धुळे,:- तरुण मुलंमुली ही
राष्ट्राची संपत्ती असून ती निरोगी व निकोप रहावी यासाठी तारुण्यात होणा-या स्वैराचारासारख्या
गंभीर चुका टाळून एचआयव्ही, एड्स सारख्या गंभीर आजाराला आमंत्रण न देता त्याला
हद्दपार करण्यासाठी तरुणांनी सामाजात मोठया प्रमाणात जागृती निर्माण करावी, असे
आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज केले.
जिल्हा
सामान्य रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची
जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस
गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम.
लाडीकर, डॉ.चारुदत्त शिंदे, डॉ. संजय शिंदे , डॉ. अन्सारी, उपशिक्षणाधिकारी राहुल
चौधरी, वैशाली पाटील, प्रा. गायकवाड, फुलपगारे
उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी प्रकाश महाजन उपस्थितींतांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एड्स,
एचआयव्ही हा रोग अनैतिक संबंधातून किंवा एचआयव्ही पॉझिटीव्ह रक्ताच्या माध्यमातून रुग्णाला होत असून हा महाभयंकर रोग
होवूच नये यासाठी प्रत्येक तरुण तरुणींनी आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी विपश्यना
सारख्या साधना शिबीरात सहभागी होवून समाजाला वेगळा संदेश द्यावा. त्याच बरोबर
समाजाची मानसिकता बदलण्यासाठी एचआयव्ही, एड्स बाधितांचा तिरस्कार न करता त्यांना
जगण्यासाठी आधार दिला पाहिजे भावी पिढीला आपल्या आयुष्याचे ध्येय गाठायचे असेल तर
प्रत्येकाने जनरल नॉलेजच्या पुस्तकांचे वाचन करुन आपली बुध्दिमत्ता वाढवावी, असेही
आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
अधिष्ठाता
डॉ. एस.एस. गुप्ता यावेळी म्हणाले की, जीवनात नकळत एखादी चुक होते. त्याचे परिणाम
किती भयंकर होतात याचे एचआयव्ही, एड्स उदाहरण असून अशा चुका तरुणांकडून होवूच नये
यासाठी आमच्या तरुणांनी निकोप, निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा.
प्रस्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
एस.एम.लाडीकर म्हणाले की, एड्स एचआयव्ही हा महाभयंकर रोग असून यावर उपचारच नाही.
परंतू तरुण पिढी या रोगाला टाळू शकते. त्याला हद्दपार करु शकतात. यासाठी सर्व
सामाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असून याचे वाईट परिणामांचीही जनतेमध्ये जनजागृती
होणे गरजेचे असल्याचे सांगुन तेच काम आजच्या तरुण पिढीला करायचे असल्याचे
सांगितले.
यावेळी
शाहीर सुभाष कुळकर्णी यांनीही एड्स, एचआयव्ही जनजागृतीबाबत पोवाडा सादर केला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले यांनी उपस्थितांना एड्स दिनाची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.संजय शिंदे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा