नाशिक दि. 4 :- आदिवासी भागाच्या विकासासाठी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून सर्वांनी मिळून कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
राज्य
शासन, टाटा ट्रस्ट आणि अक्षयपात्र फाऊंडेशनच्या वतीने आश्रमशाळेत मध्यवर्ती
स्वयंपाकगृहाचा प्रयोग इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय इंग्रजी
माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेत राबविण्यात आला आहे. त्या ‘अन्नपूर्णा’ मध्यवर्ती
स्वयंपाकगृहाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री
विष्णु सवरा, पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे,
खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मलाताई गावीत, आदिवासी विकास विभागाचे सचिव
राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, आदिवासी विकास आयुक्त सोनाली
पोंक्षे-वायंगणकर, टाटा ट्रस्टचे वेंकटरामन, अक्षयपात्रा फाऊंडेशनचे आर.मदन आदी
उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल
सी. विद्यासागर म्हणाले की, आदिवासी युवकांमध्ये क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी
आहे. त्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची
आवश्यकता आहे. त्यांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिल्यास ते ऑलिम्पिकच्या
सुवर्णपदकालाही गवसणी घालतील. त्याचप्रमाणे आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी
त्यांना विज्ञान विषयाचे विशेष ज्ञान देण्याची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शिक्षकांना
प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
मध्यवर्ती
स्वयंपाकगृहाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, अन्नाच्या
गुणवत्तेत सातत्य राखण्यात यावे. मुलांना चांगले अन्न देऊन त्यांचे कुपोषण दूर
करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर करण्यात येत आहेत. राज्यात इतर ठिकाणीदेखील टाटा
ट्रस्टने पुढाकार घेऊन आदिवासी मुलांना ताजे अन्न देण्याचा प्रयत्न करावा, असे
आवाहन त्यांनी केले. शासन आदिवासी आश्रमशाळांमधील गळती रोखण्यासाठी विशेष
उपाययोजना करीत असून युवकांच्या कौशल्य विकासावरही भर देण्यात येणार असल्याचे
त्यांनी सांगितले. आदिवासी देशभक्तांच्या यशोगाथांचा परिचय नव्या पिढीला करून
द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
मुंढेगाव
येथे शासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देशातील पहिले मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभे
करण्यात आल्याचे सांगून श्री.सवरा म्हणाले, आश्रमशाळामधील मुलांच्या भोजनाची
समस्या सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे स्वयंपाकगृह उभारण्यात आले आहे. यामुळे
खर्चातही बचत होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात इतरत्रही असे
स्वयंपाकगृह उभारण्यात येईल.
शासनाने
आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. पेसा अंतर्गत
ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 25 हजार विद्यार्थ्यांना
नामांकीत शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-वसतीगृह बांधकामाला
चालना देण्यात येत आहे. कुपोषण नियंत्रणावर भर देण्यात येत असून मध्यवर्ती
स्वयंपाकगृह त्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री
श्री.महाजन म्हणाले, आदिवासी समाजाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न
करण्यात येत आहे. सकस भोजनाच्या माध्यमातून सशक्त पिढी घडावी अशी कल्पना आहे.
त्यासाठी स्वयंपाकगृह उपयुक्त ठरेल. आदिवासी मुलांनी क्षमतेच्या बळावर क्रीडा
क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा उल्लेख करून सामाजिक बांधीलकीतून आदिवासी बांधवांचा
सामाजिक स्तर उंचावण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी
सांगितले.
प्रास्ताविकात
श्री.देवरा यांनी स्वयंपाकगृह दोन महिन्यात उभारल्याचे सांगून टाटा ट्रस्टने
यासाठी आर्थिक सहकार्य केल्याची माहिती दिली. इथे तयार होणाऱ्या भोजनामुळे मुलांवर
होणारा परिणाम व या प्रकल्पाची उपयुक्त्ता विविध चाचण्यांच्या माध्यमातून
अभ्यासण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वयंपाकगृहात
20 हजार मुलांसाठी दिवसातून 60 हजार भोजन तयार करण्याची क्षमता आहे. टप्प्याटप्प्याने शाळांची संख्या वाढवून अधिक
मुलांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रारंभी राज्यपाल महोदयांनी स्वयंपाकगृहाची पाहणी
केली. इथली स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कुंभमेळ्यानिमित्त
गोदावरी पुजन
राज्यपाल सी.विद्यासागर
राव यांनी कुंभमेळ्यानिमित्ताने रामकुंड येथे सपत्नीक गोदावरी पुजन केले. यावेळी
पालकमंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी श्री.राव यांनी गोदावरीच्या
उगमाबद्दल पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांचेशी चर्चा केली.
*********