सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजन समारंभाचे थेट प्रक्षेपण करणार - मुख्यमंत्री


मुंबई, दि. ५ - इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असावे, यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. तसेच स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष रवी गरुड, महेंद्र साळवे, कोषाध्यक्ष शिरीष चिखलीकर, भन्ते करुणानंद थेरो, भन्ते लंकानंद थेरो, सदानंद मोहिते, सीताराम पवार या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमास समन्वय समितीच्या प्रतिनीधींना बोलवण्यात येईल.
इंदू मिलमधील स्मारकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. इंदू मिल येथे होणाऱ्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात समन्वय समितीच्या सदस्यांना स्थान द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असावे, यासंदर्भात समन्वय समितीने आराखडा तयार केला असून त्याचाही विचार व्हावा, तसेच कार्यक्रमापूर्वी चैत्यभूमीची रंगरंगोटी व सजावट व्हावी आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या. 
दुष्काळग्रस्तांसाठी ५ हजाराचा निधी
यावेळी विपश्यना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टच्या वतीने भन्ते करुणानंद यांनी दुष्काळग्रस्तांसाठी ५ हजार रुपयांचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना दिला. बौद्ध भिक्खू यांनी जमा केलेला निधी दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येत असल्याचे भन्ते करुणानंद यांनी यावेळी सांगितले.
000


लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत -मुख्यमंत्री

मुंबई, दि.5: लोकशाही दिनात तक्रार केल्यानंतरच सामान्य नागरीकांचे प्रश्न मार्गी लावायचे का? असा सवाल करीत लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
          मंत्रालयात सकाळी झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.
          आज झालेल्या लोकशाही दिनात जमिनीबाबतचे देयक न मिळाल्याबाबत रायगड येथील उदयकुमार चंदने यांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर चर्चा सुरू असतानाच तक्रारदारांना लोकशाही दिनातच त्वरित पेमेंट दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा स्वरूपाचा अनुभव अन्य ठिकाणच्या तक्रारदारांनी सांगितल्यावर, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही दिनात तक्रार दाखल केल्यावरच प्रशासनाने त्याची दखल घ्यायची का? लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. मुळातच नागरिकांना लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्याची गरजच भासता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात सेवा हमी कायदा लागू करण्यात आला आहे. त्याच बरोबर या कायद्यातील काही सेवा आता आपले सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवा विहित कालावधीत देण्याचे बंधनकारक असल्याने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना या कायद्यानुसार कारवाई करावी आणि सामान्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बऱ्याच जिल्ह्यात पैसे भरूनही वीज जोडणीची प्रकरणे (पेड पेंडींग) प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. जे कंत्राटदार विहीत मुदतीत कामे पूर्ण करीत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाका. मार्च 2016 पर्यंत एकही पेड पेंडीगचे प्रकरण शिल्लक राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये कोल्हापूर, भंडारा, अकोला, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, परभणी येथील नागरीकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. प्रश्न निकाली निघाल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
000