बुधवार, २२ जुलै, २०१५

मजूर कुटुंबातील एका व्यक्तीला कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार

             धुळे, दि. 22 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण, कुशल मजुरीसाठी कौशल्यवृध्दी व स्वयंरोजगारासाठी कौशल्यवृध्दी या माध्यमातून मजूर वर्गास त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात येत असून, सर्व ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामस्थांना या सर्वेक्षणादरम्यान सहभागी होण्याचे व कुटुंबातील एका सदस्याच्या प्रशिक्षणासाठी नाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
 या उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील 3,583 कुटुंबांना होणार असून जिल्ह्यातील धुळे तालुका-1,645 कुटुंबे, साक्री-1,323 कुटुंबे, शिंदखेडा-462 कुटुंबे, शिरपूर 153 कुटुंबे अशा 3,583 कुटुंबातील एका सदस्यास त्यांच्या इच्छेनुसार विविध स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची कौशल्यवृध्दी व्हावी व ते स्वत:चा व्यवसाय करून स्वयंपूर्णत: स्वत:ची उपजिविका चालविण्यास्तव सक्षम व्हावे या दृष्टीकोनातून केंद्र शासनाने Project Life MGNREGA हा उपक्रम हाती घेतलेला आहे.  या उपक्रमाची अंमलबजावणी मग्रारोहयो यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( MSRLM ) यांच्याद्वारे संयुक्तरित्या करण्यात येणार आहे.  या उपक्रमांतर्गत ज्या कुटुंबाने आर्थिक वर्ष 14-15 मध्ये 100 दिवस योजनेवर मजूर म्हणून काम केले आहे अशा कुटुंबातील एका व्यक्तीला कौशल्यवृध्दीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  हे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या DOU-GKY (दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना) तसेच RSETI  या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.  Project Life अंतर्गत 100 दिवस काम केलेले आहे.  त्या कुटुंबातील 18 ते 35 या वयोगटातील युवक तसेच महिला, अतिविशिष्ट आदिवासी समुह आणि Trandgender प्रवर्गातील मजुरांसाठी वयोमर्यादेची अट 18 ते 45 या वयोगटातील आहे.

00000

आषाढी एकादशीसाठी वाहतूक नियमन

            धुळे, दि. 22 :- धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 27 जुलै, 2015 रोजी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरत असते.  यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिला व पुरूष भाविक येत असल्याने दि. 27 जुलै रोजी पहाटे 5-00 वाजेपासून ते रात्री 11-00 वाजेपावेतो अग्रसेन महाराज पुतळा 80 फुटी रोड ते दसेरा मैदान पावेतोचा रस्ता  वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
 रस्त्याच्या दोन्ही बाजूस कटलरी, नारळ विक्री, फुल विक्री व इतर स्टॉल लागलेले असतात.  त्यात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते, असेही पत्रकात नमूद केले आहे.

000000

ध्वनी प्रदूषण नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

            धुळे, दि. 22 :- उच्च न्यायालयातील डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या जनहित याचिका क्रमांक १७३/ २०१० या याचिकेवरील सुनावणीत २४ जून, २०१५ रोजी ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांनी तसेच पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
               आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवले आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी क्षेत्र वगळता घोषित कारण्यात आलेल्या शांतता क्षेत्रांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी तसेच नागरी क्षेत्रातील शांतता क्षेत्रांची माहिती संबंधित महानगरपालिका, नगर पालिकांनी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. पोलीस यंत्रणेने ध्वनी प्रदूषण उल्लंघनाबाबत सामान्य नागरिकांच्या तक्रारी १०० क्रमांकावर नोंदवून घ्याव्यात. निनावी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात यावी. प्राप्त तक्रारींसाठी एक नोंदवही ठेऊन त्यामध्ये तक्रारींची व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात यावी. ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी  ई-मेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.
             यावेळी बोलतांना महानगरपालिका आयुक्त म्हणाले की, सण साजरे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही व रहदारीस अडथळा निर्माण होणार नाहीत व उच्च न्यायालायाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होण्यासाठी, धुळे महानगरपालिकेच्या वतीने जनभावनांचा मान राखून जनजीवनावर परिणाम होणार नाही अशी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तक्रार निवारण व्यवस्था निर्माण केली असून १८००२३३३०१० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच नागरिक आपल्या तक्रारी धुळे महानगरपालिकेच्या dhule_dme@rediffmail.com   ई-मेल वरही करू शकतील.
             पोलीस प्रशासनाच्या १०९१ या टोल फ्री क्रमांकावर तसेच sp.dhule@mahapolice.gov.in  या ई-मेल वर नागरिक ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भातील तक्रारी नोंदवू शकतील असे यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.
000000