मुंबई, दि.5: लोकशाही
दिनात तक्रार केल्यानंतरच सामान्य नागरीकांचे प्रश्न मार्गी लावायचे का? असा सवाल करीत लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत,
असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात
सकाळी झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव
स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव
यावेळी उपस्थित होते.
आज
झालेल्या लोकशाही दिनात जमिनीबाबतचे देयक न मिळाल्याबाबत रायगड येथील उदयकुमार
चंदने यांनी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर चर्चा सुरू असतानाच तक्रारदारांना
लोकशाही दिनातच त्वरित पेमेंट दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा स्वरूपाचा
अनुभव अन्य ठिकाणच्या तक्रारदारांनी सांगितल्यावर, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की,
लोकशाही दिनात तक्रार दाखल केल्यावरच प्रशासनाने त्याची दखल घ्यायची का? लोकशाही दिनाशिवायही सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. मुळातच
नागरिकांना लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्याची गरजच भासता कामा नये, असे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात सेवा हमी
कायदा लागू करण्यात आला आहे. त्याच बरोबर या कायद्यातील काही सेवा आता आपले
सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवा विहित कालावधीत देण्याचे
बंधनकारक असल्याने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना या कायद्यानुसार कारवाई करावी आणि
सामान्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बऱ्याच जिल्ह्यात पैसे
भरूनही वीज जोडणीची प्रकरणे (पेड पेंडींग) प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने
मार्गी लावावीत. जे कंत्राटदार विहीत मुदतीत कामे पूर्ण करीत नाहीत त्यांना काळ्या
यादीत टाका. मार्च 2016 पर्यंत एकही पेड पेंडीगचे प्रकरण शिल्लक राहता कामा नये,
असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
आज झालेल्या ऑनलाईन
लोकशाही दिनामध्ये कोल्हापूर, भंडारा, अकोला, रायगड, ठाणे, पालघर, सातारा,
कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, परभणी येथील नागरीकांच्या तक्रारींवर सुनावणी
करण्यात आली. प्रश्न निकाली निघाल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा