मुंबई,दि.29 :मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ एक आठवड्याच्या
अमेरिकेच्या दौऱ्यासाठी आज पहाटे रवाना झाले. या दौऱ्यात राज्याचे शिष्टमंडळ विविध
प्रमुख उद्योग समुहांशी चर्चा करणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह
या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय,
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव
अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, उद्योग विभागाचे
विकास आयुक्त सुरेंद्रकुमार बागडे यांचा समावेश आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे-पाटीलही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
या
दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री अमेरिकेतील विविध प्रमुख उद्योग समुहांशी चर्चा करणार
आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट, जनरल मोटर्स,
बोईंग, क्रिसलर, आयएसई, ॲपल, गुगल, सॅनडिक्स, अॅमेझॉन, ब्लॅकस्टोन, बँक ऑफ
अमेरिका, सिसको, ऑप्टीमल सोल्युशन्स अँड टेक्नॉलॉजिस (ओएसटी), सिटी बँक, टर्नर
इंटरनॅशनल, यूएनआयएनपीएसी, कॉर्निंग, पालो ॲल्टो टेक्नॉलॉजिस, सिमँटेक आदी उद्योग
समुहांचा समावेश आहे. कोकाकोला या उद्योग
समुहासोबतच्या राज्याच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या होणार आहेत. यासोबतच
बोईंग, जनरल मोटर्स आदी उद्योग समुहांच्या प्रकल्पांनाही शिष्टमंडळ भेटी देणार
आहे.
दौऱ्याच्या
प्रारंभी मुख्यमंत्र्यांची न्यू जर्सीच्या गव्हर्नरांसोबत भेट होणार आहे.
न्यूयॉर्क, डेट्रॉईट आणि सॅनफ्रान्सिस्को येथे होणाऱ्या व्यापार व गुंतवणूक विषयक
परिषदेत मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील. लॉस एन्जेलिस येथे अमेरिका व कॅनडातील
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित 17 व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री
फडणवीस भूषविणार आहेत. या अधिवेशनात
अमेरिका व कॅनडातील चार हजारांहून अधिक मराठी बांधव सहभागी होणार आहेत.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा