मंगळवार, ३० जून, २०१५

कुंभमेळ्यासाठीच्या मुलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे - मुख्य सचिव

            मुंबई, दि. 29: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील महिन्यापासून होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना वीज, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्य सचिव डॉ. पी. एस.मीना यांनी आज येथे दिले.
            कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणारी उच्चस्तरीय समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालीमंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्य सचिव बोलत होते. यावेळी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
            यावेळी डॉ. मीना म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिक येथे येतील त्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध मुलभूत सेवा पुरविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. साधुग्राम मध्ये वीज, पाणी, रस्ते सुविधांवर अधिक भर द्यावा. कुंभमेळ्याविषयी प्रसिद्धी करतांना भाविकांना सुशोभित केलेल्या घाटांची, स्वच्छतेची, तसेच नाशिक परिसरात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांची, वाहतुक मार्गांविषयी माहिती देण्यात यावी. नाशिक जिल्ह्यातील विविध विभागांच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा कुंभमेळाकाळात उपलब्ध होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत लवकरच आदेश देण्यात येतील. 15 जुलै ते 30 सप्टेंबर या काळात या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा वापरता येईल.
साधु-महंतांना अल्पदरात पुरविण्यात येणाऱ्या अन्न धान्याचा पुरवठा सध्या सुरू आहे तो ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावा. त्याचप्रमाणे सिन्नर-घोटी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. सिंहस्थामुळे रस्ते वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याने जेथे जेथे रस्त्यांची दुरवस्था असेल तेथे तातडीने दुरूस्ती करून सिंहस्थ काळात अशा मार्गांवर कर्मचारी तैनात करून गरज भासल्यास तातडीने रस्ता दुरुस्तीसाठी नियोजन करावे, अशा सुचनाही डॉ. मीना यांनी केल्या.
बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपुर, माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक, आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा