मंगळवार, १३ मार्च, २०१२

मी यशवंत.. महानाट्यातून उलगडला यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट


मुंबई, दि. 12 : `मी यशवंत..` या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. सुमारे 600 कलावंत तंत्रज्ञांच्या सहभागातून हे महानाट्य सादर करण्यात आले.
            आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी  वर्षाचा उद्घाटन सोहळा  आज  राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देविसिंह शेखावत, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल, त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, ओरिसाचे राज्यपाल मुरलीधर भंडारी, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, एअर चीफ मार्शल श्री. अर्जनसिंग,  डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या महानाट्याची संकल्पना लेखन दिग्दर्शन संगीत अशोक हांडे यांनी केले. मी यशवंत या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मापासून ते संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा जीवनप्रवास संगीत, नृत्य, गायनाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. सुमारे 600 कलावंत तंत्रज्ञांच्या सहभागाने दीड तासांच्या या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक चळवळ आणि राजकीय प्रवास असा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. यासोहळ्यास राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, आजी-माजी संसद विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, विविध देशांचे वाणिज्य दूत, स्वातंत्र्यसैनिक या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित उपस्थित होते.
000

कोरडवाहू शेती आणि शेतकरी यांच्या विकासातूनच देशाचा विकास-- राष्ट्रपती


मुंबई दि. 12:  कोरडवाहू शेती आणि शेतकरी यांच्या विकासातूनच देशाचा विकास होणार असल्याने जिरायती शेतीच्या विकासावर आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजेत्यासाठी कृषी, देशातील उद्योग, संशोधन आणि विकास संस्थांमध्ये जास्तीत जास्त सुसंवाद होणे, संशोधन, पतपुरवठा, विपणन यांच्यामध्ये भागिदारी वाढणे आवश्यक आहे. त्यातून शेती आणि शेतकरी या दोघांनाही लाभ मिळेल, असे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी  आज येथे सांगितले.
          गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती श्रीमती पाटील यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी त्या बोलत होत्या. सोहळ्यास राज्यपाल के. शंकरनारायणन्, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवीसिंह शेखावत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदेकेंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रुफुल्ल पटेल, त्रिपराचे राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील, ओरिसाचे राज्यपाल मुरलीधर भंडारे, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकरयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार विजेते मार्शल ऑफ एअर फोर्स अर्जन सिंग,यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, आजी- माजी लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          अन्न सुरक्षा, भूक आणि कुपोषणाच्या निर्मलनासाठी आपल्याला सातत्यपूर्ण हरितक्रांतीची गरज असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाल्या की, अनेक गरीब आणि शेतमजुर ज्यावर अवलंबून आहेत अशा जिरायती शेतीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाणांनी शेती, उद्योग, शिक्षण, सहकार, पाटबंधारे यासारख्या क्षेत्रांबरोबर साहित्य, भाषा, जनकल्याण आणि संस्कृती हीसुद्धा समाजाची महत्वाची अंग मानल्यामुळे या सर्वच क्षेत्रात त्यांनी प्रगतीशील निर्णय घेतले. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्राची पुरोगामी राज्य ही प्रतिमा निर्माण झाली. याचे खरे श्रेय यशवंतरावांनाच आहे. दुर्बल आणि वंचित घटकांपर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचवितांना अधिकाऱ्यांनी सहानुभूती, करूणा आणि कर्तव्यभावनेने काम केले पाहिजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम, कार्यप्रवण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडताना यशवंतरावांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या भरीव प्रयत्नांचाही राष्ट्रपतींनी आवर्जुन उल्लेख केला.
          पैशाने समाजाची उंची वाढत नाही तर बौद्धिक आणि सांस्कृतिक उंचीने माणूस खू मोठा होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण होत, असे गौरवोद्गार काढून केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यशवंतरावांनी कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण यासारख्या क्षेत्रात केलेल्या लक्षवेधी कार्याचा उल्लेख केला.  कृषी औद्योगिक समाज रचनेची उभारणी करणाऱ्या यशवंतरावांचे सहकार क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले कीशाहू महाराज, भीमसेन जोशी, शंतनुराव किर्लोस्कर, कुसुमाग्रज अशा विविध क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व या राज्यात जन्माला आले आणि या सर्वांची सांस्कृतिक जोडणी करून महाराष्ट्राची गौरवास्पद कामगिरी देशपातळीवर नेण्याचे महत्वपूर्ण काम यशवंतरावांनी केले. 
          संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही यशवंतरावांच्या राजकीय कर्तृत्वाचा कळस होता असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शब्दांच्या सामर्थ्यावर आणि सौंदर्यावर नितांत विश्वास ठेवणारे यशवंतराव हे राजकारण आणि साहित्य यांचा समन्वय साधणारे  एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कृतीशील विज्ञानवादी समाविष्ट होता. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला दिलेल्या मुलभूत विचारावरच आज देखील राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांचा हा विचार भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर राज्याच्या विविध भागात तसेच दिल्लीतही असे कार्यक्रम घेतले जातील. प्रदर्शने, परिसंवाद, चर्चासत्र, छायाचित्र प्रदर्शन, निबंध स्पर्धा असे विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर घेतले जातील असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे अष्टपैलू होतं. राजकारण, समाजकारणाबरोबच साहित्य, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रांशी त्यांची जवळीक होती. माणसं जोडण्याचं काम त्यांनी केले. महाराष्ट्राला तारणारा विचार यशवंतरावांनी दिला असे गौरवपर उद्गार श्री. देशमुख यांनी यावेळी काढले.
          यशवंतरावांनी महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य अशी केली होती हा धागा पकडून केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या यशवंतरावांचा पिंड हा वैचारीक बैठकीवर घडलेला होता. राज्याबरोबरच देशातील रिबी आणि सामाजिक विषमता नाहीसी केली पाहिजे असा दृष्टीकोन बाळगून त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी केली. खऱ्या अर्थाने त्यांनी 'यशवंत' राव विचार महाराष्ट्राला दिला, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
          केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी यशवंतरावांना महाराष्ट्रापुरते मर्यादि ठेवू नये असे आवाहन करून यशवंतरावांच्या उज्ज्वल कारकीर्दीला उजाळा दिला. आपल्या स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडत राज्याच्या समतोल विकासासाठी तसेच जातिभेद विरहित समाज रचनेच्या निर्मितीमधील त्यांचे योगदान स्पष्ट केले.
          यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एअर मार्शल अर्जनसिंग यांना देण्यात आला. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराची ही रक्कम उपेक्षितांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावी या उद्देशाने अर्जनसिंग यांनी हा धनादेश प्रतिष्ठानकडे सुपुर्द केला.
          वयाच्या 93 व्या वर्षी देशाभिमानाने झपाटलेल्या अर्जनसिंग यांचा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या भाषणातून विशेष गौरव केला.
          राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.  
0 0 0 0