गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

शिरपूर तालुक्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासन, स्थलांतर व नियमीत करणेसंबंधी हरकती सादर कराव्यात - राहूल पाटील

धुळे, दि. 1 :- शिरपूर तालुक्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित, नियमीत करणे व स्थलांतरीत करणे यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने निश्चित केलेल्या सर्वंकष व सुस्पष्ट धोरणानुसार कारवाई करण्यात येत असून तालुक्यातील अशा शहरी व ग्रामीण भागातील 397 अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी शिरपूर तहसिल कार्यालयात नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली असून या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासित करणे, नियमित करणे, स्थलांतरीत करणे यासंबंधी 14 ऑक्टोबर पर्यंत नागरिकांनी हरकती तहसिलदार, शिरपूर यांच्याकडे लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन शिरपूर भागाचे उप विभागीय अधिकारी राहूल पाटील यांनी शासकीय अधिसूचनेव्दारे केले आहे.
            या अधिसूचनेत श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्कासित करणे किंवा नियमीत करणे अथवा स्थलांतरीत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपिल क्र. 8519/2006 मध्ये दिले आहेत.  त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 5 मे, 2011 च्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय समिती व महानगरपालिका स्तरीय समिती अशा समित्या गठीत केल्या आहेत. 
            जिल्हास्तरीय समितीने 28 सप्टेंबर, 2015 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उप विभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय उप समिती गठीत केली आहे.  या समितीव्दारे जे अनधिकृत प्रार्थना स्थळ जुने असून त्यांना व्यापक लोकमान्यता आहे व ज्यांच्याविषयी पोलीस अहवाल व  नियोजन प्राधिकरणाचे अभिप्राय नियमित करण्यास अनुकूल आहेत आणि संबंधित भुधारकाची संमती आहे अशा धार्मिक स्थळांचे वर्गात वर्गीकरण करून त्यांचा समावेश नियमीत करण्यासाठी प्रस्तावित अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे.  अशा शिरपूर तालुक्यातील वर्ग नियमितीकरणास पात्र असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या शहरी-23, ग्रामीण-373 असे एकूण 396 इतकी आहे.
            ज्या अनधिकृत स्थळांचे कायदा व सुव्यवस्थाच्या कारणांमुळे किंवा ते वाहतूकीस अडथळा ठरत असल्यामुळे किंवा विकास आराखडा, विकास नियंत्रण नियमावलीच्या दृष्टीने किंवा इतर काही विशिष्ट कारणांमुळे त्यांचे नियमितीकरण शक्य नाही अशा अनधिकृत धार्मिक स्थळांचे वर्गीकरण वर्गात करून त्यांचा समावेश निष्कासनासाठी प्रस्तावित अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. अशा शिरपूर तालुक्यातील वर्ग निष्कासित करावयाचे पात्र असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या शहरी-01, ग्रामीण-0 (निरंक) आहे.
            कोणत्याही अनधिकृत धार्मिक स्थळाचे अन्यत्र स्थलांतर एखाद्या संस्थेने, गटाने प्रस्तावित करून परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास स्थलांतरासाठी अशा संस्थेने, गटाने प्रस्तावित जागेच्या योग्यतेबाबत सखोल तपासणी करून घ्यावी.  अशा तपासणी करतांना संबंधित भूधारकाची संमती असून जागा वाहतुकीस अडथळा ठरणार नाही.  त्याचप्रमाणे सदर  स्थलांतरामुळे विकास आराखडा, विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होणार नाही, याची पूर्ण खात्री करून सदर धार्मिक स्थळ वर्गीकरण देऊन त्याचा समावेश स्थलांतरीत करावयाच्या अनधिकृत धार्मिक स्थळाच्या यादीत करण्यात आलेला आहे. अशा शिरपूर तालुक्यातील वर्ग स्थलांतर करावयाचे पात्र असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या शहरी-0 (निरंक), ग्रामीण-0 (निरंक) आहे, असेही उप विभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर राहूल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय अधिसूचनेत नमूद केले आहे. 

दृष्टीक्षेपात शिरपूर तालुक्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे वर्गीकरण

अ.क्र.
धार्मिक स्थळांचे वर्गीकरण
शहरी
ग्रामीण
एकूण
1
नियमितीकरण करावयाचे
23
373
396
2
निष्कासित करावयाचे
1
0
1
3
स्थलांतर करावयाचे
0
0
0
एकूण
24
373
397


000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा