मंगळवार, १३ मार्च, २०१२

मी यशवंत.. महानाट्यातून उलगडला यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट


मुंबई, दि. 12 : `मी यशवंत..` या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. सुमारे 600 कलावंत तंत्रज्ञांच्या सहभागातून हे महानाट्य सादर करण्यात आले.
            आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी  वर्षाचा उद्घाटन सोहळा  आज  राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देविसिंह शेखावत, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय अवजड उद्योग सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल, त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, ओरिसाचे राज्यपाल मुरलीधर भंडारी, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, एअर चीफ मार्शल श्री. अर्जनसिंग,  डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या महानाट्याची संकल्पना लेखन दिग्दर्शन संगीत अशोक हांडे यांनी केले. मी यशवंत या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मापासून ते संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा जीवनप्रवास संगीत, नृत्य, गायनाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. सुमारे 600 कलावंत तंत्रज्ञांच्या सहभागाने दीड तासांच्या या महानाट्यातून यशवंतराव चव्हाण यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक चळवळ आणि राजकीय प्रवास असा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. यासोहळ्यास राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, आजी-माजी संसद विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, विविध देशांचे वाणिज्य दूत, स्वातंत्र्यसैनिक या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित उपस्थित होते.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा