श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर,
दि.29: सिंहस्थ
कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीतील शाहीस्नान आज पहाटे येथे भक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या
वातावरणात पार पडले. या पर्वणीत देशभरातून आलेल्या विविध मानाच्या आखाड्यांचे प्रमुख,
साधू, संत, महंत व असंख्य भाविकांनी स्नान केले. उत्साहाने भारलेल्या या सोहळ्यास राज्याचे
जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी
भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आलेले सुक्ष्म नियोजन आणि जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संजय मोहीते यांच्या नेतृत्वाखाली
पोलीस दलाने ठेवलेला चोख बंदोबस्त यामुळे शाही स्नान शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणात
संपन्न झाले.
पहाटे 4 वाजेच्या सुमारास शाही स्नानास प्रारंभ झाला. हर हर महादेवचा
जयघोष करत आणि विविध वाद्यांच्या गजरात विविध आखाडे मिरवणुकीने कुशावर्तात दाखल होत
होते. आपापल्या मानानुसार विविध आखाड्यांनी त्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत यांच्यासह
उपस्थिती लावून कुशावर्तातील कुंडात शाहीस्नान केले. प्रशासनाने यासाठी पाणी, प्रकाश
व्यवस्था, आखाड्यांचे आगमनाचे आणि परतीचे मार्ग, जीवरक्षक दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक
नियंत्रण, प्रसार माध्यमांची व्यवस्था अशी सर्व बाजूंनी चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे
साधुंना निर्विघ्नपणे शाहीस्नानाचा विधी पूर्ण करता आला.
श्री. शंभू पंचदशनाम जुना आखाडा (निलपर्वत) यांची मिरवणूक गुरुगद्दी
रमता पंच छावणी येथून निघाली. त्यापाठोपाठ श्री. पंचदशनाम आवाहन आखाड्याचे आणि त्यानंतर
पंच अग्नी आखाड्याच्या साधु, महंतांची मिरवणूक निघाली. आजच्या सिंहस्थ पर्वातील ही
पहिली शाही मिरवणूक होती. पिंपळंद शिवारातून या मिरवणूकांना प्रारंभ झाला. दुसऱ्या
शाही मिरवणूकीत श्री. तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री. तपोनिधी पंचायती आनंद आखाडा या
दोन आखाड्याच्या साधु महंतांनी सहभाग घेतला.
तिसऱ्या शाही मिरवणूकीत श्री. पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री. शंभू पंचायती अटल आखाडा
या आखाड्याच्या साधु महंतांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम श्री. पंचादश जुना आखाडा, आवाहन
आखाडा, श्री. पंचायती अग्नी आखाडा, श्री. पंचायती निरंजनी आखाडा, श्री. पंचायती आनंद
आखाडा, श्री. पंचायती महानिर्वाण आखाडा, श्री. पंचायती अटल आखाडा यांनी या वेळी शाहीस्नानाची
पर्वणी साधली. त्यानंतर श्री. पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री. पंचायती नवा उदासीन
आखाडा आणि श्री. निर्मल पंचायती आखाड्याच्या
साधुंनी मिरवणूक काढली. श्री. पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री. पंचायती नवा उदासीन
आखाडा, श्री. पंचायती निर्मल आखाडा यांनी शाहीस्नान केले. दुपारी 12 वाजल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना शाहीस्नानासाठी सोडण्यात आले.या
मिरवणूकी दरम्यान सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता. भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित
होते. प्रशासनाने केलेल्या चोख आणि परिपूर्ण तयारीने कोणताही अनुचित प्रकार न घडता
यंदाच्या सिंहस्थातील पहिले शाहीस्नान शांततेत व भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडले.