शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई दि 28:  ग्रंथपाल संचालनालयामार्फत दरवर्षी जून महिन्यात घेण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेच निकाल जाहीर करण्यात आला आहे. जून 2015 मध्ये राज्यातील 27 जिल्हास्तरीय केंद्रामधून एकूण 1 हजार 539 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी 1 हजार 21 विद्यार्थी उत्तीर्ण व 518 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 66.34 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक निकाल रत्नागिरी केंद्राचा 92.86 आणि सर्वांत कमी निकाल परभणी केंद्राचा 7.89 टक्के लागला आहे.
विभागांमध्ये नागपूर विभागाचा निकाल 80.46%, पुणे विभागाचा निकाल 54.78 टक्के लागला आहे. परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रावर 5 सप्टेंबर 2015 नंतर मिळणार आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनयिम, 1967 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्याचे काम ग्रंथालय संचालनालयाचे असते. त्यानुसार दरवर्षी संचालनालयाकडून जून महिन्यात परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षेचे वर्ग राज्यातील राज्य/विभाग ग्रंथालय संघांकडून शिफारित केलेल्या जिल्ह्यांतून चालविण्यात येतात.
ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुलक आणि अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे 15 सप्टेंबर 2015 पर्यंत करावेत, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा