मंगळवार, ६ मार्च, २०१२

विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई, दि. 5 : बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या जागतिक महिला कबड्डी स्पर्धेतील विश्वविजेत्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विश्वचषकविजेत्या संघातील महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे, सुवर्णा बारटक्के आणि दिपिका जोसेफ या तीन खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये, तर संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडगिरी यांना 25 लाख रुपये देऊन राज्य शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात यावा, अशा आशयाचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावल्यामुळेच देशाला विश्वविजेतेपद मिळू शकले याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा अध्यक्ष आणि एक कबड्डीप्रेमी म्हणून आपल्याला राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे. यापूर्वी, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंना शासनाने प्रत्येकी एक कोटी रुपयांचा पुरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या या तिन्ही कबड्डीरत्नांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा, तर प्रशिक्षकांना 25 लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करुन राज्य शासनाच्यावतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात यावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी पत्रात मांडली आहे.
देशी खेळांना, विशेषत: मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रीय खेळाडूंच्या आणि प्रशिक्षकांच्या सत्काराने खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार असल्यामुळे यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी  उपमुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.       
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा