मुंबई, दि. 2 : माहिती व तंत्रज्ञान सुविधांचा वापर वाढावा, त्यातून शासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता यावी यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आय.टी. प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. दैनंदिन कामकाजात मायक्रोसॉफ्ट ॲप्लीकेशनच्या वापराबरोबर माहिती तंत्रज्ञान सुविधांचा वापर वाढण्याच्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने मंत्रालय स्तरावर आय.टी लॅब सुरु करावी आणि येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सुविधांच्या वापराबाबतचे प्रशिक्षण द्यावे, असे प्रतिपादन मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनी केले.
महा ऑनलाईन, मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन आणि माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या टेक सॅटर्डे या उप्रकमामध्ये आज मुख्य सचिवांच्या हस्ते मायक्रोसॉफ्ट लिंकचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या विविध विभागांमध्ये आणि त्यांच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे असे सांगून मुख्य सचिव म्हणाले की, यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होईल. शासकीय विभागातील कोणत्या विषयांच्या फाईल्सचे रुपांतर ई-फाईल्समध्ये करता येईल याचा देखील माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने अभ्यास करावा असे सांगून ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी नियमित स्वरूपात असे प्रशिक्षण वर्ग घेणे गरजेचे आहे. शासकीय कामकाजाचे नियोजन, बैठकांमधील सुसूत्रता आणि माहितीच्या आदान प्रदानातील अचूकता आणि अद्ययावतता यासाठी देखील माहिती तंत्रज्ञान सुविधांचा अचूक वापर करून घेता आला पाहिजे.
माणूस म्हणून आपण प्रत्येक क्षणाला नवनवीन काही तरी शिकत असतो. त्यातून आपली क्षमता वृद्धी होत असते. आपल्यातील कौशल्यवृद्धी करतांना माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपल्या कामात दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी आणि माहिती व तंत्रज्ञान सुविधांचा वापर वाढण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान संचालनालयातर्फे टेक सॅटर्डेसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे माहिती व तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
शासनात दैनंदिन काम करतांना मायक्रोसॉफ्ट ऑफीस या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. यामध्ये अत्यंत उपयुक्त असलेल्या परंतू माहीत नसलेल्या किंवा वापरत नसलेल्या आज्ञावलींची माहिती यावेळी करून देण्यात आली. यामध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल, आऊटलूक एक्सप्रेस, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, यासारख्या मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरमधील विविध ॲप्लीकेशन्सचा उपयोग करून काम अधिक अचूकतेने कसे करता येते, त्यात गती कशी आणता येते हे डॉ. नितीन परांजपे यांनी यावेळी सोदाहरण समाजावून सांगितले.
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा