शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी येथील अधिवेशनात आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक एम. तुपकर यांची भेट झाली. तत्पुर्वी जिल्हा मुख्यालयात शासकीय बैठकींसाठी उपस्थित असतांना एक दोन वेळा तोंडओळख झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुर्वेद महाविद्यालय असतांना आणि संपूर्ण कोकणात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वनौषधी असतांना त्या महाविद्यालयाकडे पहाण्याचा दृष्टीकोन अजूनही फारसा चांगला नसल्याचे जाणवले. वेळ काढला आणि एका सायंकाळी संपूर्ण महाविद्यालय फिरून घेतल. याच भेटीत डॉ. डि.के. परिदा यांची ओळख झाली. आणि अवघ्या पाच मिनीटात त्यांनी सुरु केलेल्या कामाबद्दल कुतूहल निर्माण झाल.

कामाच्या गडबडीत ही सारी घटना मी विसरून गेलो होतो. कामाचा वाढता व्याप, कोकणातील बदलणारे हवामान आणि वाढते वय यामुळे शरीरावर कोठेतरी परिणाम होतोय याची जाणीव व्हायला लागली. अचानक घाम येऊन जिना चढतांना होणारा त्रास धोक्याची घंटा देऊ लागला होता. ऍलोपॅथीपेक्षा आयुर्वेद उपचार करावा असा सल्ला अनेक डॉक्टर मित्रांनी मला दिला आणि आचारसंहितेचा चांगला मुहूर्त पाहून मी थेट डॉक्टर डी.के. परिदा यांची भेट घेतली. प्राथमिक तपासण्या केल्या आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार पंचकर्मातील एक प्रकार विरेचन करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दहा सलग दिवस या उपचारामुळे बराच फायदा झाला.

आयुर्वेदात पंचकर्माचे पाच प्रकार आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण. प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळा उपचार म्हणून केला जातो. मी पंचकर्म करतोय असे म्हटल्यानंतर अनेकांना केवळ वमनाच्या पलिकडे काही माहिती आहे असे वाटले नाही. शरिरातील पित्त, टॉक्सीन, यकृत, लहान व मोठे आतडे, डोकेदुखी, मधुमेह, अस्थमा, त्वचेचे आजार आणि अनावश्यक असलेले वजन कमी करणे यासाठी विरेचन केले जाते. त्याचा फायदा शास्त्रशुध्द उपचार पध्दतीने निश्चित होतो.

मुळात साडेपाच वर्षाची आयुर्वेदाची पदवी घेतल्यानंतर तात्काळ पंचकर्माच्या पाटय़ा लावणारे अनेक डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत. वमन उपचार पध्दतीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या देखील कमी नाही. आयुर्वेदाला अनुभव आणि शास्त्रशुध्द उपचार पध्दतीची गरज खूपच अत्यावश्यक आहे. वेदकालीन चिकित्सा पध्दती आयुर्वेदाचा उल्लेख होतो तो ही यासाठीच. जागतिकीकरणाचे वारे जसे समाज मनावर परिणाम करू लागले. त्यात वैद्यकीय क्षेत्र देखील अपवाद नाही. कट प्रॅक्टीसच्या नावाखाली चालणारे प्रकार तर आता राजमान्य होऊ लागले आहेत. डॉक्टर पासून तर थेट मेडीकलशॉप पर्यंत असणारी लिंक आता सहज नजरेस पडते. अशा या वातावरणात आयुर्वेदातील शुध्दपणा जपणारे महाविद्यालय आणि तेथील डॉक्टर पाहून आश्चर्यच वाटले. चरकसहिंतेत म्हटल्याप्रमाणे जीवन हे शरीर, ज्ञानेंद्रिय व मन यांचे एकत्रीकरण असून ते आत्म्याचे पुनरुज्जीवन आहे. आयुर्वेद हे जीवनाचे महत्वाचे धार्मिक विज्ञान आहे. हे या जगात व जगापलीकडेही फायदेशीर आहे. हे अगदी खरे आहे कारण स्वत:ला जाणून घेण्याचे आणि स्वत:ला प्राकृत करण्याचे विज्ञान म्हणजे योग व आयुर्वेद आहे.


अन्नाला पूर्णब्रम्ह म्हणतात. ब्रम्हाला अन्न हा पहिला संस्कृत शब्द आहे. अन्नापासून सर्व प्राणीमात्रांचा जन्म झाला आहे. ते अन्नामुळेच जगतात व अन्नातच परततात असे तैतरिय उपनिषदमध्ये म्हटले आहे. अलिकडे खाण्यावरील अनियंत्रण सात्विक अन्नाचा अभाव, कच्चा अन्नाचा वापर यामुळे अनेक आजार उद्भवतात. मासांहारी अन्नामुळे आणि फास्टफुडमुळे देखील आजार उत्पन्न होतात. त्याची माहिती सर्वसामान्य माणसाला असून देखील त्या दृष्टीने तो वागत नाही. त्यामुळे आजार होतात.

डॉ. परिदांशी बोलतांना अनेक गोष्टी समजत होत्या. आतापर्यंत त्यांनी १० हजाराच्या वर विरेचन पध्दतीचा वापर रुग्णांवर केला आहे. बस्ती, वमन, नस्य आणि रक्तमोक्षण उपचार पध्दतीतही त्यांनी केलेले उपचार देशपातळीवर संशोधकांना उपयुक्त असे ठरणारे आहेत. उपलब्ध साधनसामग्री आणि अपूरा कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे उपचार सुरु आहेत. सतीश चव्हाण आणि महादेव सावळ यांच्या मदतीने विविध प्रकारच्या मालीश यशस्वीपणे पूर्ण केल्या जातात. पुणे-मुंबई येथे या उपचारासाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. सावंतवाडीतील वैद्यकीय महाविद्यालयात मात्र अवघ्या २ हजार रुपयात संपूर्ण उपचार पूर्ण होतो.

जेथे पिकते तेथे विकत नाही. असेच म्हटले तर वावग होणार नाही. आज अनेक घातक औषधांच्या मार्‍यामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. साध्या साध्या रोगालाही माणूस बळी पडतो. हे टाळण्यासाठी शरीरातच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून चांगले आरोग्य जगता येऊ शकते. विशेषता चाळीश नंतर येणारे आजार वेळीच टाळायचे असतील तर आजाराची पूर्व काळजी घेण आवश्यक आहे. चाळीशी नंतर आहारशास्त्र, व्यायामशास्त्र, कामजीवन, मृत्युसंकल्पना आणि अर्थकारण याबद्दल इच्छा असो की नसो विचार करावाच लागतो. आई-वडीलांचे वृध्दत्वातले आजारपणातले खर्च जेव्हा आपल्या चाळीशीत समोर येतात. तेव्हा आपल्या वृध्दत्वात हा खर्च टाळता येईल का याचा विचार करत असतांना हेल्थ कॉन्शस ही संकल्पना कळत नकळत पुढे येते आणि त्यातून उपचार पध्दती सुरु होते.

दिर्घायुक्तम अर्थववेदातील कांड १९ मध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही शंभर शरद ऋतू पहावे. आम्ही शंभर शरद ऋतू जगावे. आम्ही शंभर शरद ऋतू अनुभवावे. आम्ही शंभर शरद ऋतू उत्कर्ष पावावे. आम्ही शंभर शरद ऋतू पुष्ट व्हावे. शंभराहून अधिक शरद ऋतू असावे. अशा दिर्घायुषी जगण्याच्या कल्पनेसाठी आणि बदलणार्‍या चाळीशीला दूर करत एकदा तरी विरेचन प्रक्रिया करायला काय हरकत आहे ? 

सप्तरंग महोत्सवाचे आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन


मुंबई, दि. 17 : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 4थ्या सप्तरंग महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते सात रंगाचे फूगे हवेत सोडून आज गेट वे ऑफ इंडिया येथे झाले.
            यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            या उद्घाटन सोहळ्यानंतर स्वरजल्लोष हा दर्जेदार मराठी गीतांचा विविधरंगी  कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन पुष्कर श्रोत्री व मृण्‍मयी देशपांडे यांनी केले. सांस्कृतिक कार्य सहसंचालक मिनल जोगळेकर यांनी आभार मानले. हा महोत्सव दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे. तर, दि. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्य मंदिर, ठाणे येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
0 0 0 0 0

दो बुंद जिंदगीके...


        देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे अंतर्गत सन 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे वर्षातून दोन वेळा संपूर्ण देशात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम व पोलिओच्या दृष्टीने जोखीमग्रस्त भागात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येते.
राज्यात अद्यापपर्यंत एकूण 36 राष्ट्रीय मोहीमा व 51 उपराष्ट्रीय मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. सन 2011 या वर्षात जानेवारी व डिसेंबर, 2011 या कालावधीत राज्यात एकूण 2 राष्ट्रीय व 6 उपराष्ट्रीय मोहिमा राबविण्यात आल्या. यावर्षी देखील 19 फेब्रुवारी व 15 एप्रिल 2012 या दिवशी सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेविषयी व एकंदरीतच पोलिओ विषयी माहिती देणारा हा लेख...
सन 2011 मध्ये देशात फक्त 1 पोलिओ रुग्ण पश्चिम बंगाल राज्यात जानेवारी 2011 मध्ये आढळून आला. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून ते सन 2011 या वर्षात प्रथमच एवढ्या कमी संख्येने पोलिओचे रुग्ण आढळले आहेत. 
यावर्षीच्या पोलिओ मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख 97 हजार 672 बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये पोलिओ लसीचे दोन थेंब प्रत्येक बालकाला पाजण्यात येणार आहेत.
राज्यात पोलिओ निर्मुलनासाठी राज्य शासनाने उपाययोजना मोठ्या प्रमाणावर केली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, नासिक जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमेसोबतच उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमही हाती घेण्यात येते. मालेगाव, भिवंडी, बीड याठिकाणी शासनाने विशेष लक्ष केंद्रीत करून लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून प्रयत्न केले आहेत.
नियमित लसीकरण कार्यक्रम :- नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा सत्राच्या माध्यमातून पोलिओ व इतर विविध लसी देण्यात येतात या कार्यक्रमामध्ये खाजगी वैद्यकिय व्यावसायीकांचाही सहभाग घेतला जातो. 1 वर्षाचे आतील बालकांना 6 आठवडे, 10 आठवडे व 14 आठवडे या वयोगटात प्रत्येक वेळी पोलिओचा एक डोस असे एकूण 3 डोस देण्यात येतात. पोलिओचा बुस्टर डोस 16 महिने ते 24 महिने या वयोगटात देण्यात येतो. ही लस तोंडावाटे देण्यात येते.
एएफपी सर्व्हेलन्स :- 15 वर्षाखालील बालकांमधील अचानक आलेला लुळेपणा हे संशयित पोलिओचे लक्षण असते. त्यामुळे सर्वेक्षण करुन संशयित पोलिओचे रुग्ण शोधून काढण्यात येतात. सर्व शासकिय रुग्णालय, प्रा.आ.केंद्रे, अशासकिय/ खाजगी बालरुग्णालये यांचेकडून अचानक लुळेपणा उद्भवलेल्या रुग्णांची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्यात येते व सर्व जिल्ह्यातून प्रत्येक आठवड्यास ही माहिती राज्य कुटुंबकल्याण कार्यालयास प्राप्त होते.
अचानक लुळेपणा आलेल्या रुग्णाची माहिती कळताच 48 तासाचे आत जिल्हा लसीकरण अधिकारी / एसएमओ हे रुग्णाची तपासणी करतात. रुग्णाचे दोन शौच नमुने 24 तासाच्या आंत तसेच रोगाची लक्षणे दिल्यापासून 14 दिवसांचे आत घेवून ते तपासणीसाठी एन्टेरो व्हायरॉलॉजिकल रिसर्च सेंटर, परळ, मुंबई येथे पाठविण्यात येतात.
                                                                                                                                                . . 2


दो बुंद जिंदगीके... 2/-

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 19 फेब्रुवारी रोजी खालील प्रमाणे राबविण्यात येईल.
 मोहिमेच्या पहिल्या दिवशी बुथवर लसीकरण करण्यात येऊन नंतर घरभेटीद्वारा बुथवर लस न दिलेल्या बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.
Ø      घरभेटीतील काम :-
0    असंरक्षित बालके शोधून काढणेसाठी प्रत्येक घराला भेट देण्याकरिता घरभेटीची पथके तयार करण्यात येवून त्याद्वारे त्यांना पोलिओ लस देण्यात येईल. एकही बालक असंरक्षित राहणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येईल.
0    त्याशिवाय रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड, विमानतळ, मंदिरे, बगिचे, टोल नाके, तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी ट्रांझिट टिममार्फत पोलिओ लसीकरण करण्यात येईल.
0    गावाबाहेरच्या/ शहराबाहेरच्या तुरळक वस्त्या, वीटभट्या, सतोड कामगार वस्त्या, बेघर व फुटपाथवरील लाभार्थी यांचेकरिता फिरत्या पथकांद्वारे लसीकरण करण्यात येईल.
0    मुंबई व इतर शहरामध्ये रात्रीची पथके कार्यरत राहाणार आहेत.
पल्स पोलिओ मोहीमे विषयी...
            5 वर्षाखालील सर्व बालकांना एकाचवेळी पोलिओ लसीचा अतिरिक्त डोस देणे हे पोलिओ निर्मूलनातील महत्वाचे सूत्र होय. पल्स पोलिओ मोहीमेत या सर्व बालकांना एकाचवेळी पोलिओ लसीचा डोस दिला जातो. त्यामुळे वाईल्ड पोलिओच्या विषाणूंचे संक्रमण रोखण्यात मोठी मदत मिळते. तसेच बाळाच्या आतड्यांमध्ये वास्तव करणारे वाईल्ड विषाणूंचे निष्कासन शक्य होऊन त्यांची जागा लसीचे विषाणू घेतात. पल्स पोलिओ मोहीमेत पोलिओ लसीचे किमान दोन डोस 4 ते 6 आठवड्याच्या अंतराने देणे आवश्यक असते.
पोलिओचे विषाणू
            पोलिओ लसीचे विषाणू तीन प्रकारचे असतात. पी - 1, पी - 2, पी-3 यापैकी पी - 2 चे निर्मूलन 1999 पासून झालेले आहे.
पोलिओ लस केव्हा देऊ नये?
पोलिओ लस अत्यंत सुरक्षित असल्याने सर्व बालकांना देता येते. केवळ अत्यंत आजारी (Critically ill Child) बालक असेल तरच त्याला पोलिओ लस देवू नये. आजार बरा झाल्यावर पोलिओची लस द्यावी.
            पाच वर्षाच्या आतील ए‍क जरी मूल पोलिओ डोस घेण्याचे राहिले तरी त्या बाळाबरोबर इतरांना पोलिओची लागण होऊ शकते. म्हणजेच एक मूल जरी डोस शिवाय राहिले तर आपले सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील म्हणून आपल्या मुलाला पोलिओ होऊ नये व त्याच्यापासून इतरांना होऊ नये यासाठी या तारखांना प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील बाळाला आठवणीने पोलिओचा डोस नव्हे तर दो बुँद जिंदगीके देणे आवश्यक आहे.
पोलिओ लसीची संरक्षक क्षमता
            पोलिओ लसीचे तीन डोस घेतल्यानंतर 60 ते 70 टक्के बालके संरक्षित होतात. मात्र 100 टक्के संरक्षित होण्यासाठी 10 डोस देखील लागू शकतात. त्यामुळे नियमित लसीकरणांतर्गत दिल्या जाणाऱ्या पोलिओ लसीबरोबरच पल्स पोलिओ मोहीमेत दिले जाणारे डोसही तेढेच महत्वाचे आहेत.
0 0 0 0 0

जे.जे. रुग्णालयाच्या आवारात अतिविशेषोपचार रुग्णालयाची इमारत बांधण्यास मान्यता


मुंबई, दि. 17 : सर ज. जी. समुह रुग्णालय, आवार, भायखळा, मुंबई येथे नवीन अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी उभारण्यात येणाऱ्या 20 मजली इमारत बांधकामासाठी 376,61,57724 रुपये तसेच मुला-मुलींचे वसतीगृह व अधिकारी/ कर्मचारी निवासस्थानासाठी 103,33,59,000 अशा एकूण 479, 95,16,724 इतक्या रकमेच्या खर्चास 23 जानेवारी, 2012 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. 150 कोटी रुपये इतक्या रकमेच्या अत्याधुनिक यंत्रसामग्री व ही यंत्रसामग्री हाताळण्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गावर होणाऱ्या 19 कोटी प्रतिवर्ष इतक्या वाढीव आवर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
00000

रत्नागिरीच्या समर्थ नर्सिंग महाविद्यालयास एम.एस.सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता


मुंबई, दि. 17 :  रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज्  ट्रस्टच्या समर्थ नर्सिंग महाविद्यालयास 2011 -12 या शैक्षणिक वर्षाकरिता मेडीकल सर्जिकल नर्सिंग व ऑब्सेट्रीक ॲण्ड गायनॉकालॉजीकल नर्सिंग या दोन  विषयात एम.एस.सी. (नर्सिंग) प्रत्येकी चार विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाने पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.
अटी व शर्ती-
        या महाविद्यालयातील मेडीकल सर्जिकल नर्सिंग व ऑब्सेट्रीक ॲण्ड गायनॉकालॉजीकल नर्सिंग या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार प्रत्येकी  4 एवढी राहील.
केंद्र शासन, राज्य शासन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेली कार्यपध्दत अवलंबिण्यात यावी.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक शुल्कासाठी कार्यपध्दत अनुसरणे भाग आहे. त्यानुसार शैक्षणिक शुल्क निश्चित करण्यात यावे.  
केंद्र शासन, केंद्रीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली व राज्य शासन यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाबाबत विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
या संस्थेस कायम  विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली आहे.  त्यामुळे संस्था आवर्ती किंवा अनावर्ती स्वरुपाच्या खर्चासाठी अनुदानाची मागणी शासनाकडे करणार नाही.
शासकीय नर्सिंग तत्सम महाविद्यालयातील कोणत्याही अध्यापकास तो सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत या संस्थेमध्ये नोकरी करता येणार नाही. त्यांच्या सेवा या संस्थेस वापरता  येणार नाही.
संस्थेने कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश देऊ नयेत. केंद्र शासनाने दिलेली परवानगी 2011-12 या वर्षासाठी असल्याने पुढील वर्षाचे प्रवेश करण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीचे नुतनीकरण करुन घेणे संस्थेस बंधनकारक आहे.
 केंद्रीय परिचर्या परिषदेने दिलेली परवानगी सन 2011-12 या एका वर्षासाठी आहे. पुढील वर्षाचे विद्यार्थी प्रवेश करण्यापूर्वी केंद्रीय परिचर्या परिषदेची तसेच त्या आधारे राज्य शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
संस्थेने गुणवत्तेवर आधारीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या प्रवेश नियंत्रण समिती, मुंबई यांच्याकडून मंजूर करुन घेणे व आकारण्यात येणाऱ्या फी शुल्काची निश्चिती शिक्षण शुल्क समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे.
0 0 0 0 0

शिक्षकांचे वेतन आणि शिष्यवृत्ती रक्कम `आधार` क्रमांकाद्वारे बँकेत जमा होणार - योजना आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश




मुंबई, दि. 17 : 'आधार' क्रमांकाची नोंदणी ही महत्वाकांक्षी योजना असून या क्रमांकाचा वापर आर्थिक आदानप्रदानासाठी मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. यादृष्टीने राज्यातील शिक्षकांचे वेतन आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या `आधार` क्रमांकांशी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याची योजना आखावी, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
राज्यातील `आधार` क्रमांक नोंदणी मोहिमेची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. `आधार` प्रकल्पाचे अध्यक्ष नंदन निलकेणी, आधारचे क्षेत्रिय उपमहासंचालक डॉ.अजयभूषण पांडे, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ए.के. जैन, रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.नितीन करीर, माहिती तंत्रज्ञान महासंचालनालयाचे सचिव राजेश अग्रवाल, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वित्त विभाग (लेखा व कोषागारे) सचिव श्रीकांत देशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शासकीय योजनांचे लाभार्थी म्हणून दिला जाणारा आर्थिक मोबदला आधार नोंदणीच्या क्रमांकाद्वारे उघडण्यात आलेल्या खात्यांमध्येच जमा करण्याची योजना प्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, शिधापत्रिकाधारक, गॅसधारक, रोजगार हमी योजनेचे लाभार्थी, पेन्शनधारक यांच्यासह साखर कारखान्यांच्या भागधारकांना दिला जाणारा लाभांश त्यांच्या आधार नोंदणीद्वारे केल्या गेलेल्या बँक खात्यातच जमा केला जाईल. या सगळ्यांमध्ये बँकांची भूमिका महत्वपूर्ण असून त्यादृष्टीने अधिकाधिक व्यापक प्रमाणात बँकांचा सक्रिय सहभाग घेतला जावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार नोंदणी क्रमांक अनिवार्य होणार असून त्यासाठी राज्यभरात आधार नोंदणीसाठी पुरेशी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. फेब्रुवारी, 2012 पर्यंत 2.3 कोटी नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात नोंदणीचे काम अतिशय समाधानकारक असून नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांचे आधार कार्ड लवकरात लवकर प्राप्त व्हावे, यासाठी मुंबईमध्ये प्रतिदिनी 5 लाख कार्ड छापण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती नंदन निलेकणी यांनी यावेळी दिली.
-----

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांनी वनसंपत्तीचा ऱ्हास टाळावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांनी वनसंपत्तीचा ऱ्हास टाळावा


मुंबई, दि. 17 :  महाशिवरात्री निमित्त कान्हेरी गुंफा व तुंगारेश्वर मंदीरास भेट देणाऱ्या भाविकांना20 फेब्रुवारी 2012 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर मुख्य प्रवेश द्वारा व्यतिरिक्त इतर रस्त्याने प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 4.30 पर्यंत प्रवेश देण्यात येणार असून त्यानंतर अथवा त्यापूर्वी प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक भाविकाने उद्यानात व अभयारण्यात प्रवेश करताना प्रवेश फी भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उद्यानाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सहकार्य करावे. बिबट्यांचा उद्यान परिसरात संचार असल्याने भाविकांनी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उद्यानाच्या बाहेर जावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांनी केले आहे.
          भाविकांनी प्लास्टीक पिशव्या, थर्माकॉल कप, आगपेटी, लाईटर, सिगारेट, विडी, रॉकेल, ज्वलनशील पदार्थ सोबत आणू नयेत. पिण्याचे पाणी काचेच्या अथवा स्टीलच्या बाटलीत तसेच इतर खाद्यपदार्थ कागदी अथवा कापडी पिशवीत आणावेत. उद्यानात अथवा अभयारण्यात संगीत साधने, म्युझिक सिस्टीम, रेडिओ आदी आणण्यास मनाई करण्यात आली आहे. हातगाडीवाले, टॅक्सी, कार, खासगी बस यांना वाहतुकीस मनाई करण्यात आली असून खाद्यपदार्थ, पेय याची विक्री करणाऱ्या व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
0 0 0 0