गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2011 साठी प्रवेशिका पाठविण्याचे माहिती महासंचालनालयाचे आवाहन


मुंबई, दि. 11 : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2011 या  वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2012 असा राहील.
            2011 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे.
        राज्यस्तर (मराठी) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा. व ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.           
विभागीय पुरस्कार
        नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत); औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोकण विभाग: शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
नियम व अटी
            पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल.मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल.  या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
              पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
            पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
            मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येईल.                  
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील. शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.2011 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेवर राज्यस्तर/विभागीयस्तर तसेच प्रवेशिका कोणत्या भाषेकरिता आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. आपण पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो.
ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित
संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.              प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी, कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.               
छायाचित्रकार पुरस्कार
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. केकी मूस  उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे.
2011 च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2011 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो  प्रत नसावी.पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जांचे नमुने माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या http://dgipr.maharashtra.gov.inतसेच महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त विभाग, माहिती जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालयमुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
            या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

                                                                        ---000----


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा