बुधवार, २२ जुलै, २०१५

ध्वनी प्रदूषण नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

            धुळे, दि. 22 :- उच्च न्यायालयातील डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या जनहित याचिका क्रमांक १७३/ २०१० या याचिकेवरील सुनावणीत २४ जून, २०१५ रोजी ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम २००० व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांनी तसेच पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदूषण नियंत्रण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
               आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. नामदेव भोसले, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवले आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी क्षेत्र वगळता घोषित कारण्यात आलेल्या शांतता क्षेत्रांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी तसेच नागरी क्षेत्रातील शांतता क्षेत्रांची माहिती संबंधित महानगरपालिका, नगर पालिकांनी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. पोलीस यंत्रणेने ध्वनी प्रदूषण उल्लंघनाबाबत सामान्य नागरिकांच्या तक्रारी १०० क्रमांकावर नोंदवून घ्याव्यात. निनावी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात यावी. प्राप्त तक्रारींसाठी एक नोंदवही ठेऊन त्यामध्ये तक्रारींची व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात यावी. ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी  ई-मेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.
             यावेळी बोलतांना महानगरपालिका आयुक्त म्हणाले की, सण साजरे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही व रहदारीस अडथळा निर्माण होणार नाहीत व उच्च न्यायालायाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होण्यासाठी, धुळे महानगरपालिकेच्या वतीने जनभावनांचा मान राखून जनजीवनावर परिणाम होणार नाही अशी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तक्रार निवारण व्यवस्था निर्माण केली असून १८००२३३३०१० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच नागरिक आपल्या तक्रारी धुळे महानगरपालिकेच्या dhule_dme@rediffmail.com   ई-मेल वरही करू शकतील.
             पोलीस प्रशासनाच्या १०९१ या टोल फ्री क्रमांकावर तसेच sp.dhule@mahapolice.gov.in  या ई-मेल वर नागरिक ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भातील तक्रारी नोंदवू शकतील असे यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा