गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

लेखा शाखा ‘ वॉचडॉग’ चे काम करते कामकाज सुधारण्यासाठी लेखा प्रशिक्षण गरजेचे ---महासंचालक चंद्रशेखर ओक

नवी मुंबई, दि. 28 :- लेखा शाखा ही  ‘ वॉचडॉग’ चे काम करते त्यामुळे विभागाचे आर्थिक व्यवस्थापन उत्तम रितीने होते. यामुळेच लेखाविषयक काम सुधारण्यासाठी  प्रशिक्षणाची आवश्यकता आहे,
असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क  विभागाचे महासंचालक श्री. चंद्रशेखर ओक यांनी आज कोकण भवन येथे महासंचालनालयाच्या वतीने कोकण विभागीय   व अधिनस्त जिल्हा माहिती कार्यालयासाठी आयोजित दोन दिवसीय लेखाविषयक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्री. ओक म्हणाले, अधिकारी वर्गासाठी यशदा येथे प्रशिक्षण आयोजित केले जाते. परंतु लेखाविषयक कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या सुलभतेसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. कार्यालयीन कामकाजात लेखाविषयक बाबींना महत्व आहे. लेखाविषयक कामकाज संगणीकृत झाल्यामुळे याचे प्रशिक्षण आवश्यक आहे.  कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियम व कामकाजपद्धती बद्दल माहिती देण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील सर्व विभागासाठी या लेखाविषयक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. आपल्या शासनाचे ही प्रशिक्षण देण्याचे धोरण आहे. प्रशिक्षणामुळे शंकेचे निराकारण  होऊन कार्यालयीन कामकाजात सुलभता येते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.  कोंकण विभागाचे प्र.उपसंचालक (माहिती) अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा माहिती कार्यालय रायगड येथील कर्मचारी श्री. यशवंत कांबळे हे दि.30 सप्टेंबर 2015 रोजी सेवानिवृत्त होत असून यांचा महासंचालकांच्या  हस्ते शाल व श्रीफळ, निवृत्तीच्या लाभाचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.  जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले. या पुस्तिकेसाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील श्री. दिलीप शिंदे, दूरमुद्रणचालक यांनी माहिती संकलित केली आहे.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे सूत्रसंचालन रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी  डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले व आभार प्रदर्शन पालघरच्या जिल्हा माहिती अधिकारी, मनिषा पिंगळे यांनी मानले.
उपसंचालक (लेखा) श्रीमती सानिका देशपांडे यांनी आपल्या मनोगतात लेखाविषयक प्रशिक्षणांची आवश्यकता  स्पष्ट करुन आपल्या सर्वांना याचा शासकीय दैनंदिन कामकाजात उपयोग होईल, असे सांगितले. त्यांनी प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात अर्थसंकल्प अंदाजपत्रक, अंदाजपत्रक व खरेदी प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता याबाबतची माहिती दिली. तर दुसऱ्या सत्रात अंदाज पत्रक तयार करणे याबाबतची माहिती लेखा अधिकारी प्रभू कदम यांनी दिली.  तिसऱ्या सत्रात लेखा परिक्षणाबाबत  माहिती श्रृती सावंत, सहायक लेखा अधिकारी यांनी दिली.
            यावेळी  रत्नागिरीचे प्र. जिल्हा माहिती अधिकारी, विजय कोळी,  कोंकण विभागाचे सहायक संचालक (माहिती) मेघश्याम महाले, माहिती अधिकारी ठाणे हेमंत खैरे, माहिती अधिकारी रायगड विष्णू काकडे, माहिती अधिकारी पालघर शांताराम शेरवाडे, तसेच  कोंकण विभागीय कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे, रायगड, रत्नागिरी पालघर येथील  कर्मचारी  उपस्थित होते.

000 000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा