सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

धुळे जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची केंद्रीय समिती पथकाकडून पाहणी



धुळे, दि. 21 :- धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज  आलेल्या केंद्रीय समितीच्या पथकाने धुळे तालुक्यातील अजंग, जुनवणे, विंचूर आणि तरवाडे या गावांना भेटी देऊन  पीक परिस्थितीची पाहणी केली.  केंद्रीय समिती पथकात ग्रामीण विकास संचालनालयाचे सहाय्यक आयुक्त जगदीश कुमार,  नवीदिल्ली वित्त मंत्रालयाचे उपसंचालक (पी.एफ.1) ए. के. दिवाण, नवीदिल्ली पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे कक्ष सचिव  के. नारायणा रेड्डी यांचा समावेश होता.  केंद्रीय समिती पथकासोबत  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे उपसचिव अशोक अत्राम, जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे,  जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, उपविभागीय कृषि अधिकारी पी. एम. सोनवणे, मंडळ कृषि अधिकारी रमेश पोतदार (धुळे), पी. व्ही. निकम (पिंप्री), पी. ए. पाटील (सोनगीर) आदी उपस्थित होते.
प्रारंभी केंद्रीय समिती पथकाने धुळे जिल्ह्याच्या सीमेवर अजंग या गावाच्या शेतकऱ्यांच्या  पीक परिस्थितीची पाहणी केली.  त्यात विमलबाई सुरेश माळी, मदिना मर्द खाटीक यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कापूस आणि बाजरी पिकाची पाहणी केली आणि गेल्या दोन वर्षांचे उत्पन्न आणि यावर्षीच्या उत्पन्नाच्या तफावतीबाबत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.  शेतकऱ्यांनी समिती पथकाच्या सदस्यांकडे आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या.
            केंद्रीय समिती पथकाने जिल्ह्यातील सर्व संबंधित खाते प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती जाणून घेतली.  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यात झालेल्या अनियमित  पावसाची धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्याची  आकडेवारी, खरीप पिकांची जिल्ह्यातील परिस्थिती, प्रत्यक्ष पीक काढणी करून काढण्यात आलेली पैसेवारी, पीक कर्ज वाटप, पीक विमा योजना, जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा इ. सविस्तर माहिती  पॉवर पॉईन्ट प्रेझेन्टेशनद्वारे सादर केली.  बैठकीस खाते प्रमुखांसोबत अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, शिरपूरचे उप विभागीय अधिकारी राहूल पाटील, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

            दुपारच्या सत्रात केंद्रीय समिती पथकाने धुळे तालुक्यातील जुनवणे, विंचूर आणि तरवाडे या गावांच्या परिसरातील पीक परिस्थितीची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.  त्यात जुनवणे येथील तुकाराम देवसिंग पाटील,  विंचूर येथील शिवाजी विक्रम देसले, तरवाडे येथील सुरेखा दगडू मोरे, अर्जुन मालजी माळी, अर्जुन शेनपडू पवार यांच्या शेतातील कापूस, बाजरी आणि मका आदी पिकांचा समावेश होता.                00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा