच महानिर्मिती कंपनी संयत्र भार अंक वाढवत आहे. कोळशाची प्रतवारी काटेकोरपणे तपासली जात आहे. कोळशाच्या स्त्रोतांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. महापारेषणच्या भांडवली खर्चाची पडताळणी करुन खर्च कमी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. महावितरणने ग्राहक सेवेवर विपरीत परिणाम होऊ न देता, खर्च कमी करायचा असून वीज चोरांवर आणखीन कठोर होऊन हानी कमी करायची आहे.
          यासर्व उपायोजनांमुळे हे दर कमी व्हायला मदत झालेली असून तीन वर्षापूर्वीच्या आकड्यांचा विनाकरण घोळ घालून जनतेत संभ्रम निर्माण करु नये, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले.
००००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा