बुधवार, ८ जुलै, २०१५

पाटावरील झालेली अतिक्रमणे 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत काढण्यात येणार

धुळे, दि. 8 :- धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखालील पांझरा नदीवरील धुळे बंधाऱ्यांच्या कालव्याची जमीन अतिरिक्त ठरवून महसूल विभागाकडे वर्ग करण्यासाठी पाटावरील झालेली अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही दि. 9 जुलै ते 11 जुलै, 2015 या कालावधीत करण्यात येणार आहे.  सध्या प्रथम टप्प्यात रहिवाशी अतिक्रमणे सोडून वाणिज्य अतिक्रमणे गणपती मंदिर ते गांधी पुतळा व जुने धुळेचा कोपरा नगरपट्टी रस्त्याला लागून काढण्यात येणार आहेत, अशी माहिती धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता  यांनी जाहीर प्रकटनाद्वारे दिली.
                  दि. 9 जुलै रोजी गणपती मंदिरापासून मोजणी करून जागेवर आखणी करून निशाणी करणे,                दि. 10 जुलै रोजी जे. सी. बी. मशिनद्वारे प्रत्यक्ष अतिक्रमण केलेली जागा रिकामी करणे, दि. 11 जुलै रोजी जे. सी. बी. मशिनद्वारे प्रत्यक्ष अतिक्रमण केलेली जागा रिकामी करण्यात येईल. 
            अतिक्रमण धारकांना दि. 17 एप्रिल, 2015 पासून वैयक्तिक नोटीसीद्वारे व वर्तमानपत्राद्वारे दि. 3 जुलै आणि 4 जुलै, 2015 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे.  तसेच दि. 8 जुलै, 2015 रोजी पुन्हा 24 तासाच्या नोटीसीद्वारे अतिक्रमणे काढून घेण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.  तरी ज्या अतिक्रमण धारकांनी वरील नोटीसीद्वारे अतिक्रमण काढलेल नसेल त्यांचे अतिक्रमण दि. 9 जुलै ते 11 जुलै, 2015 तारखे दरम्यान शासकीय यंत्रणे मार्फत काढून टाकण्यात येईल, या कार्यवाहीमुळे होणाऱ्या नुकसानीस अतिक्रमण धारक स्वत: जबाबदार राहतील.  तसेच अतिक्रमण धारकाकडून महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 21 (1) नुसार या कार्यवाहीसाठी झालेल्या खर्चाची वसुली करण्यात येईल याची नोंद घेण्याबाबत जाहीर प्रकटनात नमूद केले आहे.
0000000


राष्ट्रीय मतदार यादी शुध्दीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम 12 जुलै रोजी अंतिम विशेष मोहीम -जिल्हा निवडणूक अधिकारी

धुळे, दि. 8 :- भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यातील चुकांची दुरूस्ती, मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणी आणि मतदारांचे मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
            त्यानुसार मतदारांकडून आधार क्रमांकाचा तपशिल प्राप्‍त करण्यासाठी  अंतिम मोहीम रविवार दि. 12 जुलै, 2015 रोजी रविवारी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. रविवार दि. 12 जुलै, 2015 रोजी सकाळी 10-30 ते सायंकाळी 5-00 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित रहाणार असून मतदारांकडून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक इ. माहिती संकलित करणार आहेत.  मतदारांनी सदर माहिती बी. एल. ओ. यांच्याकडे द्यावी.
            ज्या नागरिकांना नवीन नाव नोंदणी करावयाची असेल त्यांना देखील नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल करता येईल.  ज्या मतदारांना त्यांचे मतदार यादीतील तपशिलात दुरूस्ती हवी असेल त्यांना देखील अर्ज सादर करता येईल.  बी.एल.ओ. यांच्याकडे आवश्यक ते अर्ज उपलब्ध आहेत.  धुळे जिल्ह्यातील सर्व बी.एल.ओ. आणि मतदारांनी या विशेष मोहिमेच्या तारखेची नोंद घेऊन मोहिमेस सहकार्य करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.       
                                                            000000


शौर्य बालक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा -बी. एच. नागरगोजे

धुळे दि. 8 :- भारतीय बाल कल्याण परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने  शौर्य बालक पुरस्कार देण्यात येतो. 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींनी दुसऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी अथवा अपघात टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून अथवा प्रसंगावधान दाखवून अतुलनीय साहस दाखविल्याबद्दल राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी देखील हा पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी दि. 1 जुलै, 2014 ते 30 जून,2015 या कालावधीत अशा उल्लेखनीय कार्य केलेल्या मुला-मुलींचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.  अर्जाचा नमुना व आवश्यक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, प्लॉट नं. 52, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे (दूरध्वनी क्रमांक 02562-224729 ) या कार्यालयास संपर्क साधावा अथवा  www.iccw.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. प्रस्ताव दि. 10 ऑगस्ट,2015 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000000
                                    

ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी 10 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

धुळे, दि. 8 :- आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित साधून दि. 1 ऑक्टोबर रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत देशातील  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व कार्य करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या संबंधित क्षेत्रातील व्यक्ती व संस्थाचे प्रस्ताव शहरी विभागातील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, धुळे व ग्रामीण विभागातील प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे येथे दि. 10 जुलै, 2015 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            13 विविध क्षेत्रातील पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी संबंधित व्यक्ती व संस्थांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, धुळे यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.

0000

हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील परिसरात कलम 144 (3) चे मनाई आदेश जारी

धुळे, दि. 8 :- धुळे बंधाऱ्याच्या कालव्यावरील महिंदळे शिवारातील हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील अतिक्रमण दि. 9 जुलै ते 11 जुलै, 2015 या कालावधीत काढण्याचे निश्चित केलेले आहे.  या अतिक्रमणाला  विरोध होऊन कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.  अतिक्रमण काढण्याच्या वेळेतस परिसरात कुणीही गर्दी, गोंधळ निर्माण करू नये या उद्देशाने व अतिक्रमण सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने  धुळे भागाचे उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3) चे मनाई आदेश दि. 9 जुलै ते 11 जुलै, 2015 पावेतो सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 वाजेपावेतो लागू केले आहेत.

                                                                0000000

आदिवासी सेवक व संस्थांना पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. 4 : ‘आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था’ हा पुरस्कार देण्याकरिता राज्यस्तरीय निवड समितीची  पुनर्रचना करण्यात आली आहे. अदिवासी विकास मंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत.
आदिवासी विकास राज्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष आहेत. तर विधानसभा सदस्य प्रा. अशोक रामाजी उईके, विधानसभा सदस्य संजय हनवंतराव पुराम व सचिव, आदिवासी‍ विकास हे सदस्य असून आयुक्त आदिवासी विकास , नाशिक हे सदस्य सचिव असतील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
००००

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न भरल्यास ठेकेदारांवर कारवाई करणार – प्रवीण पोटे-पाटील

 मुंबई, दि. 4 : गणेशोत्सवाच्या काळात अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते झाले पाहिजेत यासाठी ठेकेदारांनी लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे भरावेत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी सांगितले.
          मुंबई आणि पुणे परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अशावेळी विघ्नहर्त्याचे आगमन सुरळीत होण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी भागातील रस्त्यांच्या प्रश्नांवर आयोजित बैठकीत श्री. पोटे-पाटील बोलत होते.
          यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची योग्य ती अंमलबजावणी केली नाही तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
          या बैठकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या रस्त्यांविषयी तसेच मुंबई-गोवा महामार्ग आणि कशेडी घाट, पावसाळ्यातील खड्डे भरणे, विश्रामगृहाजवळील अतिक्रमण हटवणे इत्यादी विषयांवर निर्णय घेण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

राज्य माहिती संचयिका समृद्ध करण्यासाठी प्रशासकीय विभागांनी योगदान द्यावे

मुंबई दि. 4:  राज्य माहिती संचयिका (स्टेट डेटा बँक) समृद्ध करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी योगदान द्यावे असे आवाहन राज्य माहिती संचयिका कार्यशाळेत आज करण्यात आले.
          अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संचालक श्रीमती अश्विनी देव यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल इंडिया सप्ताहांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी संचालनालयाचे  सहसंचालक प. द. सोहळे, सहसंचालक किशोर पाटील, महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन केंद्र, नागपूरचे विवेकानंद घारे आणि शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
          महाराष्ट्र देशातील इतर राज्याच्या तुलनेत कुठे आहे याची माहिती मिळवण्यासाठी तसेच राज्यातील जनतेशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या सुविधा आणि सेवांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य माहिती संचयिका उपयुक्त आहे, असे प्रतिपादन
श्री. सोहळे यांनी येथे केले. ते म्हणाले की, संचयिकेत आर्थिक गणना, जनगणना अहवालांचा समावेश आहे. उद्योग तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीचे अहवाल देखील यात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे लोकांचे राहणीमान, त्यांचे उत्पन्न आणि रोजगाराचे साधन याची माहिती एकत्रितरित्या मिळणे सुलभ होते. आतापर्यंत पावसाची आकडेवारी, राज्यातील जलस्त्रोतांची माहिती, भूजल पातळी यासंबंधीची माहिती राज्य संचयिकेत उपलब्ध झाली आहे. जिल्हावार आकडेवारीही यातून मिळू शकेल.  एनआयसीच्या संकेतस्थळावर असलेली प्रशासनिक विभागांची माहिती जी राज्य संचयिकेत देण्यासाठी उपयुक्त आहे ती तत्काळ देण्यात यावी, असे झाल्यास माहितीचे विश्लेषण करून निर्णय प्रक्रियेलाही वेग देणे शक्य होईल असेही श्री. सोहळे यांनी सांगितले. 
          श्री. पाटील म्हणाले की, विभागांकडे डिजिटल स्वरूपात असलेल्या संग्रहित आकडेवारीपैकी राज्य माहिती संचयिकेत अंतर्भूत करण्यायोग्य माहिती विभागाने निश्चित करुन द्यावयाची आहे. त्यासाठीचे संच अर्थ व सांख्यिकी संचालनालयास उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. राज्य माहिती संचयिकेत समाविष्ट करावयाच्या माहितीचे गुणविशेष निश्चित करून ती आकडेवारी वेब सर्व्हिसद्वारे  राज्य माहिती संचयिकेस उपलब्ध करून द्यावयाची आहे.  ज्या विभागांची माहिती एनआयसी (NIC) च्या संकेतस्थळावर आहे, त्या विभागांनी आपल्या राज्यासाठीची आकडेवारी त्या संकेस्थळावरून मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाची परवानगी घेऊन एनआयसीकडे पाठपुरावा करावयाचा आहे.
          रिमोट सेन्सिंगचा राज्यात कोणकोणत्या‍ विभागांनी उपयोग करून घेतला आहे याची माहितीही आजच्या सादरीकरणात देतांना श्री. घारे म्हणाले की, या केंद्राने आतापर्यंत ४४ हजार गावांचे नकाशे डिजिटाईज केले आहे तर आता सुरु असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील 13793 कामांचे मॅपिंग करून ती माहिती मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्याची डेटा शेअरिंग पॉलीसी तयार करण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ती जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
000000