बुधवार, ४ एप्रिल, २०१२

भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले


मुंबई, दि. 3 : प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी राज्य शासनाने सोमवारी नियुक्ती केली आहे.
          राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी भाषा सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या विविध कोशांमध्ये सुधारणा व नवीन प्रचलीत शब्दांचा अंतर्भाव करुन कोश अद्ययावत करणे, मराठी परिभाषिक संज्ञाच्या समस्या सोडवणे, वेळोवेळी आढावा घेऊन मराठी भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम आखून मार्गदर्शन करणे, मराठी भाषेचे धोरण ठरविणे आदी कार्ये ही समिती करीत असते.
          निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या राजीनाम्यामुळे भाषा सल्लागार समिती अध्यक्षपद रिक्त होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या पदावर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची काल नियुक्ती केली. डॉ. कोत्तापल्ले हे 1971-72 साली बीड येथील नवगन महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी बीड येथील व्यंकटस्वामी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख तसेच जून 2005 ते जून 2010 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे कुलगुरु पद भूषविले आहे. त्यांच्या 'मूडस्' या कवितासंग्रहास, 'संदर्भ (लघुकथा)', 'गांधारीचे डोळे' (कादंबरी), 'ग्रामीण साहित्य स्वरुप आणि शोध' (समीक्षा) 'उद्याच्या सुंदर दिवसासाठी' (ललीत लेखन) आदी साहित्यास राज्य पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांना  महाकवी विष्णूदास पुरस्कार, बंधुता पुरस्कार एन.सी. केळकर पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे.
          महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य, 8 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे (श्रीगोंदा) अध्यक्ष आदी पदेही त्यांनी भूषविली आहेत.
          पुणे, मुंबई, एस.एन.डी.टी., उत्तर महाराष्ट्र, गुलबर्गा, धारवाड, बडोदा, बनारस हिंदू, भारती, मराठवाडा आणि विक्रम विद्यापीठ उज्जैन आदी विद्यापीठांच्या मराठी अभ्यास केंद्राचे ते सदस्य आहेत.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा