गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

धुळे शहरातील महावितरणसंदर्भातील विविध कामांना गती

मुंबई दि. 18 - धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या थकित वीज देयकांसाठी पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
धुळे शहरातील वीज वितरण संदर्भातील विविध कामांची आढावा बैठक ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील मंत्रालयीन दालनात झाली. त्यावेळी श्री. बावनकुळे यांनी हे निर्देश दिले. यावेळी धुळे शहराच्या महापौर जयश्री अहिरराव, आमदार अनिल गोटे, महावितरणचे कार्यकारी संचालक ताकसांडे, संचालक (प्रकल्प) प्रभाकर शिंदे, अधिक्षक अभियंता पडाळकर, वाणिज्य अभियंता खंडाईत आदी उपस्थित होते.
धुळे शहरातील महावितरणच्या विविध कामांचा आढावा घेऊन श्री. बावनकुळे म्हणाले की, पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या थकित वीजबिलातील 50 टक्के वीज बिल टप्प्याटप्याने भरण्याची सवलत देण्यात येणार आहे. मूळ थकबाकी रक्कमेच्या उर्वरित 50 टक्के रक्कम व्याज व दंडाच्या 50 टक्के रक्कम महावितरणला शासनाकडून अनुदान स्वरुपात देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीकडून 50 टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेने पाठविल्यास त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महानगर पालिका, नगरपालिका व नगर पंचायत यांची पथदिवे, वीज बिलाची थकबाकी दिवसें दिवस वाढत आहे. याकरिता स्ट्रीट लाईट बिलाची योजना आणण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील महावितरणने रोहित्रे, पोल उभारले आहेत. या जागेचा मोबदला स्वरूप महावितरण मूळ जागेच्या किंमती एवढी कामे पालिकेला आयपीडीएस अंतर्गत करून देणार आहे. तसेच रस्त्यात अडथळे आणणारे विद्युत खांब, रोहित्रे यांनाही लवकरात लवकर काढण्यात येतील. याकरिता डीपीडीसीअंतर्गत निधी दिला जाईल.
वीज जोडणी, भारनियमनाबाबत लोकांच्या समस्या सोडविण्याकरिता लवकरच धुळे शहरात अधीक्षक अभियंता कार्यालयाची स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याबाबत लवकरच प्रस्ताव होल्डिंग कंपनीसमोर आणला जाईल. शहरातील वीज चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्यात येणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा