सोमवार, ४ जून, २०१२

उत्कृष्ट स्काऊट-गाईड शिक्षकांना

 दरवर्षी शिक्षक दिनी आयोजित करण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये यावर्षीपासून सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका स्काऊटर आणि गाईडरला राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेतर्फे दादर येथील शिवाजी पार्क स्काऊटस् गाईड पॅव्हेलियनमध्ये आज राज्यस्तरीय उत्कृष्ट स्काऊटर गाईडर पुरस्कार आणि प्रा.बापूसाहेब टी.पी.महाले स्काऊट गाईड जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
          आज संपूर्ण भारतात सुमारे 47 लाख स्काऊट गाईड असून त्यापैकी सुमारे 15 लाख स्काऊट गाईड एकट्या महाराष्ट्रात आहेत.  या चळवळीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र राज्य देशामध्ये संख्यात्मकदृष्टीने प्रथम क्रमाकांवर असून गुणात्मक वाढीतही अग्रेसर आहे. या यशाचे खरे मानकरी कार्यक्षम स्काऊटर आणि गाईडर आहेत.
        विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण जोपासण्यासाठी ही चळवळ अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने स्काऊट गाईड चळवळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करील. पंतप्रधान ढाल स्पर्धा, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, सेवा प्रकल्प, जागतिक साक्षरता दिन, पल्स पोलिओ मोहीम, व्यसनमुक्त जीवन, कुष्ठरोग निवारण, लोकसंख्या विस्फोट दिन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
        राष्ट्रीय स्तरावरील जांबोरी महाराष्ट्रात आयोजित केल्यास राज्य शासन त्यासाठी सहकार्य करेल असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने नुकतेच आपले क्रीडा व युवा धोरण जाहीर केले आहे.  या धोरणाच्या उद्दिष्टाला स्काऊट गाईडच्या कार्याचा हातभार लागत असल्याने यापुढे स्काऊट गाईड संस्थेला अधिक ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब धाबेकर आणि संस्थेचे राज्य आयुक्त भा.ई.नगराळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. 
        यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 27 स्काऊटर आणि गाईडर तसेच औरंगाबाद येथील निर्मल ठाकूर ग्यानानी यांचा प्राध्यापक बापूसाहेब टी.पी.महाले जीवन गौरव पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि क्रीडा व युवककल्याण मंत्री पद्माकर वळवी यांचीही भाषणे झाले. आपल्या भाषणात त्यांनी स्काऊट गाईड चळवळीचे महत्व विषद करून या चळवळीच्या विकासासाठी विभागामार्फत सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. 
        या कार्यक्रमास स्काऊटचे राज्य आयुक्त डॉ.वसंत काळे, गाईडच्या राज्य आयुक्त श्रीमती विजया देवरे, राज्य कोषाध्यक्ष बी.सी.हंगे, राज्य चिटणीस शोभना जाधव तसेच स्काऊटर, गाईडर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा